सनविवि ललित,साहित्योन्मेष “हॅपी न्यू इयर”

“हॅपी न्यू इयर”

–माणिक नेरकर–

जसा जसा डिसेंबर सरत जातो, तसे तसे नवीन वर्षाचे वेध लागायला सुरुवात होते. किमान दोन-चार दिवस आधीपासूनच  नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा पाऊस पडायला सुरुवात होते आणि अर्थात, बऱ्याच जणांच्या मनात काही नवीन संकल्पही घोळू लागतात. नूतन वर्षात काहीतरी आगळे-वेगळे करण्याचा मानस मनाला एक नवीन उभारी देऊन जातो.

नवीन वर्ष आणि संकल्प ह्यांचं एक अनोखं समीकरण आहे. प्रत्येक जाणाऱ्या वर्षाच्या शेवटी

आणि येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला नवनवीन संकल्प केले जातात. पैकी काही तडीस जातात. तर बरेचसे संकल्प

कल्पनेच्या विश्वात गटांगळ्या खात पडून असतात. नव्या वर्षात संकल्प करण्याचा इतिहास हा चार हजार वर्षांपूर्वीचा आहे.

या परंपरेत काही मोठ्या व्यक्तींचे संकल्प असेही झालेत,ज्याची चर्चा जगभरात झाली

आणि ते प्रसिद्धही झाले.  त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे मार्गारेट लीप.

या वर्षी मी हे वर्ष एक दिवसाने वाढवेन. जर मी यशस्वी झाले तर चार वर्षानंतर परत प्रयत्न

करेन,आणि प्रयत्न यशस्वी झाला. नंतर याला कायदेशीर स्वरूप देखील मिळाले आणि  पहिले वहिले

ज्युलियन कॅलेंडर निघाले. याला त्यांचेच नाव दिले गेले. ही लीप वर्षाची सुरुवात होय.

खरं तर कोणताही संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहणे जरूरी नसते. चांगल्या गोष्टींचा

संकल्प किंवा चांगल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी, योग्य आणि उत्तम विचार कृतीत आणण्यासाठी

वर्षातील कोणत्याही दिवशी कोणताही क्षण योग्यच असतो. त्यासाठी मुहूर्त पहायची देखील गरज नसते.

अर्थात, आपण आजपर्यंत जे ठरवूनही करू शकलो नाही, ते पुढे करू शकू असा आशावाद यामागे आहे, हे

मात्र निश्चित. प्रयत्न करूनही जे साध्य करण्यात अयशस्वी ठरलो, येत्या काळात त्यात यश मिळावे, 

उशिराने का होईना, यशाची पायरी गाठता यावी, ही

जिद्द, ही उमेद त्या मागे आहे. त्यामुळे;संकल्प या संज्ञेकडे, एक नवीन ऊर्जा, एक नवा आशावाद ,एक नवी उमेद, ह्या

सकारात्मक दृष्टीनेच पाहिले जात असावे. कारण वर्ष संपले म्हणजे गेलेले क्षण नष्ट झाले असा अर्थ

होत नाही. ती एक नवीन सुरुवाताची नांदी असते. आपल्या जीवनाची पाटी स्वच्छ करण्याची संधी, गढूळ झालेली अक्षरे पुसून, स्वच्छ अक्षरे गिरवण्याची संधी. आपण म्हणतो ना, झालं गेलं गंगेला मिळालं… ते विसरून नव्याने सुरुवात करु या. शालेय जीवनात, “पुढचं पाठ, मागचं सपाट”–असं काहीसं उपहासाने म्हटल्या जातं; पण वास्तव आयुष्यात मात्र भूतकाळ विसरून (वाईट आठवणी) ,वर्तमानकाळाशी प्रामाणिक राहण्याची आणि भविष्याकडे आशेने बघण्याची शिकवण दिली जाते…गेलेल्या

काळातील चांगल्या स्मृती जतन करून ठेवाव्यात. नको असलेल्या आठवणी पुसून टाकण्याचा शक्यतो प्रयत्न करावा.

 आपण केलेल्या चुका हे आपले अनुभव समजून आपल्यात असलेल्या उणिवा भरून काढण्याचा

प्रयत्न करावा. “येणारा प्रत्येक नवीन दिवस हा प्रत्येक मानवाचा जन्म दिवस असतो,” असे चार्ल्स लॅब

यांनी म्हटले आहे

तसं पहायला गेलं तर आपल्या मराठी माणसांचं, मराठी मनाचं नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं

असतं. पण पारंपारिक असण्यासोबत आपण नव्याचाही स्वीकार करायला हवा. जुन्या सोबत नव्याचाही

ताळमेळ साधायला हवा, नाही का? ह्या संदर्भात कुठेतरी वाचलेल्या छान ओळी आठवल्या…

“इसवी  सन तो याद रहा,

पर अपना संवत्सर भूल गये

धरती ठिठुर रही है सर्दी से

घना कुहासा छाया है

कैसे ये नववर्ष हैll

जिस से सुरज भी शर्माया है

बाट जोह रही सारी प्रकृती

आतुरता से फागुन की

जैसे रस्ता देख रही हो

सजनी अपने साजन कीll

अभी ना उल्हासित हो इतने

आई अभी बहार नही

हम अपना नववर्ष मनायेंगे

न्यू इयर हमे स्वीकार नही ll”

कवीला आपल्या समृद्ध परंपरेचा सार्थ अभिमान आहे. न्यू ईयर सेलिब्रेशन करणं त्याला

पाश्चिमात्य संस्कृती आणि गुलामी वाटते. त्याच्या मते, आपल्या मराठी नवीन वर्षात कसं बहारदार

वातावरण निर्माण होत असतं…

“फुलो का श्रृंगार कर के

धरती दुल्हन बन जाएगी

मौसम बडा सुहाना होगा

झुमेंगी फसले खेतो मे

सब गीत खुशी के गायेंगे ll”

तरी हे देखील तितकंच खरं आहे की, माणसाला सतत नावीन्याची ओढ असते. त्याला आहे

त्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं आणि ते वेगळं काहीतरी नवीन असं नववर्षात तरी घडेल अशी एक

सुप्त इच्छा मनात असते. माघ या कवीने  ‘शिशुपालवध’ या महाकाव्यात म्हटले आहे,” नवीन म्हणजे रमणीय.. प्रत्येक क्षणाला जी नवीन रूप धारण करते, ती खरी रमणीयता.” 

“क्षणे क्षणे यं नवताभूपैति तदैवं रूपं रमणीयता.”अर्थात रमणीय म्हणजे सुंदर, मोहक आणि

मनाला प्रिय असणारे… म्हणूनच आपण दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने वर्षातील प्रत्येक सणांचं आणि

नववर्षाचं  देखील मनापासून स्वागत करत असतो होय ना? शेवटी इतकच सांगावसं वाटतं,

“भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर

या वळणावर…

गेला वर्ष-दीड वर्षाचा काळ आपणा सर्वांसाठीच खूप कठीण होता. जीवनाला अनपेक्षित वळणे देणारा होता.

 “कोरोना” रुपी राक्षसाने कितीतरी कुटुंबे उध्वस्त केलीत,कितीतरी आयुष्ये विस्कळीत झालीत, अगदी होत्याचे नव्हते झाले. कुणी आपल्या आप्तांना गमावले तर कुणी आप्त संबंधांना दुरावले; पण माणसाने जगणे सोडले का? 

 शेवटी “मनुष्यप्राणी हा आशावादी” प्राणी आहे, म्हणूनच सृष्टीचा समतोल टिकून आहे. बऱ्याच जणांना हव्या त्या गोष्टी अगदी सहजासहजी मिळून जातात, तर बऱ्याच जणांना किरकोळ गोष्टींसाठी देखील संघर्ष करावा लागतो. कुणाला पट्कन तर कुणाला उशिरा—पण हवे ते मिळण्याची, मिळवण्याची ही जी उमेद आहे, असते, तीच त्याला जगण्याला प्रवृत्त करते.

ह्या संदर्भात निदा फाजली ह्यांच्या काही सुंदर ओळी  आठवताहेत—

” कही छत थी,दीवारो-दर थे कही

मिला मुझको,घर का पता देरसे

दिया तो बहुत जिंदगी ने मुझे

मगर जो दिया, वो दिया देरसे

हुवा न कोई मामुल से

गुजारे शबो-रोज,कुछ इस तरह 

कभी चांद चमका,गलत वक्त पर

कभी घर मे, सूरज उगा देरसे—“

 “The show must go on” ह्या तत्वानुसार प्रत्येकाला “पुढे जाणे “आहेच. 

नवीन वर्षात कोरोना च काय; पण कुठलीही भयंकर आपत्ती न येवो, नवीन वर्ष सर्वांना सुखा-समाधानाचे, आनंददायी, आरोग्यदायी जावो, हीच प्रभू चरणी प्रार्थना.🙏😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *