–निवेदिता शिरवटकर–
नेहमीप्रमाणे आजही मानसी मॅडमनी अगदी मनापासून ‘ संतवाणी ‘ शिकवली. त्यांच्या मुखातून जणू साक्षात सरस्वतीच बोलत असे. मुलेही त्यांचे लेक्चर अगदी रंगून ऐकत असत. आजही त्यांच्या गोड, सुरेल आवाजात त्यांनी तुकारामांच्या सर्व पंक्ती गाऊन दाखवल्या……
” भेटी लागे जीवा ss … लागलीसी आस ss ”
एवढ्यात बेल वाजली. शेवटचं लेक्चर होतं. मुलं ठरल्याप्रमाणे शिस्तीने बाहेर पडली. पुढल्या दहा मिनिटात सर्व वर्ग रोजच्या सारखा रीता झाला. मानसी मॅडमनी स्मार्ट बोर्डची सर्व कनेक्शनस् बंद केली आणि निघायची तयारी करत होत्या….. एवढ्यात त्यांची नजर पडली ती काहीश्या थबकत , अडखळत बाहेर जाणाऱ्या स्वप्नावर !..…
‘ स्वप्ना ! ‘…..मोठी चाणाक्ष , धीट आणि लाडकी स्टूडेंट होती मानसी मॅडमची !
पण आज तिच्या चेहऱ्यावर काहीतरी भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसत होतं. एकीकडे भराभर पेपर्स आणि पुस्तकं आवरता आवरता मानसी मॅडमनी हसत विचारलं,
” काय गं ? आज एका मुलीला घरी जावसं वाटत नाही का ? ”
” नाही… तसं नाही मिस ….. मी एक गोष्ट विचारू का तुम्हाला ? ” तिच्या टपोऱ्या डोळ्यात काही प्रश्न तरंगत होते हे निश्चित !
” अं ..काय ? ….हो…बोल ना! ”
” मिस आज तुम्ही संतवाणी खूप छान शिकवली ….. मला सुद्धा तुकारामांचा हा अभंग खूप आवडला.
पण …पण ……त्यात ते ईश्वराला आर्त साद घालतात. …..का?…आणि खरंच तो आला का, दिसला होता का त्यांना? “…….
” आणि….आणि मॅडम, ह्या संतवाणीचा आम्हाला …आमच्यासारख्या … आय मीन …आजच्या जगात ह्या सर्वाचा काय उपयोग ?? ”
मानसी मॅडम तिचे ते एका पाठोपाठ एक प्रश्न ऐकून क्षणभर चमकल्या …….त्यांना हे अपेक्षित नव्हते.
पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्यातील ‘ शिक्षक ‘ भानावर आला अन् हलकेच तिच्या खांद्यावर थोपटत स्मित हास्य करत म्हणाल्या…. ” उद्या हाच प्रश्न माझ्या लेक्चरमध्ये विचार. क्लासमध्ये ह्याचे उत्तर देईन …….म्हणजे जर इतर कोणाच्या मनात तुझ्यासारखे प्रश्न असतील तर त्यांचेसुद्धा डाऊटस् दूर होतील. “
तिच्या लगबगीने बाहेर पडणाऱ्या खुज्या मूर्तीला मानसी मॅडम न्याहाळत होत्या खऱ्या; पण तिच्या प्रश्नांनी त्यांच्याही मनात आज बऱ्याच दिवसांनी काहूर माजलं होतं……
त्यांची पावले जरी घराच्या दिशेने वळली असली तरी मन मात्र स्वप्नाने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यात गुंग झाले होते….
‘ जर स्वप्नाच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो तर इतर मुलं सुद्धा असाच विचार करत असतील का ? उद्या मुलांना खरंच काही अंशी तरी खुलासा करावा लागेल….. मुलं ह्या वयात जर खोलवर विचार करू शकत असतील तर त्यांच्या प्रश्नांना कधीतरी उत्तर द्यायला हवं … कुठेतरी, कधीतरी त्यांना त्यांच्या हिताचा योग्य मार्ग मिळावा म्हणून एक ‘ शिक्षक ‘ ह्या नात्याने थोडा प्रयत्न करायला हवा…….नाहीतर ही पिढी फक्त मार्क्स आणि स्पर्धेच्या चढाओढीत जाणते अजाणतेपणे स्वतःला हरवून बसेल ‘……
‘ त्यांच्या ह्या कोवळ्या वयातसुद्धा फक्त चांगले ग्रेड्स, मनाजोगते करियर , सीक्युर्ड जॉब , परफॉर्मन्स अप्रेजल्स , बिग पॅकेजेस, सॉफिस्टिकेटेड लाईफ स्टाईल, स्टेटस , त्या स्टेटसला साजेसा आयुष्यातील जोडीदार , समाजामधील नाव लौकिक , सोशल इमेज एवढीच चर्चा होते. दुसरा वैचारिक दृष्टिकोन आपणच त्यांच्यासमोर जर ठेवू शकलो नाही तर त्यांना देखील ही संधी कशी मिळेल ? ‘..…
‘ आपणच निर्माण केलेल्या आधुनिक मायाजालात ही उद्याची पिढी फसत जाईल आणि न जाणो जर कधी अपयश , अचानक आलेले बिकट प्रसंग , दुःख , अपेक्षाभंग या सर्वांचा सामना करायची त्यांच्यावर वेळ आली तर तेव्हा त्यांना त्यांचा योग्य मार्ग सापडेल? प्रत्येक वेळी आधार देणारी, साथ देणारी,मायेची, जीवाभावाची माणसे असतीलच असही नाही ! ‘
मग नुकत्याच वाचलेल्या कोणा एका कादंबरीतील वाक्य त्यांना आठवलं ….. ‘ ह्या मायावी जगात फक्त दोनच गोष्टी शाश्वत अन् अटळ आहेत. त्या म्हणजे बदल आणि मृत्यु ! ‘…..
त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर आला तो नैराश्येने ग्रासलेला त्यांच्या एकुलत्या एका मुलीचा, ‘ प्राजक्ताचा ‘ निरागस चेहरा !
लाडाकोडात वाढलेली, हसरी, बोलकी, चुणचुणीत ! ……एखाद्या जिवंत खळखळणारा झराच जणू! गेले सहा महिने ती ‘ डीप डिप्रेशन ‘ मध्ये गेल्यामुळे मानसोपचार घेत होती……,.अन् कारण काय ?
तर गेले चार वर्ष तिचा अतिशय जिवलग मित्र मनोज आणि ती एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत होते ….. दोघेही अतिशय टॅलेंटेड , महत्वाकांक्षी, मेहनती. विचार जुळले, मते जुळली….. ह्या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. लग्नाच्या आणाभाका झाल्या. दोघांनी घरी देखील सांगून टाकलं आणि मग अचानक दोघांमध्ये काय बिनसलं कोणास ठाऊक? ……कळलं की दोघांच्या लाईफमधल्या ‘ प्रायोरिटीज ‘ वेगळ्या आहेत.
घेतला निर्णय तडकाफडकी!! झाले मोकळे दोघेही कमिटमेंटपासून ! … मनोज तर MS करण्यासाठी लगेच जर्मनीला गेला सुद्धा!
त्यानंतर काही दिवस प्राजक्ता देखील ‘ मला काही फरक पडत नाही ‘ असा चेहरा घेऊन वावरत होती आणि मग अचानक हळूहळू सर्वांना जाणवायला लागलं की कुठेतरी खोल तिच्या मनात काहीतरी रुतलय !…… कुठेतरी जखम झाली आहे हे निश्चित!
मग काय ! तिची दिनचर्या बदलली. रात्रभर जागरण, खाण्यापिण्याच्या वेळा विचित्र होऊ लागल्या.
वेळकाळाचे बंधन नाही. सततची पोटदुखी , अपचन! ….. कशात मन लागेना. त्यात भर म्हणून की काय; नेट फ्लिक्सवरच्या वेब सिरीजचं व्यसन ! ऑफिसमधला परफॉर्मन्स घसरू लागला. ..….. ‘ मला ह्या प्रोजेक्ट मध्ये रस वाटत नाही ‘ ही सबब सांगून तिने जॉब सोडला. कहर म्हणजे तासनतास बेडरूममध्ये स्वतःला जेव्हा कोंडून घेऊ लागली; तेव्हा कुठे मानसी मॅडमना जाणवलं की आता कोणाची तरी प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. त्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता !
त्यानुसार त्यांनी तिला समुपदेशन करण्यासाठी सेशनला न्यायला सुरुवात केली. आता थोडी ती सावरली आहे. हळूहळू बदल जाणवू लागला आहे. लवकरच तिची गाडी रुळावर येईल ही आशा!……
पण अजून प्रश्न हा होताच की !
आज स्वप्नाच्या प्रश्नांमुळे त्या इतक्या अस्वस्थ का झाल्या? त्यांना प्राजक्ताच्या डिप्रेशनची तेव्हा आठवण का यावी? ….ह्या दोन गोष्टींचा काय संबंध ? ….
कदाचित…..कदाचित संत तुकारामच जणू त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ पाहत होते ……
मग त्यांना आठवल्या त्या दुसऱ्या एका अभंगातील ओळी,
‘ आपुले मरण पाहिले म्या डोळां ,
तो जाहला सोहळा अनुपम्य …..‘
किती योग्य शब्दात तुकोबांनी मानवी अहंकाराचे वर्णन केले आहे ? असा अहंकार किंवा ‘ मी पणा ‘ की जो आपल्याला ह्या मोहमायेच्या पाशात शेवटपर्यंत जखडून ठेवतो …….त्या अहंकाराला जेव्हा ठेच लागते तेव्हा जीव कासावीस होतो अन् जेव्हा त्याची ओळख पटते तेव्हा हाच जीव खोल अंतर्मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो……मग पराकष्टेच्या प्रयत्नानंतर जेव्हा त्या अहंकाराचे अस्तित्वविसर्जन होते तेव्हा तो जीव खऱ्या अर्थाने मुक्त होतो. त्याला सर्वोच्च कोटीच्या परमानंदाची प्राप्ती होते त्याचे वर्णन केलं आहे ह्या अभंगामध्ये तुकोबांनी !…….
शेवटी हा आहे एक निरंतर प्रवास ! भोवतालच्या प्रत्येक जीवाचा ! हे का समजून घेऊ नये ?
मग भले अगदी ‘ मोक्षप्राप्ती ‘ नाही पण निदान हे तरी प्रत्येकाने कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की खरी मनःशांती , खरं सुख, समाधान हे बाह्य जगात नसून फक्त आपल्या अंतरंगात दडलेले आहे……कारण बाह्य परिस्थीतीचे नियंत्रण आपल्या हातात कधीच नसते. त्यामुळे आजूबाजूची परिस्थिती नियंत्रित करण्याऐवजी त्या मनःशांतीचा शोध घेणं किंवा यथाशक्तीनुसार, कोणत्या ना कोणत्या
माध्यमाव्दारे तसा प्रयत्न करणं हे आजच्या युगात अगदीच अशक्य आहे का ??
ही जाणीव म्हणजे मनुष्यजन्माला अन् बुद्धीला मिळालेली एकप्रकारची दैवी देणगीच आहे !!
……पण हे संसाराचे मायाजाल इतके मायावी आहे की ते आपल्या सर्वांना त्यात पार गुर्फटवून टाकते आणि आपल्याला स्वतःमधल्या ह्या दैवी गुणांचा विसर पडत जातो….. मग आपसूकच आल्या सर्व प्रकारच्या चिंता, दुःख, निराशा, नकारात्मक विचार !! पाठोपाठ त्यातून उद्भवणारे मानसिक वा शारीरिक असंतुलन !!
का ? तर दिवसेंदिवस आपण दूर होत चाललो आहोत आपल्याच अंतर्मनापासून. आपल्याला स्वतःचीच ओळख पटेनाशी झाली आहे……मग दुसऱ्यांना कसं ओळखणार आपण ? स्वतःला जर उमजू शकलो नाही तर दुसऱ्याला कसं समजून घेऊ शकु ?
पण संत ज्ञानेश्वरांना त्या काळातही हे सर्व कळून चुकले होते आणि तेही कोणत्याही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी किंवा तत्सम माध्यमांच्या वापराशिवाय …गूगल नाही , वेब नाही की इंटरनेट नाही …त्यांना आणि त्यांच्यासारख्या हजारो जगभरातील संतांना जे उमगले ते समजून घेण्यासाठी आपणदेखील थोडा तरी प्रयत्न नाही का करू शकत ? ‘
मानसी मॅडम मनातल्या मनात गुणगुणू लागल्या,
‘ अरे अरे ज्ञाना झालासी पावन,
तुझे तुज ध्यान कळो आले /
तुझा तूचि देव तुझा तूचि भाव,
फिटला संदेह अन्यतत्वी // ‘
आजकाल सोशल मीडियावर एक संकल्पना पॉप्युलर आहे. ती म्हणजे ” Self Realisation किंवा आत्मसाक्षात्कार “. जर ज्ञानेश्वरांनी त्या कोवळ्या वयात अन् तेही कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाशिवाय जी प्रत्यक्ष अनुभवली आणि संपूर्ण जगाला ती अमूल्य ठेव देण्याचा प्रयत्न केला तर ती काय अशी निष्फळ जाऊ द्यायची?….. का तर आजच्या अत्याधुनिक जगासाठी संत आणि त्यांची शिकवण “आउटडेटेड ” आहे किंवा आजच्या काळानुसार अजिबात सुसंगत नाही असं वरवरून वाटतं म्हणून ??…. खरंच का “आउटडेटेड” आहे हे सर्व ? …. नाही !
उलट थोडा खोलात विचार केल्यावर जाणवतं की ह्या सर्वाचा कलियुगातील जीवनाशी अतिशय निकटचा संबंध आहे. फक्त ती सुप्त जाणीव जागृत करणे न करणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. ही जाणीवच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे नाकारता कामा नये.
आजूबाजूच्या वास्तवाशी त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सांगड घालता आली पाहिजे. तर ही पुढची पिढी सारासार विचार करून निर्णय घेण्यास सक्षम बनेल. मानसिकदृष्ट्या सबळ बनेल. निदान कुठल्या तरी क्षुल्लक कारणांमुळे खचून जाणार नाही.
कठीण प्रसंगांना सुद्धा सामोरी जाऊ शकेल.
नाहीतर आततायीपणा , निरनिराळ्या प्रकारच्या व्यभिचारी, व्यसनी, विकारी वृत्ती, नैराश्य, नकारात्मकता ह्या सर्वांचा अतिशय बीभत्स आणि दारुण असा ‘ कोलाज ‘ रोज सकाळच्या वृत्तपत्रातून आपल्यापुढे मांडला जात राहील ….. समाजाच्या मानसिकतेची सर्व पातळीवर घसरण होतच राहील आणि आपणा सर्वांना हताश होऊन ही घसरण, ही अधोगती पाहण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही.
आणखी काही वर्षांनी दर दोन घरे सोडून कोणीतरी मानसोपचार घेत असेल ….मग छोटे असो वा मोठे ! कारण काहीही असो …प्रश्नच प्रश्न असतील पण उत्तरं सापडणार नाहीत .
उद्याची तरुण पिढी भरकटत राहील …कोणत्या ना कोणत्या तरी आश्वासनांना, संधी साधू वाईट वृत्तीना किंवा भूलथापांना बळी पडत राहील !
अचानक आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाला तोंड देता आले पाहिजे. त्यासाठी आहे गरज आहे ती म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता , विवेक बुध्दीची.
कुठेतरी तिचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे आणि ते शक्य आहे जर ‘ अध्यात्म ‘ हे आजच्या अत्याधुनिक , हाय टेक जीवनशैलीचा देखील एक महत्त्वाचा भाग बनले तर…….
कारण ‘ अध्यात्म ‘ हे माणसाला त्याच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या खोल डोहात डोकावण्याची संधी देते.
तो उहापोह होणे हे गरजेचे आहे. कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे ‘ …….
आता घर जवळ आलं होतं आणि मानसी मॅडमच्या चेहऱ्यावर आता निश्चिंत, शांत भाव तरळत होते .
कारण उद्याच्या लेक्चरमध्ये मुलांना कसे आणि काय समजावयाचे ह्यासाठी त्यांनी स्वतःशी काही निश्चय केला होता!
