संकल्प



— वैशाली प्रसन्न सुळे —

२०२१ चा सूर्यास्त समीप आलाय. बरं -वाईट सारं काही आपल्या सोबतच घेऊन हा मावळता दिनकर सागराच्या पोटात आभाळाची रजई पांघरुन झोपी जाणार, तो कायमचाच. त्यानंतर हे जग चंद्रकळे खाली जरा विसावतेय न विसावतेय  तोच त्याच सागरातून होईल नववर्षाचा सूर्योदय!! आपल्यासोबत नवीन आशा ,आकांक्षा, स्वप्ने आणि बरंच काही घेऊन हा सूर्य येईल. या सुर्योदया बरोबरच आपल्याही मन- बुद्धीच्या क्षितिजावर नवसंकल्पांचा सूर्योदय होईल. होय, सूर्योदय-सूर्यास्त तसा रोजचाच. पण नववर्षाच्या या सूर्योदयाला नवसंकल्पांची झळाळी असते. कोणी नवे संकल्प करतात, तर कोणी मागचेच संकल्प टू बी कंटिन्यू करतात., तर कोणी काही कारणाने अपूर्ण राहिलेले संकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करतात. संकल्प हा नेहमी चांगल्या, सकारात्मक गोष्टींचा असल्याने  तो करणाऱ्याला आणि सगळ्यांनाच आनंद देऊन जातो. जसं, कुणी एखादी कला शिकण्याचा संकल्प केला तर त्याची कला सगळ्यांनाच आनंद देऊन जाते. कोणी कुठलाच संकल्प करीत नाहीत, अशा वेळी आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या कोणी काही संकल्प केला असेल तर त्याच्या पूर्तीसाठी सहाय्यभूत होणे हाही एक प्रकारचा संकल्पच होईल. नाही का? संकल्प करताना जितका दृढनिश्चय आणि मनोनिग्रह हवा ,तितकाच, नव्हे ,त्याहीपेक्षा अधिक तो पूर्ण करताना हवा. त्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची तयारी, वेळेचे नियोजन हेही हवेच हवे. आपण केलेल्या संकल्पाच्या प्रगतीची ठराविक मुदतीने नोंद करणे, आढावा घेणे हेही आवश्‍यक आहे. कोणी वर्षभर पुरेल असा एकच मोठा संकल्प करतात. तर कुणी छोटे-छोटे तीन-चार संकल्प करतात. ज्याच्या त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक अवस्थेप्रमाणे हे संकल्प ठरत असतात. नवीन वर्षाच्या प्रभाती शुभेच्छा संदेशांबरोबरच “मग काय नवीन संकल्प यावर्षीचा?” अशी सहाजिकच पृच्छा होते. कोणी आपले संकल्प जग जाहीर करतं तर कोणी ते पूर्णत्वास गेल्यावरच उघड करतात. काही संकल्प अगदी ठराविक असतात. उदाहरणार्थ चाळिशीतल्या गृहिणी दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीला,”खूप झालं आता घर- घर ,संसार आता मी जरा स्वतः कडे लक्ष देणार.” म्हणत वाढलेलं वजन कमी करण्याचा संकल्प करतात. याच वयोगटातल्या बर्‍याच पुरुष मंडळींचाही  हाच संकल्प असतो. मग नववर्षारंभी, पहाटेच रंगीबेरंगी शाल ,स्वेटर, मफलरांकित हे संकल्प प्रवण जीव जॉगिंग ट्रॅक, फुटपाथवर उमललेले दिसतात. आरोग्य संवर्धन, वजन कमी करण्याचा निर्धार त्यांच्या देहबोलीतून अगदी स्पष्ट दिसत असतो., मात्र कॅलेंडरची दोन ,तीन पानं उलटली की हा संकल्प प्रवण फुलांचा बहर ओसरतो. जॉगिंग ट्रॅक, फुटपाथ ओकेबोके दिसायला लागतात. रोजनिशी (आपली डायरी हो !)लिहिण्याचा संकल्पही खूप कॉमन. हा संकल्प करायला प्रोत्साहित करणाऱ्या आकर्षक डायऱ्या पण आधीच ,वर्षाअखेर पासूनच लक्ष वेधून खुणावत असतात. नववर्षाच्या प्रथम दिनी खूप थाटामाटात हे डायरी लेखन सुरू होतं. मात्र 31 डिसेंबरचं पान आणि पेन यांच्या भेटीचे भाग्य खूपच कमी डायरींना लाभतं .सहसा तरुण नाहीतर तरुण होऊ घातलेली मंडळी हा डायरी लेखनाचा संकल्प करतात . डायरीला लपवणं, जिवापाड जपणं, जिवलग मित्र वा मैत्रिणीलाच  फक्त वाचायला देणं असं सगळं सुरू असतं. कोणी गाणं, एखादं वाद्य शिकण्याचा संकल्प करतो तर कुणी बागकामाचा .

हे झालं सर्वसामान्यांच्या संकल्पांबद्दल. मात्र काही ध्येयवेडे, महत्त्वाकांक्षी लोक असा संकल्प करतात की संपूर्ण जीवन या संकल्पपूर्तीसाठी पणाला लावतात. त्यांच्या संकल्पपूर्तीमुळे जगाला, देशाला सगळ्यांनाच आनंद आणि अभिमान वाटतो. एखाद्या खेळाडूने केलेला विश्वविक्रम करण्याचा, पदक मिळविण्याचा संकल्प असो की एखाद्या शास्त्रज्ञाने केलेला संशोधनाचा संकल्प अथवा एखाद्या साहित्यिकाने, कलाकारांने केलेला उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती निर्मितीचा संकल्प. त्यांचे असे संकल्प प्रेरणादायी ठरतात .काही महान विभूतींचे तर अवघे जीवनच एक उदात्त संकल्प असते. आयुष्याचा क्षण अन् क्षण आणि रक्ताचा कण अन् कण ते या संकल्पपूर्तीसाठी खर्ची घालतात. आदरणीय आमटे कुटुंबिय, आदरणीय सुधाजी मूर्ती अशी काही मान्यवरांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत की ज्यांनी सेवेचा संकल्प घेऊनच जन्मभर समाजसेवा केली .,आणि करत आहेत .स्वतःला आनंद आणि समाजाला समाधान देणारा आदर्श असा हा संकल्प आहे. संतांनी, सत्पुरुषांनी पण जगाच्या कल्याणाचाच संकल्प घेतलेला दिसतो. कीर्तन-प्रवचन ,गायन विविध मार्गाने संत सतत उद्बोधन ,प्रबोधन करत असतात.’ जे जे आपणासी ठावे–‘ या न्यायाने संतांचा ज्ञानदानाचा संकल्प हा अविरत सुरूच असतो. आज स्वतंत्र भारताचे, एक महासत्ता बनण्या कडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्राचे नागरिक म्हणून आपण जगतो आहोत ते केवळ आपल्या स्वातंत्र्ययोद्धयांनी घेतलेल्या भारतमातेच्या दास्यमुक्तीच्या संकल्पा मुळेच .स्वातंत्र्य,सेवा, विशेष कामगिरी यांचा संकल्प आणि पूर्ती करणारी ही माणसं खरोखरीच थोर., पण आपण सर्वसामान्य सुद्धा छोटी-छोटी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पूर्तीचे संकल्प नक्कीच करू शकतो. काही छोटे संकल्प सुद्धा खूप मोठा आनंद देऊन जातात .आपल्या दैनंदिन व्यवहारात साहाय्यभूत ठरणाऱ्या मदतनिसांना स्मितहास्य देऊन ,त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा देणे, छोटीशी भेटवस्तू देणे, ज्यांना शक्य आहे त्यांनी छोटी रोपं तयार करून वाटणं ,सोसायटीतल्या जेष्ठयांनी एकत्र येऊन मुलांसाठी संस्कार वर्ग चालवणं ,वाचनालय चालवणं असे कितीतरी संकल्प करता येतील. सामूहिक संकल्प केले की अधिकच उत्साह येतो. संपर्क वाढतो. आपल्यालाही नवे काही शिकायला नक्कीच मिळते. एकंदरीतच संकल्प हे आनंदाचे आणि सकारात्मकतेच्या दिशेने नेणारे एक उत्तम साधन आहे. मंडळी, नववर्षाच्या संकल्पा बद्दल इतकं वाचून आता तुमच्याही मनात येतंय ना की यावर्षी करावाच एखादा संकल्प., पण वेळ कसा काढायचा? कसं जमेल? हा ही विचार त्यापाठोपाठ येतो आहे ना मनात? पण खरं सांगू का ,कुठलीही चांगली गोष्ट करायची म्हटली की फक्त इच्छाशक्ती हवी. संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगळा वेळ द्यायलाच नको. थोडं नीट नियोजन केलं की आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग म्हणून हे संकल्प आपण करू शकतो. एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते अतिशय व्यस्त असतात. पण त्यांना वाचनाची खूप आवड. मग त्यांनी सेटवर मोकळा वेळ मिळेल तेव्हा किंवा प्रवासात दहा पानं रोज वाचायचेच असा संकल्प केला. अशाप्रकारे वर्षाला साधारणपणे त्यांची दहा ते बारा पुस्तक आरामात वाचून होतात. एखाद्या गृहिणीला काही स्तोत्र पाठांतर करायचं असेल, नवीन भाषा शिकायची असेल तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरात जातो अशावेळी एका मोठ्या कागदावर आपल्याला जे पाठांतर करायचे आहे ते लिहून किंवा प्रिंट करून चिटकवून ठेवले तर जाता येता सहज पाठांतर होते. म्हणजे मुद्दाम वेगळा वेळ पण द्यायला नको. चालता-बोलता संकल्पपूर्ती होते. पटलं की नाही ?चला तर मग, या नवीन वर्षाच्या सूर्योदयाबरोबर आज एक नवीन संकल्प आपण सगळेच करूया. तो नक्की पूर्ण होवो आणि तुम्हाला आणि सगळ्यांना च  खूप खूप आनंद मिळो ह्याच माझ्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा!!

लेखिका:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *