वर्षा सबनीस
नोव्हेंबर २०२१ मध्ये जेंव्हा साहित्योंमेष स्पर्धेबदल कळले , तेंव्हा मन जरा साशंक होते . बारा महिन्यात बारा लेख लिहायचे होते . जमेल का मला ? बरं,नुसते लिहायचेच नाही, तर हे लेख महाराष्ट्र मंडळाच्या स. न. वि. वि. ह्या मासिका मध्ये छापून पण येणार…? मनावर प्रचंड दडपण आले. चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी शाळेत असताना निबंध लिहीत होते . आता परत जमेल का ? अमराठी प्रांतात गेली ३५ वर्षे राहिल्यानंतर, मराठी भाषेशी बोलण्या व्यतिरिक्त फार कमी सबंध आला होता . बोलण्यात किती तरी इंग्रजी शब्द यायचे .मराठी बोलता बोलता नकळत इंग्रजी भाषा तोंडी येते . अलीकडे पत्र लेखन इतिहासजमा झाल्यामुळे तिथूनही माय मराठीशी संबंध यायची शक्यता कमीच. असे असताना बारा लेख लिहिण्याची स्पर्धा कशी झेपेल ? उगाच स्वतःचे हसे करून घेणे शहाणपणाचे नाही ठरणार . नकोच .असे म्हणून गप्प बसले .पण माय मराठी चे प्रेम गप्प बसू देईना . एक मन म्हणत होते , “अग मातृभाषा आहे ना ती तुझी ? अशी कधी विसरू शकते का ? थोडे अवघड होईल इतकंच .जसे जसे लिहायला सुरुवात करशील, तसे तसे आठवतील शब्द “ तर दुसरे मन म्हणत होते,” उगीच शोभा नको.”
खर तर ,अलीकडे सतत लिहायची खुमखुमी यायची . कुठल्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आलो की असे वाटायचे की मनाच्या कॅमेऱ्याने टिपलेली चित्रे शब्दात बंदिस्त करून ठेवावी . ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची ठरली की आधी त्याच्या इतिहासाचा अभ्यास व्हायचा . असे वाटायचे की ह्याच्या नोंदी असाव्यात. कधीतरी ते वाचले की ते क्षण परत जगता येतील. शिवाय कुणी माझ्यासारखे भटके भेटले, तर त्यांना ह्या तपशिलाची मदतच होईल .
तर अस्मादिकांची लिखाणाची कारकीर्द अशी सुरू झाली . प्रवासवर्णने , पत्रलेखन करायला सुरुवात झाली . साहित्योंमेष स्पर्धेने नवनवीन विषय देऊन मला चाळीस वर्षांनंतर परत अभ्यास करायला भाग पाडले , हे कबूल करायला मला अजिबात कमीपणा वाटतं नाही .
प्रत्येक विषयावर जे तपशील द्यायचे त्याचा अभ्यास करून ते पडताळून बघणे आवश्यक होते . त्यामुळे अभ्यासात माझा वेळ ही छान जायला लागला.
सुरुवातीचे काही लेख लिहिताना सतत इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधायला लागायचे . पण जसे जसे लिहीत होते तसे जुने वाचलेले शब्द आठवायला लागले . नवीन वाक्य रचना, नवीन संदर्भ सुचायला लागले . विषय उकलून त्याची मुद्देसूद मांडणी करता यायला लागली . लहानपणी शाळेत अनेक विषयांवर निबंध लिहिले होते, पण आता आजच्या युगात सगळे संदर्भ, आराखडे बदलले आहेत .पण माय मराठी तर तीच आहे ना ?
असो, तर साहित्योंमेष स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. सुरुवातीला आपल्या आवडीच्या विषयांवर लिखाण करायचे होते . ते लेख तर जवळपास तयारच होते . तिसऱ्या लेखानंतर आयोजकांनी एकेक विषय द्यायला सुरुवात केली . आणि तेंव्हा “ आप कितने पानी मे हो “ह्याचा प्रत्यय आला . आयोजकांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करावे तितके थोडे आहे . त्यांनी स्पर्धकांच्या लेखणीचे सामर्थ्य आजमावून बघायचा जणू चंगच बांधला होता .
प्रत्येक विषयाकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघणे आवश्यक होते .आत्मवृत्त, निसर्ग प्रेम इत्यादी विषय बुद्धीला चालना देणारे होते, तर काही विषय वादविवादाच्या स्वरूपाचे होते . त्यांचा अभ्यास करतांना नाण्याच्या दोन्ही बाजूंचे समर्थन करायचे होते.
दिलेल्या विषयातून वेगवेगळे विषय निवडून लेखनात वैविध्यता आणायचा मी प्रयत्न केला. त्यातूनही काही विषय जरी माझ्या फार आवडीचे होते , तरीही थोडा अभ्यास तर करावाच लागला . आपण देत असलेली माहिती पूर्णपणे खरी आहे की नाही हे अनेकदा तपासून बघायची सवय लागली . लिहिलेले उतारे पुन्हा पुन्हा वाचून व्याकरणाच्या चुका नाहीत ना, हे पडताळून बघितले. तरीही अनावधानाने काही त्रुटी राहिल्या असतीलही. इतक्या वर्षांनंतर मराठी भाषेशी परत संबंध जोडल्या जाण्यात असलेला आनंद अवर्णनीय होता. शब्दांकरता चाचपडणे बंद झाल्याचा अपार आनंद होता . हा आनंद दिला साहित्योंमेष स्पर्धेने .
प्रत्येक महिन्यात स.न.वि.वि. प्रकाशित झाले की अधाश्यासारखे सगळे लेख वाचायचे आणि मग आपला लेख कुठे कमी पडतो आहे, ह्याचे तुलनात्मक विश्लेषण व्हायचे. पण ते फक्त दोन ते तीन महिनेच झाले. नंतर मात्र मी स्वतःच्याच लिखाणात रमून जात होते , त्याचा आनंद घेत होते . स्पर्धा चुरशीची होणार हे तर माहितीच होते, पण आता मी त्या स्पर्धेचा विचारही न करता , आपल्या लिखाणात प्रगल्भता आणायचा प्रयत्न करू लागले . त्यात यश कितपत आले आहे हे परीक्षकच ठरवतील .
प्रत्येक महिन्यात साधारण दहा तारखेनंतर पुढच्या महिन्याचे विषय यायचे . त्याची उत्सुकता असायची . मिळालेल्या विषयांवर सखोल विचार करून ,मुद्दे तयार करून, दिलेल्या शब्द मर्यादेत, नेमक्या शब्दात त्याची मांडणी करायची . शेवटी लेख पूर्ण झाला की आपली कलाकृती निर्माण झाल्याचा आनंद व्हायचा. हे समाधान साहित्योंमेष स्पर्धेने दिले. माझ्यासारख्या नवशिक्या लेखिकेला हा आनंद अवर्णनीय होता .
आता पुढच्या महिन्यापासून काय करायचे हा प्रश्न समोर उभा आहे . लिखाणाची लागलेली सवय , विचारशक्तीला सतत कार्यरत रहायची सवय , मला स्वस्थ बसू देणार नाही. अवतीभोवती दिसणाऱ्या निसर्गावर , घडणाऱ्या प्रसंगांवर , व्यक्तींवर लिहिण्यासारखे बरेच विषय सुचायला लागले आहेत . हे सुध्दा साहित्योंमेषचेच देणे .
स्पर्धेच्या सांगतेला आमचा अनुभव कथन करायची संधी परीक्षकांनी दिली . मनात दाटून राहिलेली कृतज्ञता व्यक्त करता आली .खूप छान वाटले . त्याबद्दल आयोजकांचे आभार कसे मानावे हा मोठाच प्रश्न आहे . बरेचदा काही भावना प्रत्यक्ष न बोलता , लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त करता येतात .हा लेखातून माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे . स्पर्धा असो वा नसो , लिखाण सतत सुरू ठेवणे म्हणजेच साहित्योंमेष चे ऋण फेडणे हे ह्या पामराला कळले आहे ….त्रिवार अभिवादन …..