हिरकणी

— अंजली संगवई —

(ही कथा आपण इथे ऐकूही शकता – https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1kgaeh)

उंच माझा झोका* पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसाय क्षेत्रांत यशस्वीपणे, जिद्दीने भरारी घेणाऱ्या आणि त्याबरोबरच सामाजिकक्षेत्रात काम करणाऱ्या निवडक महिलांचा सत्कार होणार होता. पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन शब्द सांगताना, तिचा जीवनपट डोळ्यासमोर आला….

सनईच्या मधुर सुरांनी सर्वत्र  वातावरणात प्रसन्नता जाणवत होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजकांची  लगभग सूरू होती.  ८ मार्च, ‘मुक्तभरारी’  या संस्थेचा वर्धापनदिन. दर वर्षी हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो. तसेच विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या हिरकणींना या समारंभात सन्मानीत केले जाते. प्रत्येक हिरकणी साठी हा मोठा मानाचा सन्मान असतो. आज हा सोहळा विशेष यासाठी पण आहे की हे वर्ष संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि आज या कार्यक्रमाला आदरणीय सुधाताई प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. 

दीपप्रज्वलन, स्वागता आणि ओळख अश्या क्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक असे विविध कार्यक्रम सादर झाले. आता वेळ होती या वर्षीच्या हिरकणींच्या सन्मानाची. प्रथे प्रमाणे प्रत्येक विजेत्याचे नाव घेतल्या नंतर त्यांनी केलेल्या विषेश कार्याचा आढावा वाचून दाखविण्यात येत होता आणि थोडक्यात त्याची चित्रफीत पण दाखविण्यात येत होती. 

या कार्यक्रमाला मुग्धा  हिरकणी म्हणून उपस्थीत होती. आज तिची लेक पण तिच्या बरोबर होती. कुठल्याही लेकीला अभिमान वाटावा असा मुग्धाचा गेल्या पंधरा वर्षाचा प्रवास होता.

मुग्धा जोशी या नावाची घोषणा झाली आणि तिच्या कार्याचा आढावा वाचण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर मुग्धाच्या  डोळ्यासमोर तिच्या जीवनातला तो पंधरा वर्षाचा काळ  चलचीत्रित झाला…..

ती, राम आणि लेक राधा असे तिचे एक छोटेसे सुखी कुटुंब.  राम एका कन्स्ट्रक्शन कंपनीतील सिनियर इंजिनियर होता. राम नेहमी आपले काम नुसतेच चोखपणे नाही तर काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा त्यामुळे त्याने खूप कमी वेळात प्रगती तर केलीच पण तो लोकप्रियही झाला. 

अचानक दृष्ट लागावे असे घडले. त्या दिवशी साईट वर अचानक झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.  हा आघात मुग्धा वर वीजे प्रमाणे कोसळला. या घटनेने तिचे आयुष्य बदलून गेले. कधीही एकटी बाहेर न गेलेली, बाहेरची कुठलीच कामे न केलेली मुग्धा, आता अचानक सगळच तिच्यावर पडले. घरी आजारी सासरे, लेक कॉलेजच्या पहिल्या वर्षाला. तिच्या आयुष्यात संघर्षाला आता सुरुवात झाली.

बँकेत नॉमिनेशन, मृत्यूचा दाखला तसेच ओळख प्रमाण पत्र अश्या एक ना अनेक गोष्टीची पूर्तता करण्याची प्रक्रिया तिला पार पाडावी लागत होती. राम नेहमीच म्हणायचा हीकामे समजावून घे. त्यासाठी तो कितीदा तरी मागे लागायचा  पण तिने कधी मनावर घेतलेच नाही.  

बँकेत तसेच बरेच ठिकाणी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागत होत्या. हे सारे शिकण्याची तिने शुण्यापासून सुरुवात  केली. तिथे येणाऱ्या अडचणी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांची कधीतरी होणारी चिडचीड, ही एक कसरत वाटत होती. तेव्हा खूप मनस्ताप होत होता.

