सनविवि ललित,साहित्योन्मेष  सोशल मीडिया आणि संवेदनशील मनं

 सोशल मीडिया आणि संवेदनशील मनं

                                           

–मानसी गजानन तांबेकर–

नेहमीप्रमाणे सकाळी उठले.  झोपेनंतरच्या घडामोडींसाठी  फोन हातात घेतला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. मोबाईल आणि इंटरनेट आपली कामगिरी चोख बजावत असूनही माझं व्हाट्सअप, फेसबुक ,इंस्टाग्राम, ट्विटर सगळं ठप्प पडलं होतं. गेली दोन वर्ष सतत चर्चेत असलेल्या कोरोनाची आज काय दशा ? त्यावर काय उपाय?  त्याला घाबरून घरी बसायचं की बाहेर फिरायला जायचं? या सगळ्यावरचे अपडेट्स कसे मिळणार ? या विचाराने मन सैरभैर  झाले. शिवाय इकडची तिकडची राजकीय, सामाजिक परिस्थिती, त्यावरच्या चर्चा , लोकांची मतं ह्याला आज मुकावं लागणार म्हणून चलबिचल सुरु झाली. ‘आजचा  वाढदिवस’  या सदराखाली वाढदिवसाची  आठवण करून द्यायला ‘फेसबुक’ सज्ज नसल्याने भलतीच पंचाईत झाली होती. त्यात भरीस भर म्हणजे  आमच्या मंडळाच्या कार्यक्रमाची पोस्ट ‘इंस्टाग्राम’ वर अपलोड करायचे काम ही माझ्याकडे होते ,शिवाय काल  अर्चनाने अपलोड केलेल्या  तिच्या नवीन कूकिंग व्हिडिओवर माझे ‘भाष्य’ बाकी होते. ही कामे काल केली नाहीत म्हणून मन चुटपुटत होते. फेसबुक ,इंस्टाग्राम, ट्विटर आदी मंडळी वाकुल्या दाखवत ‘माझा दुनियेशी संपर्क तुटला ‘ असं म्हणत मला चिडवतांना  दिसली आणि मी खाडदिशी झोपेतून जागी झाले. लगेच माझा फोन तपासला . ही सर्व मंडळी माझ्या सेवेस नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत हे पाहून मन सुखावले. पण  मग मी मला पडलेल्या स्वप्नाचा विचार करू लागले . क्षणभरात मनावर ‘अधिराज्य’ गाजवणारे हे सोशल मीडिया .आज भूतलावर ज्याला सोशल मीडियाचा ‘परिसस्पर्श’ झालेला नाही असा मनुष्यप्राणी सापडणे  कठीणच. एकदा असच माझ्या छोट्या भाचीने मला कोडं घातलं आत्या सगळ्यात मोठे बुक कोणी लिहिले ? माझे व्यासमुनी, वाल्मिकी असे विचारचक्र चालू असतानाच ती चिमुरडी म्हणाली -अग, सोप्पं आहे, सगळ्यात मोठे बुक लिहिले आहे ‘मार्क्स झुकेरबर्गनी’ आणि त्याचे नाव आहे ‘फेसबुक’. तिचे हे 

सामान्य ज्ञान पाहून मी थक्क झाले.  खरंच’सामर्थ्य आहे सोशल मीडियाचे।जो जो करील तयाचे।’सर्व विषयांना व्यापणारी वामनाच्या पावलांची शक्ती असलेली प्रवृत्ती म्हणजे ‘सोशल मीडिया’. वैज्ञानिकांनी अफाट निसर्गाला हाताला घेऊन, मानवाला सुख -समृद्धीचे आभाळ देऊन जीवन सुकर 

केले. विज्ञानाच्या या स्मार्ट प्रवासाची गाडी इंटरनेटचे इंजिन घेऊन निघाली. मग हळूहळू 

फेसबुक, ट्विटर,यू-ट्यूब,व्हाट्सअप सारख्या स्टेशनांमधून तिने  माणसाला एका वेगळ्या 

जगात पोहचवले. सोशल मीडियाच्या जन्माने ‘संवादाचे नवीन माध्यम’मिळाले. इथे कल्पनांची, विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,आर्थिक अशा विविध क्षेत्रांतील जगभरातल्या घडामोडी बोटाच्या अलगद स्पर्शाने घरबसल्या मिळू लागल्या. मग सोशल मीडिया बनलं- ‘नव्या युगाचा नवा मंत्र’ आणि नवं ते हवं. बदलत्या काळासोबत बदल गरजेचा असतो. जीवनाच्या प्रवाहीपणाचे ते एक चिन्ह आहे. म्हणूनच प्रत्येकजण या प्रवाहात वाहू लागला. साता-समुद्रापलीकडे राहणारे नातेवाईक, शाळा -कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणी यांच्यामधला दुरावा चुटकीसरशी दूर झाला. सेल्फी ,ट्विट DP,OMG,ROFL,RIP यांनी आमच्या शब्दकोशात भर पाडली. कालपर्यंत मनाच्या कपाटात दाबून ठेवलेली गुपितं ही ब्लॉगच्या रूपातून बाहेर पडायला लागली. सोशल मीडियाच्या 

प्रोत्साहनामुळे मनात दडलेला नट, कलाकार, स्वयंपाकी, लेखक, गायक आणि इतर बरच काही जन्माला येऊ लागलं. लोकांना घरबसल्या आपले ज्ञान वा आपली कला दाखवून पैसे मिळवण्याचे हे एक साधन मिळाले. केवळ वैयक्तिक स्तरावरच नाही तर सामाजिक पातळीवर ही आमची मनं यात गुंतत गेली आणि म्हणूनच ‘निर्भया’  प्रकरणी हळव्या झालेल्या आमच्या मनांनी मीडियाच्या माध्यमातून  सरकारला दबाव आणून नवीन व अधिक प्रभावी कायदा करण्यास भाग पाडले. या कोरोनाच्या कठीण काळात तर मीडियाद्वारे अनेकदा मदतीसाठी मारलेली आर्त हाक आमच्या थेट काळजाला भिडली आणि हजारो हात मदतीसाठी पुढे आले. एकीकडे  या पद्धतीने जगाला जोडणारं सोशल मीडियासारखे विशाल नेटवर्क आमच्या जीवनात सकारात्मक भूमिका निभावत होतं ; तर दुसरीकडे आपल्या खाजगी गोष्टी कुणाला सांगायच्या नाहीत या शिकवणीत वाढलेली आमची पिढी‘मी सध्या कायकरतो’किंवा‘माझी दिनचर्या’जगाला ओरडून सांगायला लागली. मुळात सोशल मीडिया हा 

खरंतर माणसा-माणसाला बांधणारा सेतू; पण हा सेतू बांधताना आपले मित्र किती, फॉलोअर्स किती याची अहमहमिका सुरु झाली. कुठेही गेलो तर ती जागा ,काहीही नवीन 

करायला गेलो तर ती गोष्ट; याचा मनमुराद आनंद उपभोगण्यापूर्वी ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले. लाईक्स वरून, कंमेंट्स वरून माणसाच्या लोकप्रियतेची कसोटी लागली. आज घरा-घरातील नाती, आपलुकी ही मीडियावर जास्त रंगवली जात आहे. काही लोकांचा तर तो ‘छंद’ बनला आहे. प्रेम,राग,द्वेष,मत्सर,आनंद ,क्रोध ह्या आपल्या मनातल्या भावना  ओकून टाकायला मिळालेली ही एक  हक्काची जागा झाली आहे. या मोहजालात आमची संवदेनशील मनं इतकी गुंतली आहेत की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही इथेच‘ऍक्टिव्ह’ आहोत. या मीडियाद्वारे माणसे ‘कनेक्ट’ करणं सोपं झालं आहे पण मन कनेक्ट करणं मात्र अवघड . आणि त्यामुळेच या धावत्या, शान -शौकीच्या, चकाकत्या दुनियेत सतत सोशल मीडियावर राहणारी माणसे जास्त एकाकी होत चालली 

आहेत. आपला दिवस कसा जाणार किंवा  कसा घालवला पाहिजे हे मीडियाच्या बातम्यांवरून ठरवणारे ,त्याच्या पूर्णतः आधीन गेलेले लोकं पाहिले की भविष्यात ह्या सोशल मीडियाची उत्क्रांती मुळे आपली  मनं दुर्बळ होतील आणि माणसाला स्वातंत्र्यहिन आणि परावलंबी करून सोडतील अशी भीती वाटू लागते. आता मनाला संवेदनशील नाही तर ‘सजग’ बनवायची वेळ येऊन ठेपली आहे. सोशल मीडिया ही एक जगायची सोय जरी असली तरी त्याच्या बाह्यरूपाला भुलून न जाता ‘जे चकाकते ते सारे सोने नसते ‘हे लक्षात ठेवून, मिळालेली माहिती खातरजमा करून , आपल्या मनाला सारासार विचार करायला भाग पाडायला हवे. जर आपण थोडे तारतम्य बाळगले तर याच्या आहारी न जाता खरंखुरं जगण्यासाठी ही वेळ काढता 

येईल. त्यासाठी मात्र ज्याप्रमाणे आपण शरीरस्वास्थ्यासाठी  उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्या संवेदनशील मनासाठी ह्या मीडियाचा उपवास करण्याची गरज आहे. कारण भविष्यात तेच नवीन 

आव्हान आहे. मग काय रुजवायचा का सोशल मीडियाचा उपवास सोशल मीडिया द्वारेच?

                                                                                                                             

                                                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *