सभासदांची लेखणी

खमंग मराठी

“ती खूप गोड स्वभावाची आहे.” “त्याला बघ, कशा मिरच्या झोंबल्या!” “अगदी कोरडी प्रतिक्रिया मिळाली त्यांच्याकडून.” अशी कितीतरी वाक्यं आपण सहज बोलतो. ती ऐकताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते.

आपण भाषा शिकतो शाळेत. पण भाषेचा स्वभाव शिकतो घरात. विशेषतः… स्वयंपाकघरात. 

”जीवनात ही ‘कढी’ अशीच राहूदे’‘ हे विडंबनच खरं गाणं आहे अशा भ्रमात मी खूप वर्षे होते, कारण आमच्या घरात बाबा, मामा आणि आजीसुद्धा पट्टीचे खाणारे होते. आमच्या घरी एकत्र पंगतीत बसणं हे एका सोहळ्याहून कमी नव्हते. आणि सोहळा म्हटलं की विविध भावना आल्याच. आज मागे वळून पाहताना जाणवतं, त्या पंगतीत आम्ही फक्त जेवत नव्हतो; आम्ही भाषाही शिकत होतो.

म्हणूनच कदाचित आपल्या मराठीत एखाद्याचं वर्णन करताना किंवा माणसांना समजून घेताना चव, पोत आणि स्वयंपाक यांची भाषा नकळत वापरली जाते.

का बरं?

कारण स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचं ठिकाण नव्हे. ते घराचं केंद्र आहे. तिथे संवाद होतात, भांडणं होतात, समेट होतात, सण साजरे होतात, कौतुकं होतात आणि नात्यांना आकार मिळतो. जे रोज अनुभवाला येतं, त्यातूनच भाषा जन्माला येते.

मानसशास्त्रात एक संकल्पना आहे. आपण अमूर्त गोष्टी समजून घेण्यासाठी ठोस अनुभवांचा आधार घेतो. इंग्रजीत याला *Conceptual Metaphor* असं म्हणतात. म्हणजेच आपल्या दैनंदिन अनुभवांतून आपण भावना, स्वभाव आणि नात्यांना अर्थ देत असतो.

मराठीत तर भावनांनाही चव असते.

“गोड” हा शब्द फक्त साखरेपुरता मर्यादित राहत नाही; तो स्वभाव होतो. “तिखट” मिरचीतून बाहेर पडून बोलण्यात येतो. काही अनुभव “कडू” असतात आणि व्यक्तिमत्त्वही “फिकं” होऊ शकतं. एखाद्याच्या बोलण्यात “गोडवा” असतो, तर काहीजण “मीठ-मसाला लावून” गोष्ट सांगतात. 

गंमत म्हणजे ही रूपकं फक्त चवीपुरती मर्यादित नाहीत. आपण गोष्टींना “फोडणी” देतो, एखादा विषय “चघळत” बसतो, कुणाच्या बोलण्यावर “तेल ओततो”, एखादी कल्पना “शिजते”, तर काही नाती “करपतात” आणि काही गप्पा “खमंग” असतात. म्हणजे स्वयंपाकघराने आपल्याला फक्त पदार्थच दिले नाहीत; विचार करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची एक दिशाच दिली. त्याचमुळे मायबोली मराठीची समृद्धतादेखील आपल्याला कळली.

हे केवळ मराठीतच नाही. प्रत्येक संस्कृती स्वतःच्या दैनंदिन जगण्यातून रूपकं तयार करते. समुद्रकिनारी राहणाऱ्या समाजात समुद्राची रूपकं आढळतात, तर वाळवंटात वाऱ्याची. महाराष्ट्रात मात्र अनेक पिढ्यांपासून स्वयंपाकघर हे घराचं हृदय राहिलं. त्यामुळे तिथली चव, वास, उकळी, फोडणी, मसाले आणि खमंगपणा आपल्या भाषेतही सहज उतरला असावा.

आणि एक आश्चर्याची बाब म्हणजे या शब्दांचा अर्थ आपल्याला कोणी वेगळा शिकवत नाही. “गोड माणूस” म्हणजे काय किंवा “तिखट बोलू नकोस” याचा अर्थ शब्दकोशातून समजत नाही. तो समजतो अनुभवातून. लहानपणी आई, आजी, बाबा किंवा घरातली मोठी माणसं हे शब्द वापरतात आणि नकळत आपल्या मनात भावना आणि चवी यांची सांगड बसत जाते. म्हणूनच भाषा ही फक्त संवादाचं साधन नसते; ती एका संस्कृतीची चव जपणारी स्मृती असते.

कदाचित म्हणूनच जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहणारा मराठी माणूस “गोड माणूस” म्हटलं की हसतो आणि “तिखट बोलू नकोस” म्हटलं की अर्थ लगेच समजतो. त्या शब्दांचा अर्थ शब्दकोशातून येत नाही; तो घरातून येतो. भाषेची ही गंमतच आहे. आपण रोज वापरत असलेले शब्द इतके सवयीचे होतात, की त्यांच्या मागची संस्कृती आपल्याला दिसेनाशी होते. एखाद्या परदेशी व्यक्तीला “गोड माणूस” किंवा “खमंग गप्पा” याचा शब्दशः अर्थ समजावून सांगता येईल; पण त्यामागचा अनुभव मात्र जगावा लागतो. आणि कदाचित तिथेच मातृभाषेचं खरं सौंदर्य दडलं आहे.

भाषा ही शब्दांची यादी नसते; ती जगण्याची पद्धत असते. म्हणूनच कदाचित आपल्या स्वयंपाकघराने आपल्याला फक्त चवी दिल्या नाहीत, तर माणसं समजून घेण्यासाठी शब्दही दिले. आणि म्हणूनच मराठी आजही इतकी… खमंग वाटते. पुढच्या वेळी वदनी कवळ घेता म्हंटल्यानंतर ताटातील अन्नाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पहा. कारण माणसांच्या भावना समजावून सांगताना आपल्या मराठीने अनेक शब्द स्वयंपाकघरातूनच उसने घेतले आहेत.

              –  अंकिता जोशी. बुद्धीघर 

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *