---विशाखा पंढरपुरे--- टेकडीकडे जाणार्या रस्त्यावर अमितने आपली दुचाकी लावली. जेमतेम उजाडलं असलं तरी त्या रस्त्यावर बर्याच दुचाकी आणि चारचाकी गाड्या लावलेल्या दिसत होत्या. तो टेकडीकडे चालायला सुरुवात करणार इतक्यात त्याला मागून हाक ऐकू आली. तो वळला. "मामा! मला वाटतच होतं तू भेटशील असं." घड्याळाकडे बघत अमित म्हणाला, "पण आज तुला उशीर झाला ? एव्हाना तू उतरत असतोस." " हं..आज उशिरा उठलो. तू खूप दिवसांनी आलास आज. मुलांना नाही आणलंस?" " नाही, अजून उठली नव्हती दोघंही.. पण तुला उठायला उशीर झाला म्हणजे आश्चर्य आहे! " मामा हसला. "रात्री टीव्हीवर बातम्या बघत बसलो होतो." दोघांनी टेकडी चढायला सुरुवात केली. " आईबाबा पण बातम्या बघत होते काल बराच वेळ. काय विशेष?" " काही खास नाही, पण जरा कुठे काही घडलं की त्याची मोठी बातमी होते. मग दोनतीन दिवस सगळीकडे तेच. नवीन बातमी मिळाली की आधीची मागे पडते." " मी हल्ली टीव्हीवरच्या बातम्या बघणं जवळजवळ सोडून दिलंय. काही महत्त्वाचं असेल तर ट्विटरवर कळतंच. तिथेही अर्थात बिनकामाचा पसारा खूप असतो. त्यात महत्वाचं असं फार कमी असतं." " सगळीकडेच तसं झालंय अमित. संख्या वाढली तसा दर्जा कमी झालाय. टीव्हीवरच्या मालिकांचं तेच, इंटरनेटवरच्या माहितीचं तेच. मी हा नवीन फोन घेतला ना, तेव्हा आमच्या कॉलेजच्या मित्रांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवला होता. सुरुवातीला छान वाटलं. पण हळूहळू गप्पा संपल्या आणि फॉरवर्ड्स वाढले. त्यातले काही काही चांगले असतीलही, पण त्यासाठी सगळं कोण वाचणार? कित्येक दिवसात मी तिथे काही लिहिलेलं नाही आणि तिथलं काही वाचलंपण नाही." अमित हसला. " माझ्या मित्रांच्या ग्रुपवर फॉरवर्ड्स जास्त नसतात, पण राजकारणाचा विषय निघाला की काहीजण तावातावाने वाद घालत असतात. त्याचा कंटाळा येतो." " तेही हल्ली सगळीकडेच असतं. राजकारणच असं नाही, कुठल्याही विषयावर वाद घालायला आवडतो लोकांना. आमचा ज्येष्ठ नागरिकांचा बागेतला कट्टा आहे ना, तिथे कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचं मत आयुर्वेदाला आणि देसाईंचं ॲलोपथीला. दोघे आपलंच म्हणणं धरून बसलेले असतात. मी म्हणतो, दोन्हीचे फायदे-तोटे आहेत. आपण तारतम्याने उपयोग करायचा." "खरं आहे." दोघे एव्हाना टेकडीवर पोचले होते. "केवढी गर्दी आहे ना टेकडीवर?" अमित आजूबाजूला बघत म्हणाला. "आज रविवार. आज सिंहगडावरसुद्धा गर्दी असते." मामा हसत म्हणाला. " चांगलं आहे... इतकी माणसं रविवारी सकाळी लवकर उठून बाहेर पडतात." "आणि सेल्फी काढून जिकडेतिकडे पाठवतात." "मामा..काय बिघडलं सेल्फी काढले तर?" "बिघडत काही नाही रे. पण ही पद्धतच पडलीये हल्ली. त्या दिवशी आपल्या सौरभच्या साखरपुड्याला बघतो तर सगळेजण फोटो काढून घेण्यात मग्न. पूर्वी कशा मस्त गप्पा व्हायच्या सगळ्यांशी अशा कार्यक्रमांमध्ये. आता बघावं तर प्रत्येकजण आपला फोन घेऊन काहीतरी बघत बसलेला असतो नाहीतर फोटो काढत असतो. शिवाय हल्ली ते एक नवीन काय असतं तुमचं..लग्नाच्या आधीचे जाहिरातीचे व्हिडिओ असतात ते.. " अमितला हसू आवरलं नाही.."मामा, जाहिरात काय अरे? प्रीवेडिंग फोटोशूट म्हणतात त्याला." "म्हणजे जाहिरातच ना? आधी लग्नाची, मग बाळ होणार आहे याची, मग बाळ झाल्याची. सिनेमातले असावेत तसे एकेक फोटो असतात." "पण आठवणी असतात त्या. आमच्या पिढीचे लहानपणीचे फारसे फोटो नसायचे. सायली मला म्हणत होती की तिला आमच्या लग्नातले तिचे स्वतःचे फोटो अजिबात आवडत नाहीत. हल्लीच्या मुलींचे लग्नाच्या निमित्ताने किती छान छान फोटो काढून होतात. आहे सोय उपलब्ध, परवडतेय, तर तिचा उपयोग का नाही करायचा? एक आहे मात्र, ते फोटो असे जाहीरपणे सगळ्यांना दाखवणं मलापण जरा जास्तच वाटतं. पण ठीक आहे. एकेकाची आवड." " खरोखर आवड असते, की गतानुगतिक होणं असतं?" " असेलही. पण गतानुगतिकता पूर्वीही होतीच की." " हो, होतीच म्हणा." " आणि सगळेच काही गतानुगतिक नसतात आमच्या पिढीचे. उलट खूपजण हल्ली नोकरी सोडून किंवा नोकरी करता करता वेगळं काहीतरी करतात. कुणी शेती करतं, कुणी समाजसेवा करतात. माझाच एक मित्र वेश्यांच्या मुलांसाठी काम करतो नोकरी सांभाळून. या गर्दीतले काही जण सेल्फीपुरते येत असतील इथे, पण खूप जण नियमित व्यायाम करतात. पूर्वी कुठे एवढी जागरूकता होती?" टेकडीवरच्या देवळाच्या कट्ट्यावर बसत मामा म्हणाला, " खरं आहे. हल्ली माध्यमं इतकी वाढली आहेत की सगळ्या गोष्टींची माहिती जिकडेतिकडे भराभर पसरते. त्याचा कधीकधी चांगलाच फायदा होतो हं अमित..मागे तेजश्रीला अमेरिकेत तिचं नेहेमीचं एक आयुर्वेदिक औषध हवं होतं आणि आपल्यापैकी कुणी इतक्यात जाणार नव्हतं. तेव्हा कुठल्यातरी वेबसाईटवर ओळख झालेली तिची मैत्रीण आहे, ती घेऊन गेली. ती राहते पुण्यालाच, पण कंपनीकडून अमेरिकेला जाणार होती. अगदी आपल्या घरी येऊन औषध घेऊन गेली. तेजश्री आणि ती कधी एकमेकींना भेटलेल्यापण नव्हत्या म्हणे तोपर्यंत. पण अगदी जिव्हाळ्याने बोलत होती." "हो, तेजू म्हणाली मला. ती तर खूष आहे या सगळ्या सोयींवर. ती तिकडे गेली तेव्हा सुरुवातीला खूप एकटी पडली होती. आता तसं नाही वाटत म्हणाली. मलाही ती तिकडे गेल्यापासून तिच्याशी आधीसारख्या गप्पा मारता यायच्या नाहीत. ती दोनतीन वर्षांतून एकदा येणार. तेव्हा नीट भेटायलाही वेळ नाही व्हायचा. पण आता तिच्याशी अगदी पूर्वीसारख्या गप्पा होतात." " हे ती आमच्याशी कधी बोलली नाही अमित..तिकडे एकटी पडली होती वगैरे. तूपण नाही सांगितलंस मला." अमित मामाच्या शेजारी कट्ट्यावर बसला. " एकटी म्हणजे कसं सांगू मामा..असं बघ..तू आणि मामीने तेजश्री आणि कौस्तुभमध्ये कधी मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाहीत. पण लग्नानंतर किती म्हटलं तरी तिचं स्थान दुय्यम झालं, जे आपल्याकडे जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये होतं. आपण तसं गृहीत धरतो. आपण म्हणजे पुरुष, आणि तुमच्या पिढीच्या बायकासुद्धा. आमच्या पिढीच्या मुलींना तुम्ही लग्न होईपर्यंत मुलांच्या बरोबरीने वाढवलंत, पण सुनेला तुम्ही मुलाइतकंच महत्त्वाचं स्थान देता का? जावयाला जो मान देता, तो सुनेला देता का? आमच्या पिढीच्या मुली स्वतःला पुरुषांपेक्षा कमी समजत नाहीत, पण आम्ही त्यांना आमच्या बरोबरीच्या समजतो का, हा प्रश्न आहे." मामा विचारात पडला. कौस्तुभला ऑफिसातून यायला उशीर झाला तर काही तक्रार नसते, पण सून उशिरा आली, की ’हि’च्या कपाळावर आठी पडते हे खरं आहे. अमित पुढे म्हणाला, " नवीन लग्न झालेल्या सुनेला अशा पक्षपातीपणाची सवय नसते, पण याची तक्रार कुणाकडे करणार? हीच पद्धत आहे, घराघरात असंच घडतं हे तिलाही दिसत असतं. मग घुसमटल्यासारखं होतं. तेजूचं असंच झालं होतं. त्यात जवळ कुणी नातेवाईक, मित्रमैत्रिणी नाहीत." मामाच्या चेहर्यावर वेदना दिसली, तसा अमितने विषय बदलला. "पण मुद्दा असा, की आता तिला रोजच्या रोज आपल्या सगळ्यांशी संपर्क ठेवता येतो. आत्ता करोनाच्या काळात तर फार उपयोग झाला या सगळ्याच माध्यमांचा." पण मामा अजूनही त्याच विचारात गढलेला होता. "बरोबर आहे तुझं. आम्ही आमच्या मुलींना स्वातंत्र्य दिलं, पण मुलांना प्रगल्भ बनवलं नाही. हे हल्ली घटस्फोट वाढलेत त्याचं हेच कारण असेल का रे? अपेक्षाच जुळत नाहीत नवराबायकोच्या." "शक्य आहे. पण प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात." "ते झालंच रे." " मामासाहेब, चला, निघू या. मामी तुझी वाट बघत असेल." " थांब जरा, आपला दोघांचा एक सेल्फी काढू." "मामा? एवढं मतपरिवर्तन केलं मी तुझं?" अमित हसत म्हणाला. "कुणाला दाखवण्यासाठी नाही, पण आज इतक्या छान गप्पा झाल्या आपल्या, त्याची आठवण म्हणून हा सेल्फी." ते हसरं प्रतिबिंब मनात साठवून ठेवत दोघे टेकडी उतरू लागले.
सेल्फी-वर्तमानाचं प्रतिबिंब
Categories:
