सनविवि पुस्तक परिचय ARCHITECTURE The Science of Vaastu Shastra ….

ARCHITECTURE The Science of Vaastu Shastra ….

लेखक- श्री.अप्पण्णा सरदेशपांडे 

‘वास्तुशास्त्र’ हा शब्द काही आपल्याला  अपरिचित नाही. मात्र आधुनिक विज्ञानाशी सुतराम संबंध नसलेले प्राचीन काळातील एक जुनेपुराणे शास्त्र ह्या अर्थी वास्तुशास्त्राची आणि आपली ओळख आहे.

वास्तविक पाहता आपल्या पूर्वजांनी मोठ्या बारकाईने निरीक्षण करून अभ्यासपूर्वक वास्तुशास्त्र बनवले आहे. माणसाच्या वृत्तीला, प्रकृतीला मानवेल; त्याला सुखकर होईल असा निवारा कसा बांधावा हे त्यांनी लिहून ठेवले आहे. तेच आपले वास्तुशास्त्र.

स्थापत्याविषयी अतिशय आस्था असलेले निष्णात वास्तुविशारद श्री.अप्पण्णा सरदेशपांडे ह्यांनी “ACHITECTURE  The Science Of Vaastu Shastra  ” ह्या पुस्तकात त्यांच्या ४७ वर्षांच्या दांडग्या अनुभवांचा धांडोळा घेतला आहे. अगदी सुस्पष्टपणे हा विषय मांडला आहे.

सूर्यावरील अभ्यास, मानवजाती जिवंत राहण्यासाठी असलेली गरज, पर्यावरण रक्षण, निसर्गसान्निध्य, कार्बन फूटप्रिंट, ग्रीन बिल्डिंग, लीड बिल्डिंग हे हल्लीचे आधुनिक विचार आपल्या पूर्वजांनी कित्येक वर्षांपूर्वीच वास्तुशास्त्रात चर्चिले आहेत. 

लेखक म्हणतात- पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश (नाद/आवाज) हे माणसाचे मूळ ऊर्जास्रोत आहेत. कोणतीही मोकळी जागा चांगली किंवा वाईट नसते. त्यावर वास्तू उभारतो, तेव्हा आपण त्या मूळ ऊर्जास्रोतांना अडवतो, म्हणून कोणतीही वास्तू बांधताना त्या वास्तूत राहणाऱ्याला त्या शक्ती नीट उपभोगता याव्यात, त्रासदायक ठरू नयेत असा कटाक्ष बाळगायला हवा. वास्तुच्या खिडक्या, दारे, प्रवेशाच्या जागा फक्त सौंदर्यशास्त्रासाठी बांधायच्या नसतात; तर वास्तुत राहणाऱ्याचे भोवतालच्या परिसराशी नाते जोडले जावे, त्या दोघांमध्ये सुमेळ राहावा अशा बांधायच्या असतात असा दृष्टिकोन लेखकांनी मांडला आहे.

त्यामागची कारणमीमांसा करताना माणसाच्या राजस-तामस-सात्विक वृत्ती(स्वभाव), त्याच्या वात-कफ-पित्त प्रकृती(आरोग्य), त्याच्या हालचाली-सवयी-व्यवसाय; दिशा अशा अनेकविध गोष्टींचा विचार केलेला दिसतो. 

विस्मृतीत गेलेल्या वास्तुशास्त्रातील बहुविध पैलू लेखकांनी उघडकीला आणले आहेत. आकृत्या देऊन समजावले आहेत, शिवाय त्यानुसार बांधलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांचे अनुभव सांगणारी सकारात्मक पत्रेही मांडली आहेत.

हे पुस्तक स्थापत्याच्या एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या सिव्हिल इंजिनीअरला, एखाद्या वास्तुविशारदालाच काय, तर स्वतःची वास्तू बांधू इच्छिणाऱ्या कोणालाही उपयुक्त ठरेल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *