— मानसी तांबेकर —
मी आहे सुट्टी, सर्वांशी माझी गट्टी
धकाधकीच्या जीवनात मी आहे अल्पविराम;
करा भटकंती, मौज – मस्ती वा आराम .
दैनंदिन जीवनात होणारी धावपळ-दगदग ; त्यामुळे थकलेले शरीर , त्याच-त्याच कामाने कंटाळलेले मन , जीवनामध्ये येणारे चढउतार यावर माणूस विरंगुळा शोधू लागला .त्याला रोजच्या कामातून ‘सुटका’ हवी होती आणि पर्यायाने मी जन्माला आले ; माझे नामकरण झाले ‘सुट्टी’, कुणी मला ‘रजा’ म्हणायला लागले , कुणी छुट्टी, कुणी Holiday ,कुणी Leave, तर कुणी Vacance. देशोदेशी वेगवेगळ्या भाषेनुसार मी अनेक नावांनी ओळखली जाऊ लागले. पण माझे कार्य एकच-मानवी शरीराला विश्रांती देऊन मन प्रफुल्लित करणे.
मग हळूहळू माझा आनंद उपभोगण्यासाठी माणूस निरनिराळी कारणे शोधू लागला. चाकरमान्यांसाठी आठवड्याच्या कामाचा क्षीण घालवण्यासाठी हक्काची ‘रविवार’ची सुट्टी ,नातेवाईकांच्या भेटीगाठी व्हाव्या, सर्व सण -उत्सव साजरे व्हावे आणि त्यात सर्वांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी या हेतूने कधी गणपती -दिवाळीची तर कधी क्रिसमसची सुट्टी , स्वदेशाभिमान आणि राष्ट्रीय एकात्मता रुजावी म्हणून १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणांची सुट्टी ,वर्षभर शाळा -कॉलेज ,अभ्यास याला उसंत मिळावी , मामाच्या गावाला जाऊन तिथला पाहुणचार घेता यावा , वेगवेगळे छंद जोपासता यावे यासाठी मी उन्हाळी सुट्टीच्या रूपात विद्यार्थी जीवनातही प्रवेश केला. पुढे सोयीनुसार माझे वेगवेगळ्या गटात विभाजन झाले. मधली सुट्टी,सार्वजनिक सुट्टी,विशेषाधिकार रजा (PL), अर्जित रजा (EL),प्रासंगिक रजा (CL),आजारी रजा असे करत करत नोकरी करणाऱ्या माता-पित्यांना त्यांचे मातृ-पितृत्व उपभोगता यावे म्हणून प्रसूती रजा (ML) सुद्धा या गटात सहभागी झाली.
मला अजूनही आठवतो तो दिवस- जेव्हा माझी नोंद दिनदर्शिकेत झाली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला कारण माझ्या लालचुटूक रूपामुळे मी सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. अजूनही नववर्षाचे कॅलेंडर दिसताच प्रत्येकाची नजर माझ्यावर भिरभिरत असते. आजकाल तर वर्षाच्या अखेरीलाच पूर्ण वर्षाच्या सुट्ट्यांचे एक वेगळे पत्रक निघते आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी घराघरात पोहचते ;मग सुरु होते मला सत्कारणी लावायची तयारी. एक दिवसाची सुट्टी, सणांच्या सुट्ट्या , आजकालचे नवे फॅड- ‘लॉन्ग वीकएंड’ म्हणजे २-३ दिवस लागून आलेल्या सुट्ट्या किंवा एखादी रजा टाकून ३-४ दिवसाची भरघोस सुट्टी. मग यांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु होते. हे नियोजन करतांना तुमचा उत्साह पाहिला की मन सुखावते. हे नियोजन करणे सोपे जावे आणि मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा व्हावा म्हणून Yatra.com, Make my trip सारख्या कंपन्यांनी आपली मुहूर्तमेढ रोवली. पण आज त्याचे स्वरूप बदलले आहे. या आणि यासारख्या अनेक कंपन्या तुमच्या सुट्टयांचे दिवस, तुमची आवड ,स्वभाव ,ऐपत या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन सुट्ट्यांमध्ये भरघोस आनंद देण्याची हमी देतात ;पण मला वाटतं ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ आणि म्ह्णूनच प्रत्येकाची सुट्टी व्यतीत करायची संकल्पना वेगळी.
पूर्वी रविवारी माझे आगमन झाले की आरामात स्वागत व्हायचे. निवांतपणे बसून सर्वांसोबत गरमागरम नाश्ता, टी.व्ही.वर रामायण,महाभारत सारखे कार्यक्रम , दुपारी जेवणात घरच्या गृहिणींनी सर्वांची आवड लक्षात घेऊन बनवलेला फक्कड बेत , मग वामकुक्षी आणि संध्याकाळी कुटुंबाबरोबर बागेत किंवा कुठच्याही रमणीय स्थळी भेट. हा असा रविवार व्यतीत केला की सोमवारी काम करायला नवीन ऊर्जा मिळायची. पण आता रविवारची सुट्टी म्हणजे बहुतांश वेळा पुढील आठवड्याचे नियोजन करायचा दिवस, चूल-मूल सांभाळून नोकरीची कसरत करून थकलेली ‘ती’ या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी घोषित करते. मग स्वीग्गी ,झोमॅटोचे बापडे इकडून तिकडे धावत रविवारच्या फक्कड बेतची तुमची इच्छा पूर्ण करतात. संध्याकाळी मॉलचा फेरफटका , शॉपिंग ,खाणे-पिणे अशी मजा केल्यावरही सोमवारचे वेध सुखावह नसतात ;तुम्ही वाट पाहत असता माझ्या पुढच्या आगमनाची.
आता पूर्वीसारखा उन्हाळी सुट्टीतही मुलांचा दंगा ऐकू येत नाही . पूर्वी परीक्षा संपल्या की त्या संध्याकाळपासूनच मला साजरे करायचे बेत सुरु व्हायचे. बाहुला-बाहुलीचे लग्न, भातुकली , लगोरी, हुतुतू ,लपंडाव यासारखे मैदानी वा साप-शिडी, पत्ते, बुद्धिबळ सारखे बैठे खेळ , कैरी,चिंचा, बोरे, आंबे -फणस याची लयलूट असायची. मामाच्या गावी जायचे ठरले की माझ्या आनंदाला उधाण यायचे. गावाकडची टुमदार घरं, नारळी -पोफळीच्या बागा, निळाक्षर समुद्र ,सोबत आजी-आजोबांचे लाड, सुगरण मामीच्या हातचे गरमागरम जेवण अजूनही या सर्व मला माझ्या बालपणीच्या आठवणी वाटतात. पण आता काळ बदलला आणि काळाप्रमाणे मीही बदलले.वार्षिक परीक्षा संपली की मी मुलांना भेटते एका वेळापत्रकाच्या रूपात. अभ्यास-वाचन याची वेळ, मोबाइल, टी.व्ही., संगणक यासारख्या साधनांवर करमणूक करण्याची वेळ, मित्र-मैत्रिणींबरोबर खेळायची वेळ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून छंद वर्ग आणि मग एक आठवडा आपल्या देशात वा परदेशात पालकांसोबत भ्रमंती असे नियोजन असते. अर्थात मला वेळापत्रकात जरी बांधले तरी मुलांचा उत्साह, मस्ती-धिंगाणा,छंदवर्गात जाऊन नवनवीन कला शिकण्याची आवड ,पालकांसोबत व्यतीत केलेले क्षण ,त्यातून मिळालेले अनुभव या गोष्टीना बंधन नाही. म्हणूनच कैरीचे थंडगार पन्हं, आमरस,कोकम सरबत,आईस्क्रीम याचा आस्वाद घेण्यासाठी, थंड हवेच्या ठिकाणी भ्रमंतीसाठी, कधी लग्न-मुंजीसारख्या समारंभातून आपल्या आप्त-स्वकीयांना भेटण्यासाठी आजही उन्हाळी सुट्टीची प्रत्येक जण तितक्याच आतुरतेने वाट पाहत असतो. पण तुमच्या चेहऱ्यावर खरा आनंद दिसतो जेव्हा मी अचानक तुम्हाला भेटते. धो-धो पावसानंतर भोलानाथकडे शाळेभोवती तळे साचून सुट्टीचे साकडे घालणारी चिमुकली असोत वा अचानक ‘बंद’ घोषित झाल्यामुळे कार्यालयाला सुट्टी मिळालेला एखादा चाकरमानी असो; माझे ‘अनियोजित’ आगमन म्हणजे आठवड्याच्या रटाळ जीवनात जणू ‘ओॲसिस’. पण तब्येतीच्या कुरबुरी,आजारपणं,कुण्या आप्त-स्वकियांचे कायमचे दुरावणे या कारणांमुळे जेव्हा मी तुमच्या जीवनात अवांछितपणे येते तेव्हा मात्र मन विषण्ण होते. पण सगळ्यात वेगळा अनुभव होता जेव्हा मी कोरोनासारख्या महामारीत अनिवार्यपणे तुमच्या जीवनात आले. सुरुवातीच्या काळात सर्वांनाच जणू ‘लॉटरी’ लागल्याचा आनंद मिळाला. आरामात घरी बसून ऑफिसचे काम, रोज नव-नवीन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद, कधी अवांतर वाचन, चित्रकला, हस्तकला, बागकाम यासारखे छंद यासाठी वेळ मिळू लागला. सर्वांनी स्वावलंबनाचे- घरकामाचे धडे गिरवले. ऑनलाईन शाळा मुलांसाठी ‘पर्वणी’ ठरली. पण म्हणतात ना -‘अतिपरिचयात अवज्ञा’ दोस्त-मंडळींच्या भेटीगाठी बंद झाल्या, लग्न -समारंभ ,सण-उत्सव साजरे करायचा उत्साह संपला ,भ्रमंतीला राम-राम ठोकावा लागला, तुमची शारीरिक -मानसिक कुचंबणा होऊ लागली. मग ‘घरबसल्या अशी सुट्टी काय कामाची’ असे नकारात्मक सूर ऐकू येऊ लागले. लोकांना माझा कंटाळा येऊ लागला. मग मी ही निराश झाले. सर्व सुरळीत व्हावे म्हणून मंदिरात गेले तर ‘बंद मंदिर’ पाहून वाटले; की देव तर सुट्टीवर नाही ना गेला? पण मग आठवलं -निसर्गनिर्मित गोष्टी व त्यांना निर्माण करणारा देव हे मात्र माझे अपवाद आहेत. त्या क्षणी देवाला साकडं घातलं ‘हे देवा, रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस पडल्यावर तृप्त झालेली धरती आणि मरगळलेल्या जीवनात विसाव्याचा शिडकावा करणारी मी त्याला कशाचीही तोड नाही.’पोट दुखते’ असे खोटे नाटक करून शाळेला मारलेली बुट्टी, पहिल्या पावसात ऑफिसला काहीतरी थाप मारून सुट्टी घेऊन आपल्या पत्नी वा प्रेयसी सोबत रोमांचकारक क्षण घालवणारा तो; या प्रेमळ आठवणी, ते गोड अनुभव मनात घर करून आहेत. म्हणूनच तुला विनंती करते –
मी आहे मानवाच्या सोयीसाठी , नको माझा अतिरेक,
उपभोगता यावा आनंद माझा , हीच मनी इच्छा एक’.
