— वर्षा सबनीस —
टाळ्यांच्या कडकडाटाने अवंती भानावर आली . व्यासपीठावर बसलेल्या अवंतीला तिच्या आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता . तिची ओळख करून देणाऱ्या मुलीने , तिला भूतकाळाच्या अनेक टप्यांवर नेऊन सोडले . क्षणात ती कोकणातल्या तिच्या आमराईत जाऊन बागडून आली, तर दुसऱ्या क्षणी तिच्या शाळेत जाऊन मैत्रिणींना भेटून आली . पुढल्या क्षणी तिचं सासर, मोठा चौसोपी वाडा दिसला, ज्याच्या भिंतींमध्ये तिची स्वप्ने चिरडली गेली . पंचवीस वर्षे अशी कापरासारखी हवेत विरून गेली . लगेच तिने स्वतः ला सावरलं . मान झुकवून तिने संयोजकांनी दिलेल्या हाराचा , शालीचा स्वीकार केला .
अवंतीचा सत्कार सोहळा सांगलीच्या महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात आयोजित केला होता . महाराष्ट्र शासनाने महिला दिनाच्या औचित्याने , पूरग्रस्ताना केलेल्या उल्लेखनीय मदती बद्दल अवंतीचा सत्कार सोहळा आयोजित केला होता .अनेक नामवंत , जिल्ह्याचे पुढारी , आणि अथांग जनसमुदाय जमला होता. त्यानंतर अनेक भाषणे झाली . अवंतीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला.साहजिकच होतं ते .निसर्गाने केलेल्या कहराला , तितक्याच ताकदीने तिने तोंड दिले होते . तिच्या संघटनेने केलेल्या मदतीमुळे अनेक जीव वाचले होते .शेकडो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरवुन ,त्यांना आपल्या छत्रछायेत आधार दिला होता.
लहानपणापासूनच अवंतीला निसर्गाची आवड होती . आमराईतल्या प्रत्येक झाडावर तिचे प्रेम होते, गोठ्यातल्या गाईवासरांवर प्रेम होते . अशी पानाफुलांवर प्रेम करणारी , समुद्राच्या लाटांशी तासनतास गप्पा मारणारी निसर्गवेडी अवंती, बघता बघता मोठी झाली . लग्न होऊन सांगलीतील एका मोठ्या धनाढ्य परिवारात आली .
मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे . जागेच्या हव्यासापोटी जंगले तोडून तिथे कॉक्रीट ची जंगले उभारली . डोंगर फोडून रस्ते , बोगदे बांधले .अनधिकृत खाणी खणल्या .वरवर दिसणारी प्रगती खरंतर निसर्गाची लय पार मोडून काढते आहे . दुर्दैव असे की हे थांबवणारे कुणी नाही . परिणामी दर वर्षी येणारे पूर आणि अवेळी येणारा पाऊस , सामान्य जनतेचे , शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो .अवंतीला हे सगळे थांबवावे , वृक्षारोपण करावे , जंगलं पुन्हा हिरवी करावी असे वाटायचे .आपली स्वप्न आपल्या जोडीदाराला सांगावी आणि त्याच्या साथीनं निसर्गाचा होतं असलेला ऱ्हास भरून काढावा अशी तिची इच्छा होती .
लग्नानंतर ची नवलाई ओसरल्यावर तिने एक दिवस हळूच नवऱ्याला तिची इच्छा बोलून दाखवली .”अहो, मला चारचौघींसारखे फक्त चूल आणि मूल असा संसार करायचा नाही. मला ही जंगलतोड बघवत नाही. निसर्गाशी माणसाच्या सुरू असलेल्या खेळाचे दुष्परिणाम फार भयंकर असतील.आपण ते थांबवायला पाहिजे. निसर्गाचे आपण देणे लागतो. त्याचे ऋण फेडायला पाहिजे.” ” अग, तू एकटी बाई, तू काय करणार ? आणि तुझे कोण ऐकणार ?” तिला तिच्या निश्चया पासून परावृत्त करण्याकरता तिचा नवरा म्हणाला.
तिचा नवरा, आदित्य जरी कर्तबगार आणि सज्जन असला तरी अवंतीची ही स्वप्ने समजून घेऊ शकला नाही . पुरुषप्रधान संस्कृतीत , स्त्रीची अशी काही स्वप्ने असू शकतात ,हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या गावीच नव्हते. घरात सुद्धा सगळ्यांनी तिच्या ह्या जगावेगळ्या इच्छे करता, तिची टिंगलच केली.
अवंतीची कुचंबणा व्हायला लागली.तिचे निसर्गप्रेम कुणी समजून घेऊ शकत नव्हते. घरातल्या इतर कुठल्याही कर्तव्याला न चुकणारी अवंती ,तिच्या ह्या निर्णयावर मात्र ठाम होती. सून, बायको, वहिनी ह्या सगळ्या भूमिका कौशल्याने आणि प्रेमाने पार पाडत होती. पुरुषप्रधान समाजात एका बाईची निसर्गा प्रति असलेली तळमळ कुणालाच दिसली नाही.
पण नियतीने तिच्या साठी वेगळेच आयुष्य आखून ठेवले होते. एक दिवस अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तिचा नवरा, आदित्य तिला सोडून गेला.
अवंतीला आता ना सासरी राहणे शक्य झाले, ना माहेरी. आता एकच ध्येय, एकच वेड होते . ते म्हणजे तिचे निसर्गप्रेम.
सुरुवात केली ती वृक्ष रोपणापासून. गावातल्या उनाडक्या करणाऱ्या मुलांना हाताशी घेऊन, तिने झाडं लावायचा सपाटाच लावला. त्यांची निगा राखण्यात
तिचा पूर्ण दिवस जाऊ लागला आणि तोही आनंदात. कुठेही झाडं तोडताहेत कळलं ,की अवंती तिची वानरसेना घेऊन पोहचलीच. तिच्या प्रयत्नांना हळूहळू यश आले . तिच्यासारखाच विचार करणारे अनेक जण एकत्र आले आणि आश्रय नावाची संघटना तयार झाली .
हळूहळू हिरवी वनराई तयार व्हायला लागली .त्या अनुषंगाने,जमिनीची होणारी झीज कमी झाली. फळाफुलांनी बहरलेली झाडे बघून अवंती हरखून जायची. हिरव्यागार झाडांमुळे वातावरण शीतल आणि शुद्ध झालं .जंगलतोड थांबवण्याकरता मात्र तिला अतोनात त्रास झाला. सरकारी उंबरठे झिजवले,असंख्य शत्रू तयार झाले पण अवंती डगमगली नाही. आलेला प्रत्येक अडथळा पार करत तिची संघटना ‘आश्रय ‘,पुढे वाटचाल करत होती. आता तर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये हाती घेतली होती.
अवंतीला वाटणारी भीती खरी ठरली . निसर्गा वर माणसाने केलेले अत्याचार कधी तरी त्याच्यावर उलटणारच होते.
२०१९ चा ऑगस्ट महिना, कोल्हापूर,सांगली जिल्ह्याकरता जीवघेणा ठरला. कृष्णा आणि पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. जिल्हातील अनेक गाव पाण्याखाली गेली, कच्ची घर वाहून गेली. शेतीची नासाडी झाली .लोकांना जीव वाचवण्यासाठी त्यांची घरं सोडून आश्रयाला वरच्या मजल्यावर जावे लागले. जीवनावश्यक वस्तू मिळेनाश्या झाल्या
अवंतीच्या आश्रय संघटनेने, राहत कार्यात हिरीरीने भाग घेतला. त्यांच्याच वरच्या मजल्यावर अनेक निराधार लोकांना राहायची सोय केली, त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. त्याशिवाय अनेक शाळा, कॉलेजच्या वरच्या मजल्यावर ,अनेक पूरग्रस्तांना आसरा दिला. ह्या राहत कार्यात आर्थिक मदत मिळवणे हे सगळ्यात मोठे आव्हान होते . अवंतीने हे काम शासकीय मदतीने आणि देणगीदारांच्या मदतीने केले. अहोरात्र झटली.पूर ओसरल्यावर लोकांनी तिचे आणि तिच्या संघटनेचे खूप कौतुक केले. आश्रय संघटनेला खुप देणगीदार मिळाले. परिस्थिती सुधारल्यावरही तिचे आणि संघटनेचे काम सुरूच होते.
पुढल्या वर्षीही तीच परिस्थिती उद्भवली.ऑगस्ट 2020 मध्ये परत सांगली जिल्हा, नरसोबाची वाडी आणि आजूबाजूचा प्रदेश पाण्याखाली गेला. परत असेच राहत कार्य. दर वर्षी येणाऱ्या पुराचा प्रकोप आता लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला. तीच परीस्थिती 2021 मध्ये ही आली .
आता मात्र अवंतीचा संयम संपुष्टात आला. आश्रय संघटनेने केलेल्या कार्याचा उदोउदो सर्वत्र होताच. आता तिने सरकारला अर्जी देऊन, कायद्याच्या मदतीने , अनधिकृत जंगलतोड , खाणी, इत्यादींवर बंदी आणली. दर वर्षी होणारी पुराची पुनरावृत्ती कशी थांबवता येईल ह्याची योजना तयार केली.त्या योजनेची अंमलबजावणी व्हायला लागणारी कार्यप्रणाली तयार केली. अनधिकृत खाणी बंद झाल्यामुळे कामगारांचा रोजगार बंद झाला . त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या.
अवंतीची तंद्री भंगली. सगळी दृश्ये झरझर नजरे समोरून गेली. दोन शब्द बोलायची विनंती केल्यावर अवंती उभी राहिली. सहजच पहिल्या रांगेत बसलेल्या तिच्या सासुसासऱ्यांवर नजर गेली. तिने तिथूनच हात जोडून ,मान लवुन नमस्कार केला. त्यांच्या नजरेत, तिला अनेक भावनांचं संमिश्र दर्शन झालं. त्यात कौतुक आणि अभिमान तर होताच ,पण तिला साथ न दिल्याची खंतही होती.
” उंच माझा झोका, ह्या पुरस्काराकरता माझी निवड केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. माझे निसर्गप्रेम ,मला आयुष्यात ह्या टप्प्यावर आणून ठेवेल असे अजिबात वाटले नव्हते. वळणावळणावर खुणावणारा निसर्ग मला,माझ्या त्याच्या प्रती असलेल्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव करून देत असतो. फुल ना फुलांची पाकळी म्हणून , मी आणि माझ्या संघटनेने केलेले कार्य, सांगली जिल्ह्यातील जनतेच्या उपयोगी पडलं हे माझं भाग्य. निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. त्या निसर्गाची काळजी घेणे, जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. माझे हरित अवनी चे स्वप्न होते ,आहे आणि राहील. देवाने माझ्या हातून काही अंशी का असेना पण ह्या स्वप्नाची पूर्तता करवून घेतली. ह्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी समस्त भगिनींना असे सांगू इच्छिते, की आपली स्वप्न कधीच अपुरी ठेऊ नका. भरपूर स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेचा पाठपुरावा करा . सर्व मान्यवरांचे, आश्रय संघटनेत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानून ,मी ‘उंच माझा झोका ‘ ह्या पुरस्काराचा स्वीकार करते. धन्यवाद .”
सावकाश पावले टाकत, अवंती तिच्या सासुसासर्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. त्यांना वाकून नमस्कार केला. सासूबाईंनी तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.
आणि अवंतीला अजून एक पुरस्कार मिळाला.