फॅमिली पेन्शन ऑफिस मध्ये  तिला आणि तिच्या सारख्या अनेकींना येणाऱ्या अडचणी बघून, यासाठी काहितरी करायला हवे या विचारांचा तिच्या मनात जन्म झाला. आपल्या सारख्या अडचणी आणि मनस्ताप कोणाला होऊ नये ही साधी त्या मागची भावना. त्यावेळी या कार्याचे बीज रुजले.

रामच्या कंपनीने नैतिक जबाबदारी म्हणून  मुग्धाला  नियमात नसतांनाही नौकरीची ऑफर दिली, खुप विचार आणि चर्चेनंतर तिने नौकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्या वेळेची ती गरज होती. 

आव्हान मोठे पण स्वीकारणे तेवढेच आवश्यक होते.

एक नवीन वाट… 

साईट सुपवायझरची जवाबदारी मिळाली. इथे पण सगळेच नवीनच. साईटचे अंतर दुर होते, जाणे येणे तसे गैरसोयीचे होते. कधी सायकलही नाही चालवली पण आता मात्र कार ड्रायव्हिंग शिकायला सुरू केले. या साऱ्या कसरती सुरू झाल्यावर दुःख गोंजरायला वेळ मिळाला नाही  पण ते दुःख होते, कधी न संपणारे. काळ औषध आहे असे म्हंटले तरी पण हे दुःख कधी न संपणारेच होते.या सगळया गोष्टींची राधाला  जाण होती. दोघी मायलेकी एकमेकींसाठी भक्कमपणे उभ्या होत्या. मुग्धा कामावर हळूहळू रुळू लागली. नवे काम लवकर आत्मसात केले. 

गरज सारे शिकविते, ही मिळालेली शिकवण. ते संपूर्ण पुरुषांची मक्तेदारी असलेले क्षेत्र होते, तरी बाई म्हणुन काम करतांना कुठेही वेगळा भाव मनात येऊ दिला नाही. तेथील उपकरणांचा वापर हळू हळू समजावून घेतला.  जेसीबी, क्रेन सारखी यंत्रे वेळ पडल्यास स्वतः हाताळणे शिकली. स्थिरस्थावर झाल्यावर डोक्यात इतरांसाठी काही तरी करण्याचे विचारचक्र परत सूरू झाले. मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये या विषयी प्रस्ताव मांडला. तेव्हा समिश्र प्रतिसाद मिळाला. 

“आम्हालाच तर त्यातल पूर्ण ज्ञान नाही”…

“घरचे सांभाळून वेळ मिळाला पाहिजे”…

“घरचे या कामासाठी परवांगी देतील का?”…. 

त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया….

बऱ्याच चर्चे नंतर दोन तीन जणींनी सहकार्याची तयारी दाखविली. तसे हेही नसे थोडके….

काही नवीन करायचे म्हणजे ते आपल्याला आधी अवगत असणे गरजेचे म्हणून जाणकारांकडून सारे सविस्तर समजून घेतले. सुरूवात कुठून करायची आणि त्यासाठी वेळ कसा काढायचा हे डोक्यात असतांनाच घरी काम करणाऱ्या मावशींनी एक दिवस बँकखात्या संमधी विचारले, आणि तिथूनच बँक व्यवहाराचे ज्ञान देण्याच्या मदत कार्याचा श्रीगणेश झाला. पुढे बरेच जणींना  या माहिती आणि सल्याचा लाभ झाला. साईट वरील मजूरांची मुले  तिथे नुसती भटकायची, ते बघून त्यांच्या बद्दल मुग्धाला नेहमी तळमळ वाटायची. त्यांच्या साठी काय करता येईल याचा विचार तिच्या मनात सुरु झाला. कधी-कधी कामातून वेळ मिळाला की त्यांना गोष्टी सांगणे सुरू केले.मुलांना पण गोष्ट ऐकायची गोडी लागली. याच पद्धतीने शालेय शिक्षण द्यायलाही सुरुवात केली. बऱ्याच अडचणी आल्या, निस्तरल्या. हळूहळू कार्यात एक एक जण जोडल्या गेले आणि कालांतराने या समूहाचा वटवृक्ष झाला. स्वेच्छा निवृत्ती नंतर या कामाचा  आवाका वाढवीला. अनेक वस्त्या, तसेच मोठ मोठे बांधकाम सुरू असलेले ठिकाण जिथे मजुरांची संख्या शेकड्याने  होती. तिथे त्यांच्या मुलांसाठी वर्ग सुरू केले. हळू-हळू तिथल्या बायकांसाठी पण वर्ग सुरू केले, त्यातूनच त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले. या ज्ञानार्जनाच्या माध्मातून अनेक जणींशी नाळ जोडली गेली …

टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मुग्धा एकदम भानावर आली. पुरस्कार  घेतांना आनंदानी डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समोर राधा इतरांसोबत उभी राहून टाळ्या वाजवत होती, तिच्या डोळ्यातील अश्रू आईच्या कार्याला सलामी देत होते.

टाळ्यांचा आवाज थांबल्यावर मागच्या रांगेतून एक आवाज आला “आम्हाला दोनच मिनिट बोलायचे आहे”

आयोजकांची धांदल उडाली. इतक्या मोठ्या पाहुण्यांन समोर शिस्तीत सुरु असलेल्या कार्यक्रमात अचानक असे कोणी उभे राहणे ही आयोजकांसाठी थोडी अप्रिय बाब होती. मुग्धाने रेवतीला इतक्या दुरून देखील ओळखले होते.जरा गोंधळानंतर त्यांना अगदी वेळेत बोलण्यास परवानगी दिली. रेवतीला किती बोलू आणि किती नाही असे झाले. तिने खूप उत्साहात बोलायला सुरुवात केली, “स्वतःचे काम सांभाळून रोज पेन्शन ऑफिस तसेच बँकेमध्ये गरजू स्त्रियांना लागेल ती मदत स्वतः जातीने करणाऱ्या या आमच्या मुग्धा ताई, यांच्या बद्दल कितीही बोलले तरी कमीच. मदतीच्या या कामात इतरांना प्रशिक्षण देत त्यांनी खूप मोठी साखळी तयार केली. बांधकाम साईट वर आता आम्ही बायका फक्त मजुरी करीत नाही तर काही जणी तेथील उपकरणे देखील हाताळतो, ते ताईंमुळेच . आमच्या सारख्याच अनेक जणींना साक्षर आणि आत्मनिर्भर केले. आज आम्ही त्यांच्या प्रेरणेने आणि मदतीने गरजू बायकांसाठी ‘लागेल तेव्हा मदत’ हे केंद्र सुरु केल आहे. त्याचा लाभ अनेक जणी घेत आहे. आम्हाला ताईंना मिळणाऱ्या पुरस्कारा बद्दल उशीरा कळले, नाहीतर आयोजकांना आम्ही आधीच वेळ मागितली असती. झालेल्या असुविधेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. प्रमुख पाहुण्याना नमस्कार, खर तर हे सुरवातीलाच म्हणायचे होते पण उत्साह आणि आनंदाच्या भरात राहून गेले. तसेच आयोजकांचे आभार, ताई आपल्याला प्रणाम”

परत टाळ्यांचा गडगडाट…

आज मुग्धाला तसे दोन पुरस्कार मिळाले होते. सुधाताई हे सारे कौतुकाने बघत होत्या, त्यांनी त्यांच्या समोरचा माईक हातात घेतला आणि म्हणाल्या”ज्यांना मदत मिळली त्यांनी त्या मदतीची जाण ठेवून, स्वतः देखील अनुकरण करीत दुसऱ्यांसाठी मदतीचा स्त्रोत निर्माण केला. जीच्या प्रेरणेने हे सारे घडले खऱ्या अर्थाने ती एक हिरकणी आहे”.

सभागृहात पुन्हा टाळ्यांचा गडगडाट झाला. 

सुधाताईंनी मुग्धाशी बोलून पुढे सोबत मिळून काम करण्याची इच्छा दाखविली ही तिच्यासाठी एक मोठी उपलब्धि होती.

आज मुग्धा संपूर्ण कार्यक्रमाची केंद्र बिंदू ठरली… एक हिरकणी…

1 thought on “हिरकणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *