सनविवि ललित,साहित्योन्मेष “साहित्योन्मेष स्पर्धेसाठी” (परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?)

“साहित्योन्मेष स्पर्धेसाठी” (परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?)

—- माणिक नेरकर

 

आईने आपल्या बाळाला “चांदोमामा” अशी चंद्राची लडिवाळ ओळख  करून देण्याऐवजी “मून” म्हणून ओळख करून देणे, ही झाली भाषेची सरमिसळ.

 

ज्या वस्तूंना, शब्दांना आपल्या भाषेत “चपखल प्रतीशब्द” अस्तित्वात आहेत आणि वापरात आहेत  त्यांना “रिप्लेस” न करणेच योग्य.  दुर्दैवाने आपण ज्ञानभाषेला जास्त महत्व देतो आणि बोलीभाषेला कमी दर्जा देतो. मातृभाषेतून  अधिक चांगल्या रितीने व्यक्त होता येते.; पण ती ज्ञानासाठी कमी वापरली जाते.   आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवून ठेवणं, तिला सतत रसरशीत ठेवणं आपल्याच हातात आहे, अन्यथा ती कृत्रिम भासते.आपल्याकडे इंग्रजी भाषेचे प्रस्थ जरा जास्तच आहे. पण महत्वाचा फरक हा आहे की इंग्रजी शब्दकोशात  नवनवीन शब्दांची भर पडत असते. “Bangle”,”saree” हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हते; पण त्यांनी इकडे त्या गोष्टी बघितल्या  आणि आपल्या शब्दकोशात भर देखील घातली. म्हणूनच आज सर्वात जास्त शब्दसंपत्ती इंग्रजी शब्दकोशात  दिसते.रुजलेल्या परभाषेतील शब्दांना त्यांनी “दार मोकळे ” ठेवले आहे. भाषा अधिक प्रगत होण्यासाठी हे आवश्यक आहे.तसेच हिंदी भाषेबाबत—–

एखाद्या हिंदी भाषिकाने विचारलं, ” तबीयत तो  अच्छी है ना भाभी?” आणि मराठी भाषिकाने”  किधर क्या? मेरेकू अच्छा है. थोडा विचार कर रही थी–” असं भन्नाट उत्तर दिलं तर—? किंवा “सुबे चलेंगे, भोतीच गर्दी रेहती रातकू—-”  ही असली भाषा बोलण्यापेक्षा जी आपली बोलीभाषा आहे, तीच समोरच्याला समजेल अशी व्यवस्थित बोलावी. हे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यासारखेच नाही का?

 संपूर्ण वाक्य एकाच, तेही आपल्या बोलीभाषेतून बोलायला  काय हरकत आहे?

  जेवायला एखाद्या उपहारगृहात गेल्यावर — महाराष्ट्रीयन थाळीत जर तुम्ही म्हणाल वरणभातासोबत  बिर्याणी पण द्या, दाल खिचडी पण द्या— तर जेवणाची चवच काय पण थाळीचे सौंदर्य देखील बिघडेल.  जसं प्रत्येक प्रांता नुसार त्या त्या जेवणाचे महत्व, चव वेगळी तसेच भाषेचे देखील—- प्रत्येक बोलीभाषेचे स्वतःचे असे एक सुंदरपण असतेच. त्यात सरमिसळ झाल्यास त्याचे  मूळचे देखणे रूपच बदलून जाते.  अहिराणी भाषा म्हणजे अडाणी लोकांची भाषा, असा सर्वसाधारण समज असतो; पण तेच   बहिणाबाईंच्या अहिराणीत केलेल्या साध्या, सोप्या रचनांनी त्यांना थेट “संत” पदाला नेऊन ठेवले. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भाषेत अभंग रचले, ती निव्वळ अनाकलनीय—पण तरीही पूजनीय ठरलीच.

 

. आताची तरुण पिढी  जी अती आधुनिक असल्याचा दावा करत—” ब्रो, सिस, कॉंगो, के (ओके) असले “शॉर्टकट” मारत असते, ते म्हणजे “जगण्याचा सोपा मार्ग” , स्पष्टपणे सांगायचे झाल्यास “आळशीपणा” म्हणता येईल.  अर्थात, काही ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर अगदीच अपरिहार्य असतो. नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत—फेसबुक, मोबाईल, लॅपटॉप—-हे शब्द आणि त्याच्याशी संबंधीत शब्द जसे sms ,लॉग-इन, लॉग-आऊट, सॉफ्टवेअर, हार्डवेअर — जसेच्या तसेच घेणे अपरिहार्य होऊन बसते. त्यासाठी मराठी शब्द वापरून ती भाषा अजून क्लिष्ट करणे फारसे योग्य नाही. आता जसे की लॅपटॉपवर काम करत असताना तो बंद करायचा असल्यास “लॉग आऊट” हाच शब्दप्रयोग अधिक चपखल बसतो. त्याऐवजी आपण फक्त “बाहेर पडलो” म्हटल्यास त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात.शेवटी अशा ठिकाणी इंग्रजी शब्द वापरणे ही एक ताडजोडच असते. 

त्यामुळे एकतर परभाषेतील शब्दांसाठी आपल्या भाषेत प्रतिशब्द निर्माण करण्याची क्षमता वाढवून आपल्या भाषेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा किंवा मग ” जे जसं आहे तसे स्वीकारून ” काळासोबत पुढे चला.

 आता कप, पेन,टेबल हे शब्द इतके वापरात आहेत की ते इंग्रजी असूनही मराठीच वाटायला लागले आहेत; पण रोड साठी रस्ता, मार्ग हे शब्द आपण वापरूच शकतो. स्वा. सावरकरांनी क्रिकेट आणि त्याच्याशी संबंधित शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द शोधून काढले .(आणि इतरही बरेच)वास्तविक पाहता, क्रिकेट हा आपला खेळ नसूनही आपल्या संस्कृतीने तो सहज स्वीकारला,मग भाषेच्या बाबतीत असे का होऊ नये?

   परभाषेतील शब्दांची सरमिसळ योग्य नाही हे जितके खरे, तितकेच हेही खरे की   भाषा ही प्रवाही असते, असावी.त्यात मराठी ही सर्वसमावेशक राहिली आहे, कायमच.  भाषा हे परस्परसंवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे, साधन आहे. आणि इतर अनेक भाषांना मराठीने आपल्यात सामावून घेतले आहे. असंख्य इतर भाषिक शब्द मराठीत लोणच्यासारखे मुरले आहेत. उदाहरणे द्यायची झाली तर—-तोडगा, गजरा (हिंदी).

संविधान, पुरस्कार(संस्कृत)

अण्णा, तूप(कन्नड)ऑफीस, शर्ट, कॉलेज(इंग्रजी)हजेरी(उर्दू) बाजार, बोगदा, सरकार(फार्सी)

जाहिरात, वकील,अफवा (अरबी)काडतुस, कुपन(फ्रेंच)बदली, पगार (पोर्तुगीज).  याचाच अर्थ, मराठीतील ही सरमिसळ नाक मुरडून नावे ठेवण्यासाठी नाही तर  उलट कन्नड, उर्दू, संस्कृत,अरबी, फार्सी—अशा अनेक भाषांच्या सहवासात ती अधिक समृद्ध, सशक्त झालीये. भाषा हे संपर्काचे  प्रभावी माध्यम असल्याने हे  घडणारच आणि हे अनेक भाषांच्या बाबतीत घडत असतं. नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहते, तो तो भाग ती सुजलाम ,सुफलाम करतेच. एका जागी स्थिर राहणं हा डबक्याचा गुणधर्म तर वहात रहाणं हा नदीचा. या मराठी भाषिक नदीने प्रवाही असतांना अनेक  भाषांना जसं आपलंसं केलं तशी आपली ओळखही त्या त्या भागात रुजवली. हे काही भाषेचं प्रदूषण म्हणता येणार नाही.

 भाषिक देवाण घेवाण ही सर्वच भाषांमध्ये होत असते. भिन्न प्रांतातील, भिन्न संस्कृतीतील,  लोक जेव्हा शिक्षणानिमित्त, कामानिमित्त परगावी जातात, परदेशात जातात तेव्हा तर ही देवाण घेवाण अपरिहार्य ठरते. 

 परदेशात विद्यार्थी शिकायला जातात,त्यासाठी इंग्रजी शिकतात, जर्मन, जपानी भाषा शिकतात; पण ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की त्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान नाही. त्यांची नाळ शेवटी मातृभाषेशी जोडली गेलेली असते, त्याचा विसर पडू देऊ नये इतकंच. 

 भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या प्रदेशातील भाषांचा परिणामही परस्परांवर होत असतो. गुजरातीच्या संपर्कामुळे चोपडी, खेडूत, भाव वधारणे असले शब्द मराठीने स्वीकारले. हिंदीतील खिचडी, जिलेबी, कचोरी,धंदा, रोजगार असले शब्द मराठीत आलेच. त्यात दूरचित्रवाणी, चित्रपटांच्या प्रभावामुळे हिंदीचं मराठीवरील आक्रमण वाढतच गेलं.  विशेषतः  सांस्कृतिक क्षेत्रातील शब्दात अदलाबदल  पण आढळून येते. जसे,धन्यवाद, तापमान—-.

राजकीयदृष्ट्या विचार केला तर लक्षात येतं की पूर्वी कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील  राजांनी ह्या दोन्ही भाषिक भूमीवर राज्य केलं आहे. त्यामुळे मराठी तिच्या  जन्मापासूनच कन्नडच्या संस्कारात वाढलेली दिसते. शहाजीराजे, तंजावरचे व्यंकोजीराजे ह्यांच्यामुळे  तंजावर, धारवाड, जिंजी,म्हैसूर, बंगाल आदि प्रांतात जी महाराष्ट्रीयन कुटुंबे गेली,स्थिरावली त्यामुळे मराठी आणि त्या ठिकाणची भाषा ह्यात देवाणघेवाण होत राहिली.

 ह्या देवाण – घेवाण च्या प्रक्रियेत देखील भाषा विकसित होत असते. आणि तसे न झाल्यास कोणतीही भाषा मृतवत होऊ लागेल, जसे आज “संस्कृतच्या” 

बाबतीत होऊ लागलेले दिसते आहे.

“अनुवाद” ह्या साहित्य-प्रकारामुळे भाषेची देवाण-घेवाण आणि विकास प्रक्रियेस सहाय्यच झाले आहे.

अनेक कारणांमुळे भाषेची घुसळण होतच असते;पण व्यवहारात  संपर्कासाठी ,परस्परातील संबंध वृद्धिंगत होण्यासाठी  भाषिक सौंदर्य कमी होऊ न देता “ही सरमिसळ” मिसळपाव सारखी चटपटीत करून घेऊन तिचा सकारात्मक रितीने विचार करणेच अधिक सोयीस्कर नाही का?

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *