सनविवि माहितीपूर्ण लेख पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?

पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?

रसिका राजीव हिंगे

“मॅडम, कळलं का तुम्हाला! बारावीतील ऋत्विक ने काल आत्महत्या केली.”

     कॉलेजमधल्या मॅडम ने ही बातमी सांगितली अन् सरसरून काटा आला अंगावर, ऐकून क्षणभर थिजल्यासारखे झाले. काही सुचत नव्हतं.  “का? असं, कोणतं आभाळ कोसळलं त्याच्यावर?  कारण काय आत्महत्या करण्याचे?” इतकं जीवावर उदार होऊन कसं काय ते संपवू शकतात?” खोलवर विचार करत याचं मूळ शोधत गेले तर मन विषण्ण होतं. परस्पर नात्यातील संवाद हरवत चालला आहे. आईवडील आणि मुलांमध्ये नाते फक्त नाते राहिले आहे. वात्सल्य,प्रेम, जिव्हाळा असला तरी व्यावहारिक स्तरावर आहे असे वाटायला लागले. याला कारणं बरीच असली तरी व्यवहार हा प्रेमाची, वात्सल्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे हे नक्की. 

     का इतकी कमकुवत आहेत ही मुलं! काय वाटत असेल मनात आत्महत्या करतांना? इतका टोकाचा निर्णय घ्यावासा कसा वाटला? सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या? भीती,भय काहीच कसं वाटत नाही? प्रश्नांची मालिका संपतच नाही. नाती बदलली, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, फक्त मी आणि माझे एवढाच विचार करण्याची संकुचित वृत्ती. स्वतःच्या करिअरसाठी मुलांकडे होणारे दुर्लक्ष. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी सगळ्यांचं क्षेत्रात अग्रेसर असावेत हा आईवडिलांचा अट्टहास. याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा कधी विचार केला जात नाही. त्याला काय शिकायचे आहे, तुला काही समजत नाही असे म्हणून त्याच्या आवडीनिवडींना काही महत्वच द्यायचे नाही, याचा परिणाम मुलांना नैराश्य येतं. वास्तविक पाहता घर हे सगळ्यांचे असते, कोणताही घरासंबंधी निर्णय घेतांना सगळ्यांचा समावेश असावा असे गृहितक आहे. मुले जरी असली तरी त्यांचेही मत विचारात घेणे गरजेचे आहे.  पाल्यांच्या मनात यामुळे घरासंबंधी आस्था निर्माण होते, आईवडिलांविषयी आदर आणि प्रेम निर्माण होत.

     काळ बदलत चाललाय. जगण्याची शैली बदलते आहे, काळानुसार बदल अपेक्षित असले तरी काही अढळ अशा गोष्टी असतात किंवा असाव्यात. काळानुरूप समाजव्यवस्था आणि त्याबरोबर चालणे हे जरी खरे असले तरी संस्कृती बदलणे अपेक्षित नाही. जेव्हा संस्कृती बदलते तेव्हा नको त्या गोष्टी घडत जातात, असं खरचं असेल असे वाटते अशा काही घटना पाहिल्या, वाचल्या की. कारण संस्कृती, संस्कार, परंपरा जपण्याची जबाबदारी पालक या सदरातच येते

      मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की लगेच तळपायाची आग मस्तकात कशी जाते? मुलांवर संस्कार करणाऱ्या माताच कमकुवत झाल्या की मागच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित होताना ते घेण्याची ताकद या पिढीत नाही. आईबाप होणं सोपं आहे पण जबाबदार पालक होणं अवघड आहे. फक्त जन्माला घातले म्हणजे आईबाबा झाले असे होत नाही. फक्त कडक शिस्त असली की मुलं ही शिस्तीत वाढतात, आदर्श होतात असे नाही. कधी आंजरून गोंजरून तर कधी प्रेमळ शब्दात समजावून, प्रसंगी एखादेवेळी रागावून सुद्धा मुलांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर आईबाबा बद्दल त्यांच्याही मनात आदर, प्रेम कायम राहील. प्रत्येकवेळी शिस्तीचा बडगा दाखवून मुलं कोडगी होतात, त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही,उलट ते जास्त बिथरतात. मुलांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे, निदान त्याला त्याचे भले काय आहे हे कळेपर्यंत तरी. नाहीतर असे म्हणावेसे वाटेल 

      हाती नाही दोर

      दारी नाही आड

      त्याने फुलझाड लावू नये

      सोसता सोसेना संसाराचा भार

      त्याने आईबाप होऊ नये

     घराघरांतून होणारे संस्कार, मोठ्यांचे अनुकरण आणि कुल परंपरा याचा परस्परांतील नात्यावर परिणाम होत असतो. संस्कार ही एक प्रक्रिया आहे. ती हळूहळू पण नकळत घडत जाते. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीची गरज म्हणून एका घराचे दोन तीन घर झाले, लहान कुटुंब काळाची गरज त्यामुळे एका घरात जास्तीतजास्त दोनच मुले आहेत. एकेक नाते संपुष्टात येऊ लागले आहे. संसाराचा गाडा सुरळीत चालावा, महागाईशी दोन हात करता यावे म्हणून  स्त्री ने घराचा उंबरठा ओलांडला. अन् ज्या वयात आईवडिलांची विशेष गरज असते त्याच वयात मुलांची ससेहोलपट होऊ लागली. आपला पाल्य काय करतो आहे, त्याचे मित्र कोण, कोणत्या सोशल मीडियावर तो जास्त ॲक्टिव आहे, हे पाहणे गरजेचे असतांनाच आईबाबा वेळ देऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. माती ओली आहे तोपर्यंत हवा तो आकार देता येतो. अन्यथा जे आहे ते स्वीकारून कर्माची फळं भोगणे भाग आहे. नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि संवाद हवा.  आदरयुक्त मैत्री हवी, यामुळे नाते घट्ट आणि सुदृढ होत जातं. आईवडीलांचे आणि मुलांचे नाते हे मैत्रीपूर्ण असावे. असं म्हणतात एका विशिष्ट वयानंतर मुलांचे मित्र व्हावे.  आपला पाल्य काय सांगतो आहे, याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अपेक्षा न ठेवता संवाद साधत त्यांच्या विचारांचा चिडचिड न करता शांतपणे विचार केला तर अपेक्षाभंग होत नाही. मुलांच्या मनात पालकांविषयी आदरयुक्त भाव, प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. स्वतच्या जबाबदारीचे ओझे मुलांवर लादले तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही.

     आजच्या या स्मार्ट युगात आणि कोविड मुळे अगदी बाल शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईल शिवाय पर्याय नव्हता. या काळात पालकांची दुहेरी जबाबदारी होती.  स्वतःचे काम आणि मुलांचा अभ्यास, शिवाय मुले मोबाईल मध्ये काय पहातात आहे याचाही विचार करावा लागत होता. आता शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. पण मुले अजूनही मोबाईल नावाच्या राक्षसाचा तावडीत आहेत. उगाचच पाल्याचा अपमान करत त्याला यापासून सोडवणे धोकादायक ठरू शकते. यावेळी संयम ठेवून, गोड बोलून त्यांना मोबाईलच्या विळख्यातून  बाहेर काढणे गरजेचे आहे. त्याचे फायदे तोटे समजतील अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर अपेक्षित यश मिळेल.

     अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, प्रसंगातून पालकांनी आपलं प्रेम दिसू दिले तर पाल्य ही आपोआप जोडल्या जातात. पालकांनी पाल्यारुपी झाडाला प्रेमाचे खतपाणी घातले तर ह्याचे वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. फक्त अति खतपाणी नको की जेणेकरून रूप कुजून जाईल. मुलांचे मालक नव्हे पालक व्हावे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *