गुंतता हृदय हे

— माणिक नेरकर —

” आर यू सिरीयस ? तू अरेंज मॅरेज करणार विशू? रिअली?”

” का? नाही करू शकत का? “

“ओह! डोन्ट बी सिली डियर!  आजकाल कोण करतो तूच सांग मला. एव्हरीवन वॉन्टस टू फॉल इन लव्ह. मी तर बाबा लव्ह मॅरेज च करणार. हम तो जानी, प्यार करेगा—- और उसीसे शादी भी करेगा—-“

“मला विचारशील ना सौम्या, तर हे प्यार,व्यार सब दिखावा होता है यार. खरं प्रेम सहवासाने निर्माण होतं, रादर ते आतून  उमलावं लागतं. आणि ठरवून केलेल्या लग्नाची बातच काही और आहे. मला तो अनुभव घ्यायचा आहे.ते एकमेकांकडे टाकलेले चोरटे कटाक्ष, सगळ्यांच्या नजरा चुकवून केलेले स्पर्श— त्यातला रोमान्स, ते थ्रिल —-“

“बस्स कर बाबा तुझी ही साहित्यिक भाषा. एखाद्यावर प्रेम करायला आणि एखाद्याचं प्रेम स्वीकारायला देखील जिगर लागतं, समझी जाने मन? छोड यार, ये प्यार व्यार के चक्कर मे तू  ना पडे तोही अच्छा है—- ” गाडीत बसल्या बसल्या विशाखाला तिच्या आणि सौम्या मधील हा संवाद आठवत होता अन ती गालातल्या गालात हसत होती. “काय ग वहिनी, दादाने सगळ्यांच्या नजरा चुकवून काही  खोडी काढली की काय?”  स्वतःशीच हसते आहेस ती—” समोर बसलेल्या रेवा ने विचारलं तशी विशाखा भानावर आली चट्कन.  पण अक्षय आपल्या अगदी बाजूलाच बसलाय आणि त्याचा ओझरता स्पर्शही आपल्याला किती सुखावतोय हे जाणवत होतं तिला. नकळत तिच्या चेहऱ्यावर लाली चढली आणि परत एकदा रेवाला तिला चिडवायला संधी मिळाली. 

“विशाखा, तुझी ती बेस्ट फ्रेंड, सौम्या नाव ना तिचं? ती नाही आली ग लग्नाला?” विशाखा च्या बोलण्यातून  फोनवर सौम्या चा उल्लेख ऐकलेला असल्याने  अक्षय ने अचानक विचारलं. काय सांगणार होती ती?  सौम्याच्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर क्षणात  विषादाची छटा पसरली.लव्ह मॅरेज च करणार म्हणता म्हणता सौम्याचे चक्क 3 ब्रेक अप झाले होते. आणि  नेमकं लग्नाच्या वेळी ती येऊ शकली नव्हती. कारण ती  “डिप्रेशन” मध्ये गेली होती आणि विशाखाचं लग्न इतक्या तातडीने जमलं होतं की तिला भेटायला जाणं देखील झालं नव्हतं. सौम्याच्या  दीदी कडून तिला सर्व वृत्तांत कळला होता; पण  तिचाही नाईलाज होता. सौम्याची उणीव पदोपदी तिला जाणवत होती. सगळं कसं अचानकच घडलं होतं. अक्षय चे बाबा  अचानकपणे घरी येतात काय, विशाखाला बघतात काय आणि आपल्या बाबांकडे आपल्याला मागणी घालतात काय– – सगळंच अगदी स्वप्नवत वाटावं असच घडलं होतं. विशाखा चे बाबा आणि अक्षय चे बाबा अगदी जिगरी दोस्त, — पण गेल्या कित्येक वर्षांपासून ते आणि त्यांची फॅमिली सिंगापूरला शिफ्ट झाली होती. मुंबईत कंपनी च्या एका अर्जंट कामानिमित्त त्यांना यावे लागले होते आणि त्यावेळी  आपला हक्काचा मित्र म्हणून ते आपल्या घरीच उतरले होते. 2 दिवस त्यांच्या सहवासात कसे मजेत गेले होते सगळ्यांचेच. एकदम हसतमुख आणि उमद्या स्वभावाचे वाटले ते विशाखाला. निरोप  घेते वेळी त्यांना  अचानक गहिवरून आलं. ” विनायका, दोस्ता, एक फेवर करशील माझ्यावर?  आम्हाला  मुलगी नाही रे. हिला फार हौस होती मुलींची; पण-    —- तुझी ही गुणी लेक घालशील आमच्या पदरात?”

 काही क्षण कुणालाच काही समजेना, सुचेना ते काय बोलताहेत ते.

 आणि अचानक बाबा बोलून गेले, ” दिली—- आमची लेक तुला दिली—- काय, चिमणे,  आवडेल ना तुला सिंगापूरला जायला?” आपण तर पुरत्या भांबावून, गोंधळून गेलो होतो;  कोण कुठला तो अनोळखी  मुलगा-  — कधी बघितलं नाही, बोललो नाही आणि चक्क लग्न? छे: पण बाबांचा शब्द आणि आपली अट, ठरवून लग्न करण्याची। —- दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या आणि आपण चक्क होकार देऊन मोकळे झालो. त्यांच्या घराण्यात कुणीतरी जवळ ची व्यक्ती ” गेलेली” होती, त्यामुळे ताबडतोब  “शुभ मंगल ” करणे भाग होते, अन्यथा पुढचे 3 वर्ष लग्न होणे नव्हते. 

” काय ग? कुठे हरवलीस? मी काहीतरी विचारलं तुला—-” “अं ? मला काही म्हणालात?”—-तेवढयात कुणीतरी गाण्यांच्या भेंड्या खेळूयात म्हणून टूम  काढली आणि एकच गलका सुरू झाला. खेळ ऐन रंगात आलेला असतांना  गाडी  ला करकचून ब्रेक लागला आणि झटका बसल्यागत गाडी थांबली. गाण्यात रंगून गेलेल्या तरुण मंडळींचा विरस झाला, तर म्हाताऱ्या कोताऱ्या मंडळीला दिलासा मिळाला, चला, जरा वेळ पाय मोकळे करायला मिळतील आणि अर्थात चहा पाण्याचा आस्वाद घेता येईल म्हणून–   — तर घरातील जबाबदार मंडळी मात्र चिंतातुर झाली.  कोकणातल्या मूळ गावी पोचायचे होते, कुलदेवतेच्या दर्शनासाठी. जितक्या लवकर पोचू तितके  चांगले—-; काय झालं, ड्राइवर साहेब, मधेच गाडी का थांबवलीत?” कुणीतरी  विचारलं पण ड्रायव्हर महाशयांचा चेहरा पांढरा फटफटीत पडलेला-    — तोंडाचा आ वासलेला आणि भीतीने डोळे विस्फारलेले-  —-  नेमकं काय झालं म्हणून बघायला  काही सिनियर मंडळी खाली उतरली.गाडी नुकतीच कुठे मुंबईच्या बाहेर पडत  होती आणि आता ही कुठली आफत आली म्हणून प्रत्येक जण चिंतातुर झाला.  अक्षय देखील खाली उतरला आणि त्याच्या मागोमाग सगळे नाही नाही म्हणत असताना देखील विशाखा—कारण  बसमधून   तिला “त्याचा” चेहरा दिसला आणि तिच्या पोटात धस्स झालं.  हा इथे कसा? त्याच्या हातात धारदार शस्त्र होते, अगदी घाव घालण्याच्या पावित्र्यात उगारलेले आणि आजूबाजूची माणसं त्याला आटोक्यात आणण्याचा  प्रयत्न करत होती. कशीबशी गर्दीतून वाट काढत ती त्याच्या पर्यंत पोचली आणि—– तिला बघताच त्याच्या डोळ्यात अंगार पेटला जणू. एका झटक्यात  तिच्याकडे धाव घेत त्याने तो धारदार सुरा तिच्यावर उगारला; पण— अचानकपणे “तो” मध्ये आडवा आला. तिनं डोळे विस्फारून पाहिलं. होय, तो अक्षय होता. तिच्याशी  नुकताच लग्नगाठीत बांधला गेलेला. कुणाला काही कळायच्या आतच अक्षय खाली कोसळला. आणि हे सारं नजरेचं पातं लवतं न लवतं इतक्या कमी अवधीत घडलं—- घाव घालून तो ताबडतोब तिथून पसार झाला आणि इकडे मात्र रडारड, गोंधळ सुरू झाला. अक्षयला ताबडतोब जवळच्याच एका मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

 हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ती नववधूच्या वेशात विमनस्क अवस्थेत बसली होती. डोळ्यात अखंड पाणी आणि मनात प्रचंड काहूर घेऊन.  

 आकाश असं काही करेल ह्याचा स्वप्नात देखील विचार तिने केला नव्हता. इतक्या वर्षांपासून ओळखतो आपण त्याला. शेजारच्या जोशी काकुंचा एकुलता एक लेक.  बरोबरीच्या वयाचा  असल्याने घरी यायचा दादा सोबत खेळायला. अभ्यासात देखील खूप मदत करायचा. होता मात्र मितभाषी. त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनाचा थांग कधी लागला नसता; पण मग हे असलं काही असेल त्याच्या मनात आपल्याविषयी? छे: कल्पना देखील करवत नाही. आपला शाम दादा तसा तो आपल्याला, ह्यापेक्षा आपण त्याच्या कडे दुसऱ्या कुठल्या नजरेनं पाहिलंच नाही. इतकी “जवळ रहाणारी, परिचय असलेली” व्यक्ती अशी वागू शकते? इतक्या टोकाला जाऊन? आणि अक्षय? आपला नवरा? ज्याची जेमतेम महिनाभराची ओळख—- लग्न ठरल्यानंतर प्रत्यक्ष भेट देखील फ़क्त एकदाच झालेली—-हां, फोनवर मात्र  बोलणं होत होतं; पण त्यातही “इन जनरल ” गप्पा त्याही मोजक्याच असायच्या.  निव्वळ विवाहबंधनात अडकलो गेलो म्हणून अक्षय ने हे एवढं मोठं धाडस केलं असेल? छे: तो मुळातच अतिशय संवेदनशील मनाचा असणार.  आणि नात्याची बांधिलकी, नात्यातील नाजूक बंधाची त्याला पुरेपूर जाण असणार. त्याशिवाय का कुणी जिवावर उदार होईल? 

 अजून तर आमच्या सहजीवनाला सुरुवात देखील झालेली नाही,अजून तर आमचा पुरता सहवास देखील घडला नाही,तरीही—? जसाजसा विशाखा अक्षय बद्दल विचार करत होती तसातसा त्याच्या विषयीचा आदरभाव मनात वाढत होता आणि हो, प्रेमभावना देखील. एक अनोळखी, अनाहूत, हळुवार भावना हृदयात जागी होत होती, जी हवीहवीशी वाटणारी होती.

 ज्या क्षणी अक्षयने तिच्यावर होणारा हल्ला स्वतःवर झेलला होता, खरं तर त्याच क्षणापासून त्यांच्या “सहजीवनाला ” खऱ्या अर्थाने सुरुवात झाली नव्हती का? 

आकाशने त्याच्या नावातील फोलपणा सिद्ध केला होता, तर अक्षयने मात्र त्यांच्या नवीन नात्यातील “अक्षयपणा” टिकून राहील ह्याची हमीच एकप्रकारे दिली नव्हती का?

“विशु बाळा, किती  रडशील? किती जिवाला त्रास करून घेशील? आपला अक्षय लवकर बरा होणार आहे, अगदी ठणठणीत बरा—-आणि लवकरच तू “तुझ्या अक्षय” सोबत आपल्या घरात गृहप्रवेश करणार आहेस. थाम्बव बरं आता हे रडणं—” शालिनी ताईंनी, विशाखाच्या सासूने तिला जवळ घेत हलकेच थोपटलं. आणि तीही विश्वासाने त्यांच्या मिठीत शिरली. त्यांच्या तोंडून “तुझा अक्षय” ऐकून मनाला कुठेतरी गोड गुदगुल्या झाल्या आणि एक आंतरिक समाधान देखील. इतक्या सहजासहजी आपलं माणूस असं दुसऱ्याच्या हवाली करता येतं? इतकं सोपं आहे का ते? पण नाही, आपण खरेच भाग्यवान, अक्षय सारखा जोडीदार आणि क्षणात आपलंसं करणारी त्याची  जिवाभावाची माणसं आपल्याला  नशीबानेच मिळाली.

आता रडायचं नाही.  आपल्याला अक्षयसोबत आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करायचा आहे. त्या घराचा उंबरठा, त्या घराची दारे, खिडक्या, वेली, फुले सगळी आपली आतुरतेने वाट पहात आहेत—आणि आपण–? अक्षयच्या बाहुत शिरण्यासाठी—“ह्या” हृदयाची हाक “त्या”हृदयापर्यंत पोचली देखील असेल एव्हाना— वाट बघतेय अक्षय—गेट वेल सून—

1 thought on “गुंतता हृदय हे”

  1. वेगवेगळ्या पिढ्यांच्या संवादाच्या लकबी तुम्ही त्या त्या पात्रांवर बरोब्बर चढवल्या आहेत.

Leave a Reply to पुरुदत्त रत्नाकर Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *