सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
सर्वप्रथम नुकत्याच पार पडलेल्या साहित्योन्मेष स्पर्धा सांगता समारंभ आणि प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने हजर राहून आमचा आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! आपल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे आगामी कार्यक्रम आपण अधिकाधिक ऊर्जेने सादर करू शकतो असा कार्यकारिणीला विश्वास वाटत आहे.
मराठी दिनदर्शिकेतील चैत्र महिना म्हणजेच मार्च महिना आपल्यासोबत किंचित प्रखर सूर्यकिरणे घेऊन येतो आणि वातावरणातला उरलासुरला हलका गारवा देखील काढता पाय घेतो. हुताशनी पौर्णिमेनंतर सारी सृष्टी आम्रपल्लवीचे तोरण हाती घेऊन सज्ज होते. नवी स्वप्ने, नवे संकल्प योजण्याची गुढी उभारली जाते. आमच्या सर्व वाचकांना धुलीवंदन आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
याच महिन्यात ८ तारखेला ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात येतो. नारी शक्तीची दखल घेण्याचा, सन्मान करण्याचा दिवस!
‘स्वकृता चॅरिटेबल ट्रस्ट’, महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने १० मार्च रोजी मंडळाच्या सभागृहात महिला दिनाचा कार्यक्रम सादर करत आहे. या कार्यक्रमात “यक्षगान” ह्या कर्नाटकातील सुप्रसिद्ध लोक नृत्यनाट्याचा आविष्कार एका महिला संघाकडून सादर केला जाईल. कृपया आपण हा कार्यक्रम पाहण्याची संधी चुकवू नका.
२२ मार्च रोजी संस्थापक दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी मंडळाची ‘AGM – वार्षिक सर्वसाधारण’ सभा होणार आहे. आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. याविषयी अधिक माहिती लवकरच दिली जाईल.
यावर्षीचा योगदान आणि अभिमान पुरस्कार सोहळा दिनांक २ एप्रिल रोजी होणार आहे. सर्व सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. ह्या कार्यक्रमांसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे.
कळावे,
लोभ आहेच; तो वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा !
राधिका मराठे
सनविवि टीम