‘तसं काहीच नसतं. छंदबद्ध, वृत्तबद्ध केली तरच ती कविता होते असे नाही. त्यात काव्य काय आहे हे महत्वाचे. कवितेतला अनुभव असतो तो स्वतःचा बाज घेऊन येतो.’
‘शब्दमर्यादा डोक्यात ठेवून कथा लिहिणे आवश्यक नाही. सांगायचे आहे ते सांगितले जाणे महत्वाचे आहे.’
नुकताच ‘सरस्वती पुरस्कार’ मिळालेल्या साहित्यिक विद्यावाचस्पती अरुणा ढेरे यांनी हे मार्गदर्शन केले. त्यांनी साहित्य संमेलनातील किस्सा सांगितला. रत्नागिरीच्या त्या साहित्य संमेलनात अरुणाताईंनी सादर केलेल्या मालिनी वृत्तातल्या कवितेत एका ओळीत एक मात्रा जास्त होती. श्रोत्यांमधे असलेल्या मंगेश पाडगावकरांना ते लक्षात आले आणि त्यांनी ते नंतर मिश्किलपणे बोलूनही दाखवले. असो. थोरा-मोठ्यांचा संवाद आहे. पण माझ्या लक्षात आले की, ती कविता मालिनी वृत्तात होती हे अरुणाताईंना माहिती होते. त्यांचा छंद-वृत्त याचा अभ्यास आहे. त्या मराठीच्या विद्यावाचस्पती आहेत. अशा व्यक्तीने यमके, वृत्तबद्धता या संबंधी आम्हाला मार्गदर्शन केले, शब्द केला. तो शब्द ‘एक सशक्त शब्द’ झाला. तो पोहोचला. कळला. तो पटला. ‘मातीत एखादे निरामय बीज रुजावे तसा त्यांचा सशक्त शब्द’ श्रोत्यांच्या मनात खोलवर रुजला.
अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनात बेंगळूरुमधल्या मराठी भाषा प्रेमींसाठी महाराष्ट्र मंडळाने आयोजित आणि संचालित केलेल्या या लेखन कार्यशाळेत ३० च्यावर बेंगळूरुकर मराठी लोकांना हा सशक्त शब्द ऐकण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे कै. सरस्वती रिसबुड यांच्या कन्या आणि मंडळाच्या अध्यक्षा सौ. माणिक पटवर्धन आणि उपाध्यक्ष श्री. ओंकार संगोराम यांनीही या कार्यशाळेला पूर्णवेळ आणि सक्रिय हजेरी लावली. बेंगळूरुमध्ये मराठी भाषिकांची एकंदर सक्रियता या उपस्थितीपेक्षा कितीतरी अधिक असली तरी कार्यशाळेचे स्वरूप आणि उपलब्ध कालावधी याला पुरेशी संख्या झाल्यामुळे आयोजकांना नोंदणी थांबवावी लागली हे फार आशादायक आहे.
संयोजन समितिच्या सदस्या स्मिता बर्वे, रेवती कुलकर्णी आणि राधिका मराठे यांनी सुरुवातीलाच अरुणाताईंचे बालपण आणि तरूणपण कसे गेले यासंबंधी विचारले आणि ‘(साहित्याचं.. ही) बीज रुजायला किंवा पिंड तयार व्हायला पोषक माती, वातावरण लागते.’ हा मुद्दा अरुणाताईंना नंतर वेगळा समजावून सांगावा लागला नाही. आधी हा मुद्दा सांगून, नंतर संदर्भासहित स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांना तो मुद्दा त्यांच्या ह्या छोटेखानी मुलाखतीचा निष्कर्ष म्हणून उधृत करता आला. नंतर कार्यशाळेची सूत्रे अरुणाताईंनी हाती घेतली. ३१,००० च्यावर पुस्तकांच्या संगतीत वाढलेल्या अरुणाताई एकीकडे आणि एका वेळेला हातात धरता येतील एवढीच पुस्तके वाचलेले, २-४ लेख, कविता प्रयत्नपूर्वक लिहिलेले बहुसंख्य लोक दुसरीकडे. तरी ही अरुणाताई आमचे बोबडे बोल ऐकायला आसुसलेल्या पाहून त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला.
संगोराम यांची अर्थपूर्ण कथा, विशाखा पंढरपुरे आणि वैशाली चौधरी यांच्या कविता, जयश्री पोतनीस यांच्या वाचनातली नाट्यमयता याची अरुणताईंनी आवर्जून दखल घेतती. मी वाचलेल्या उतारा पाखडून अधिकचा वाटणारा शब्द अरुणताईंनी खड्यासारखा बाहेर काढला. विद्या चिडलेंच्या कवितेतल्या एका शब्दाला पर्यायी शब्द शोधायला सांगितले. आश्चर्य म्हणजे, ‘आपल्याला सुचत नाही तेव्हा चार लोकांशी चर्चा करावी’ असे अरुणाताई म्हणत असतांनाच विद्याताईंना योग्य पर्याय गवसला! तथापि, अरुणाताईचे ते मार्गदर्शन ‘योग्य शीर्षक न सुचणे’ या माझ्या समस्येवर केलेले होते.
शिल्पकार करमरकर आणि इरावती कर्वे या दोन करमरकर कुलोत्पन्नांचा उल्लेख अरुणाताईंनी केला. आम्हा प्रशिक्षणार्थींपैकी सिद्धार्थ गायकवाड यांच्यासारख्या तरुणाचा वाचनाचा आवाका मला थक्क करून गेला. देवयानी मुरगुडकर या जर्मन भाषातज्ञ असल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि अरुणाताईंनाही कविता अनुवादित करता यावी इतकी जर्मन भाषा येते, हा त्यांचा पैलू लकाकला. चर्चा रंगात येतच होती, पण वेळ कमी पडला. आदल्या दिवशीच्या ‘सरस्वती पुरस्कार’ प्रदानाच्या सोहळ्यालाही मंडळाने आम्हाला अगत्याने बोलावले होते. तेव्हा गेलो असतो तर त्या कार्यक्रमानंतर कदाचित अरुणताईंचे वैयक्तिक मार्गदर्शन घेता आले असते, त्यांचा सहवास मिळाला असता, कार्यशाळेत कमी पडलेला वेळ आदल्याच दिवशी भरून काढता आला असता असे वाटून गेले. पण पश्चातबुद्धीचे फळ पश्चात्ताप!
कमीतकमी अक्षरांमध्ये ओळख समजते अशा थोर साहित्यिकांनी स्वतःच्या नावातली उरलेली अक्षरेही वाटून टाकलेली असतात बहुधा. राचिं, मेपुं, गोनी, नासी, गदि, पुल, वपु, बाभ म्हटले की नेमकी तीच माणसे समोर येतात. यातल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त रा. चिं. ढेरे यांच्या अरुणताई या कन्या. तेजःपुंज चेहेरा, क्षणात विद्यार्थ्यासारखी जिज्ञासू वाटणारी आणि क्षणात गुरुसारखी अंतरंगाचा ठाव घेणारी नजर, स्पष्ट पण विनयशील वाणी, काटेकोर स्वभाव कमावलेल्या अरुणाताई. ‘आत्ताच्या बालगोपाळांचे पर्यावरणाशी नाते प्रयत्नपूर्वक जोडायला हवे.’ हे अरुणाताई तळमळीने सांगतात. रा.चिं.ढेरेंनी त्यांना पुस्तके वाचायची गोडी लावावी यात नवल नाही. पण त्यांनी, त्यांना निसर्ग वाचायचीही गोडी लावली. त्याचे अरुणाताईंनी केलेले वर्णन सगळ्या पालकांना मार्गदर्शक आहे. संस्कार करणे, संगोपन करणे म्हणजे खूप काहीतरी वेगळे, आयुष्याचा महत्वाचा वेळ ‘खर्च’ करून करायचे वगैरे काम आहे असे मुळीच नाही. आपली सामान्य दिनचर्या आचरताना स्वतःची ज्ञानेंद्रिये खुली ठेवली आणि मुलांनाही तसे करायची सवय लावली की तेवढी गुंतवणूक पुरे आहे. रा.चिं. ढेरेंनी ते केले आणि त्या संस्कारांना जी फुले आली त्यातले एक म्हणजे अरुणताईंचे ‘राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन परिषदे’चे पारितोषिकप्राप्त बालसाहित्य. सुपीक मातीत सशक्त बीज रुजले की त्याचा (ढे!)रेदार वृक्ष होतो तो असा. मला तर असे वाटले की अरुणाताईंच्याच एका कवितेतला ‘एक उष्ण सशक्त शब्द’ म्हणजे त्या स्वतःच आहेत आणि त्यांची वाणी म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचलेली त्या शब्दातली ऊबदार अक्षरे.
‘कविता कशी सहज बोलल्यासारखी असावी’ हे समजावून सांगाण्यासाठी त्यांनी कवी अरुण कोल्हटकर यांची ‘वामांगी’ ही कविता वाचून दाखवली. लयदार बोलणे असावे तशी ती कविता. त्यातला खोल विचार अरुणाताईंनी समजावला आणि माझे विचारचक्र फिरू लागले. खरेच, कुठे बरे गेला असेल विठू? आणि काय आश्चर्य! साहित्य अकादमीचा पुरस्कार रा. चिं. ढेरेंना ज्या शोधग्रंथासाठी मिळाला, त्या ‘विठ्ठल: एक महासमन्वय’ या पुस्तकात याचे उत्तर विषद आहे असे मला वाटले. विठ्ठल हा मुळात यादव जाती-जमातींचा म्हणजे गवळी-धनगरांचा लोकदेव आहे असे या ग्रंथात शोधकर्त्यांनी सांगितले आहे. अहो, मग बरोबरच आहे. आपल्या या भक्तांबरोबर त्यांचे भले करणार्या देवाला भटकायला लागणारच! गेला असेल, ‘जेथे जातील तेथे तो त्यांचा सांगाती, चालवाया हाती धरोनीया’.
‘वामांगी’ या कवितेतल्या प्रसंगावेळी विठू तिथे नाही. विठ्ठलावर प्रश्न निर्माण करणार्या ह्या प्रसंगाला ‘प्रश्ना’र्ध ठरवून, त्याचा ‘उत्तरा’र्ध काय असेल याची मी कल्पना केली. ती तुम्हाला सांगायचा मोह होतोय. त्या मोहाच्या झाडाचे पान तुम्हाला देऊन माझा हा लेखन प्रपंच संपवतो:
रखमाईची व्यथा ऐकून
परत फिरलो तेव्हा…
कोणीतरी येत होतं.
बघतो तर काय,
येणार्या भक्ताच्या पाठून
पुढे येऊन विठू;
विटेवर जाऊन
कटीवर हात ठेवून
राहिला की उभा …
मी तिथेच थांबलो
भक्त तो जाईपर्यंत.
विठुला विचारलं मग
काय रे हे असं?
तर म्हणतो कसा,
आत्ताच एक भक्त
इथं डोकं ठेवून गेला.
तुला दुरून पाहून
मला कळलं होतं;
कोणाचेही पाय चालतील
तुला डोकं ठेवायला ..
परतही घेऊन जाशील,
तुझं डोकं आठवणीने.
म्हणून निघालो घाईने,
त्या भक्ताचं डोकं
त्याच्या मानेवर ठेवायला.
ते ठेवतो न ठेवतो तोच
मला हा येतांना दिसला.
दिसलो नसतो त्याला
मी या इथे तर… तर
डोक्याबरोबर धडही
ठेवलं असतं त्याने.
म्हणून तातडीने आलो,
आणि राहिलो उभा.
अशाच फेर्या मारतो मी…
नाकासमोर बघणार्या
रखमाचा आणि माझा,
तिच्या डोळ्याआडचा
संसार सांभाळायला.
खंबीर उभी असते
रखमा पूर्ण एकटी
आणि मी भटकतो
अर्धांगीविना, अर्धाच…
पुरुदत्त रत्नाकर
