— सौ.ऋचिता बोधनकर दवंडे–
सारंग आणि सुरभि प्रधान पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले एक गोड जोडपे. कॉलेजमध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. कॅम्पसमध्ये त्यांना उत्तम कंपनीत नौकरीही मिळाली. आडकाठी करण्यासारखे काहीच नसल्यामुळे घरच्यांच्या संमतीने नंतर दोघेही विवाहबंधनात अडकले.
लग्नानंतर दोघेही नौकरीच्या निम्मिताने नागपूरहून मुंबईला शिफ्ट झाले आणि त्यांच्या खऱ्या आयुष्याला सुरवात झाली. सकाळी लवकर आटोपून लोकल पकडायची आणि ऑफिस गाठायचे. संध्याकाळी पुन्हा लोकलमध्ये धक्के खात घरी यायचे ह्यात दोघांचीही दमछाक होत असे. फक्त शनिवार, रविवार काय तो एकमेकांसाठी मिळायचा. थोडक्यात काय तर मुंबईतील फास्ट आयुष्याप्रमाणे त्यांचेही आयुष्य जलद गतीने धावत होते.
हळुहळु जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर सारंग व सुरभि आपआपल्या नौकरीत एक एक पायरी वर चढत होते. जसे आर्थिकदृष्ट्या थोडे स्थिरावले तसे दारात कार उभी राहिली. त्यामुळे रोजची धावपळ थोडी सुसह्य झाली होती. काहीच दिवसात नौकरीत बढती घेत घेत दोघेही कमी वयात उच्चपदी पोहचले होते. साहजिकच त्यामुळॆ कामाचा व्यापही वाढला होता. भाड्याच्या घरातून आता ते स्वतःच्या आलिशान घरात शिफ्ट झाले होते. भरपूर पैसा, सर्व सुखसोयींनी युक्त स्वतःचे घर, उंची वस्तु, दोघांच्या दोन कार सगळे सुख होते पण दोघांना एकमेकांसाठी वेळ मात्र नव्हता. शनिवार, रविवार पण आजकाल काम, मिटींग्स आणि प्रेसेंटेशनची तयारी ह्यातच जात असे. रात्री झोपण्यापुरतीच ते एकमेकांसोबत राहात. बाकी वेळ फक्त काम आणि काम. दोघांच्याही आई वडिलांनी कित्येकदा सुचवूनही त्यांनी स्वतः आई वडील होण्याचे मात्र मनावर घेतले नाही.
अशातच एकदा त्यांना त्यांच्या जवळच्या मैत्रिणीच्या बाळाच्या बारशाला जाण्याचा योग्य आला. तिथे गेल्यावर तेथील उत्साही आणि आनंदी मंडळी, सजवलेला पाळणा, बाळाच्या छोट्या छोट्या ड्रेसेसनी सजलेला बाळंतविडा, आईपणामुळे वेगळेच तेज आलेली त्यांची मैत्रीण आणि मुख्यत्वे त्या गोंडस बाळाला पाहताच ते दोघेही थोडेसे अस्वस्थ झाले. आपल्याकडे सगळेकाही आहे पण हा गोड आनंद मात्र नाही ह्याची जाणीव दोघांनाही झाली. त्या बाळानेच जणू त्यांच्यातील आई वडिलांना साद घातली. घरी परतल्यावर खास वेळ काढून हा गोड आनंद आपल्याही आयुष्यात यावा ह्यासाठी प्रयत्न करायचे ह्यावर दोघांचेही एकमत झाले. दुसऱ्यादिवशीपासून सारंग आणि सुरभि अगदी ठरवून एकमेकांसाठी वेळ काढायला लागले. सुट्टीच्यादिवशी कामाऐवजी एकमेकांसोबत वेळ घालवायला सुरवात झाली. बाळासाठीही त्यांनी प्रयत्न सुरु केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र येत नव्हते. होईल होईल म्हणता म्हणता तीन चार वर्षे निघून गेली. विविध डॉक्टर्स आणि सगळ्या आधुनिक औषधोपचार पद्धतीनेही पदरात काहीच पडले नाही. दोघेही निराश झाले. मुळात काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि इतके सगळे प्रयत्न करूनही हाती काहीच येत नाही ह्याचा आजकाल सुरभिवर विपरीत परिणाम होत होता. तिची तब्येत खालावत चालली होती. कामाच्या व्यापातून बाहेर पडून आणि आई बाबांचे ऐकून आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता ह्या एकाच विचाराने मनावर एक प्रकारची मरगळ येत चालली होती.
मागील काही वर्षांपासून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मावशींच्या नजरेतून सुरभिची ही अवस्था लपून राहिली नाही. सारंग आणि सुरभिच्या आत्मियतेच्या वागणुकीमुळे मावशी अगदी घरातल्यासारख्याच झाल्या होत्या. एके दिवशी वेळप्रसंग पाहून मावशींनी त्यांना मूल दत्तक घेण्याविषयी सुचविले. मावशींची मुलगी लिना पण दत्तकच घेतली आहे हे कळल्यावर तर सारंग आणि सुरभिला आश्चर्यच वाटले. कारण लिना आणि मावशी सहवासाने आणि परस्परातील प्रेमाने इतक्या एकरूप झाल्या होत्या की त्या खऱ्या मायलेकी नाहीत हे सांगून सुद्धा विश्वास बसणे शक्य नव्हते. मावशींच्या ह्या पर्यायामुळे जणू सारंग विशेषतः सुरभिच्या मनावरील मरगळ क्षणात दूर झाली. दोघांनीही ह्या पर्यायाचा सखोल विचार करायला सुरवात केली. दोघांच्याही आईवडिलांशी चर्चा झाली आणि जेव्हा त्यांनीही ह्याला पाठिंबा दिला तेव्हा मात्र सारंग आणि सुरभि ह्यांनी बाळ दत्तक घेण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले.
बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया जाणून घेऊन, वेगवेगळ्या अनाथालयांची माहिती काढून , तिथे भेट देऊन, तेथील लहान बाळांना बघून शेवटी ” तारांगण अनाथालय ” येथील बाळ दत्तक घेण्याचे ठरले. आवश्यक ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज त्यांच्या आयुष्यातील तो महत्वपूर्ण दिवस आला होता.
‘ मि. आणि मिसेस प्रधान ‘ अशी हाक कानावर येताच इतक्या वेळ ह्या सगळ्या विचारात गढलेले सारंग आणि सुरभि भानावर आले. आत ऑफिसमध्ये जाताच पेपरवर्क पूर्ण होऊन त्यांचे बाळ सुरभिच्या हातात देण्यात आले. बाळाला बघताच दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सगळी सुखं असतानाही आपल्या आयुष्यात हीच ती सुंदर आणि गोड उणीव होती ह्याची जणू सारंग आणि सुरभि ह्यांना खात्रीच पटली. बाळाच्या येण्याने आयुष्याला पूर्णत्व मिळाल्याची जाणीव झाली. सुरभीच्या कुशीतील त्या चिमुकल्याने त्यांचे पालकत्वाचे स्वप्न आज पूर्ण केले होते …………
