—–देवश्री अंभईकर धरणगांवकर —–
पहिली बाजू: परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी कारण त्यामुळे संवाद साधताना क्लिष्टपणा कमी होतो. परभाषेतील काही शब्द वापरल्याने जर संवाद साधणे सुकर व सुगम होत असेल तर अशी सरमिसळ दैनंदिन व्यवहारात सोयीची असते. विशेष करून जेव्हा त्या परभाषेतील शब्दाचा योग्य प्रतिशब्द उपलब्ध नसेल किंवा असलेला प्रतिशब्द उच्चारायला किंवा समजायला कठीण असेल तर अशावेळी आपल्याच भाषेतील शब्दाचा आग्रह धरला नाही तरीही चालू शकते. तसेच सदा सर्वकाळ आपल्या भाषेत सर्वच प्रतिशब्द असतीलच असे नाही. काही वस्तू, वैज्ञानिक संज्ञा, परदेशी खेळ, वेगळ्या धर्माच्या व संस्कृतीतील गोष्टी ज्या मुळात परकीय असतात तेव्हा त्यांचे शब्द आपल्याकडे असतीलच असे नाही. अशा शब्दांसाठी आपल्या भाषेत नवीन शब्दांची रचना केली गेली तरी ती सहज वापरण्यायोग्य असेल व सर्वांनाच समजेल असे नाही. उदाहरणार्थ- ‘माझ्या मोबाइल फोनला चार्ज करून घेऊ का?’ हे वाक्य शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्नांत ‘माझ्या भ्रमणध्वनीयंत्रास विद्युतपुरवठा करून पुन्हा सक्रिय करू का?’ अशा प्रकारचे एखादे लांबलचक क्लिष्ट वाक्य तयार होईल जे दुर्बोध असू शकते. इथे ‘चार्ज’साठी योग्य शब्द सापडत नसेल तर मूळ इंग्रजी शब्द वापरणे सोयीचे होते म्हणून आपल्या मूळ भाषेला धक्का न लावता अगदी आवश्यक तेथे परभाषेतील शब्दांची सरमिसळ असावी.
जगात अशी एकही भाषा नाही किंवा नसेल जिच्यात इतर भाषांमधले शब्द मिसळले गेले नसतील. मराठीचेच उदाहरण घेतले तर फारसी, उर्दू, इंग्रजी व इतर भारतीय भाषांतील असंख्य शब्द मराठीत इतके खोलवर रुजलेले आहेत की त्यांचे मूळ मराठी नाही हे सांगूनही खरे वाटणार नाही. उदाहरणार्थ बाग, शहर, कारखाना, दवाखाना, मेहनत, मोफत, बाजार, दुकान, बस, स्टेशन, लिफ्ट, टॉर्च, मोबाईल, रेडिओ इत्यादी. कधी परभाषेतील शब्दांचे मूळ रूप थोडेसे बदलले जाऊन तेही वापरात येते. उदाहरणार्थ हिंदीतील ‘लालटेन’ म्हणजे कंदील हा शब्द मूळ इंग्रजी ‘लँटर्न’चे बोलीभाषेतील रुप आहे. भारतीय भाषांपुरते बोलायचे झाले तर असे म्हणतात की भारतीय भाषा या देववाणी संस्कृतमधून उगम पावलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक भारतीय भाषेत अनेक संस्कृत शब्द त्यांच्या मूळ अर्थानेच वापरात असलेले दिसतात. तसेच कित्येक इंग्रजीतील शब्द त्यांचे प्रतिशब्द असतानाही केवळ सोपे व सोयीस्कर असल्याने वापरले जातात. इंग्रजी तर सध्या जागतिक भाषा असल्यासारखीच आहे. जिथे जिथे इंग्रजीच्या संपर्कात स्थानिक भाषा आल्या तिथे तिथे इंग्रजी शब्दांनी शिरकाव केला त्यामुळे खरे तर संवाद सोपा झालेला दिसतो.
समाजाप्रमाणेच भाषाही परकीय आक्रमणे झेलत असते. त्यातून स्वतःचे अस्तित्व कायम ठेवत नवीन शब्दांना सामावून घेत विकसित होत असते. कालानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल घडतात आणि भाषाही त्याला अपवाद नसते. प्रमाणभाषेत व लिखित स्वरूपात जरी परभाषेतील शब्द न वापरता त्यांचे अस्तित्वात असलेले किंवा नव्याने बनवलेले प्रतिशब्द वापरल्या गेले तरी बोलीभाषेत मात्र परभाषेतील शब्दांचा वापर सर्रास होताना दिसतो. जेव्हा संवाद साधणे महत्त्वाचे असते तेव्हा भाषिक औदार्य दाखवून परभाषेतील शब्दांना योग्य त्या प्रमाणात आपल्या भाषेत सामावून घेण्यास हरकत नसावी.
दुसरी बाजू: भाषेत परभाषेतील शब्दांची सरमिसळ नसावी कारण त्यामुळे मूळ भाषा प्रदूषित होते. इतर भाषेतील/भाषांतील शब्दांच्या अमर्यादित वापराने मूळ भाषा फक्त क्रियापदांपुरती वापरल्या जाते. भाषेची व्याकरणदृष्ट्या व शब्दरचनेनुसार जी एक ठराविक जडणघडण असते तिला धक्का पोहोचू शकतो व तिचे सौंदर्य कमी होते. कोणतीही भाषा थोडीफार लवचिक असतेच. नवीन शब्द जन्माला घालण्याची क्षमता प्रत्येक भाषेत कमी-जास्त प्रमाणात असतेच. उदाहरणार्थ संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा इतक्या समृद्ध आहेत की अगदी वैज्ञानिक/तांत्रिक व्याख्या करण्यासाठी जे नवे शब्द लागतात तेसुद्धा ह्या जन्माला घालू शकतात तसेच त्यांचा व्यवहारात यशस्वी वापरही होताना दिसतो. उदाहरणार्थ काही मराठी सोपे शब्द म्हणजे दूरध्वनी(इंग्रजी-टेलिफोन), दूरदर्शन(टेलिव्हिजन), संप्रेरक(हार्मोन), लोहमार्ग(रेल्वे) वगैरे ज्यांचा भाषेत समावेश त्यांच्या वैज्ञानिक-शोधांनंतर झाला.
भाषा हे मनुष्याचे व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. आपल्या भावना किंवा विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे शब्दांचे सामर्थ्य प्रचंड असते. आपल्या भाषेत जर आपल्याला जे म्हणायचे व सांगायचे आहे त्याकरिता योग्य शब्द उपलब्ध असतील आणि ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे तेही जर समान-भाषिक असतील तर उगाच परभाषेतील शब्दांची सरमिसळ करण्याची आवश्यकता नसते. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जर व्यक्तीला मातृभाषेची किंवा कोणत्याही एका भाषेची उत्तम जाण असेल तर व्यक्त होणे सोपे होते. भाषेवर प्रभुत्व हे आपले विचार नेमकेपणे व्यक्त करण्याचे साधनच असते. साधारणपणे आपण विचार करताना इतर भाषेतील शब्दांची सरमिसळ न करता विचार करतो आणि त्यानुसार कृती/कार्य करतो. उदाहरणार्थ एखादा मराठी भाषिक तहान-भूक लागली असेल तर मनात ‘मी आता वॉटर ड्रिंक करतो अँड थोडे फूड खातो!’ असा विचार करत नाही तर ‘मी आता पाणी पितो. काही खाऊन घेतो!’ असाच विचार करतो आणि त्यानुसार जल-अन्न ग्रहण करण्याची कृती करतो. हे असे इतके नैसर्गिक व स्वाभाविक असताना विनाकारण परभाषेतील शब्दांचा भरणा कशाला करायचा? ते संयुक्तिक वाटत नाही. परभाषेतील शब्दांचा वापर शक्यतो टाळून जेव्हा आपण आपल्या मूळ भाषेत व्यक्त होतो तेव्हा तिचे शब्दभांडार आपल्यासमोर आपोआप उघडते आणि आपल्या शब्द-योजनेत, बोलण्यात-लिहिण्यात अधिक नेमकेपणा येतो. भाषेचे सौंदर्य आणि शुचिताही अबाधित राहते म्हणून परभाषेतील शब्दांची सरमिसळ नसावी.
प्रत्येक भाषा ही काळासोबत अधिकाधिक प्रगल्भ होत असते. काही शब्द अधिक वापरात असतात तर काही क्वचित वापरल्या जातात. प्रत्येक भाषेचे स्वतःचे शब्दवैभव असते. ते जतन करण्याची आणि ती भाषा व्यवस्थित बोलण्याची व लिहिण्याची जबाबदारी ती भाषा येणाऱ्या प्रत्येकाची असते तरच पुढच्या पिढ्यांना मूळ भाषेचा वारसा नीट मिळतो.
