निस इस नाईस

–पूजा सोनवणे–

२०१८, लग्नाचा पाचवा वाढदिवस म्हणजे माईलस्टोन. आम्हा दोघांना भटकायला खूप आवडतं त्यामुळे फिरायलाच जाऊयात असं ठरवलं. आम्ही तेव्हा इंग्लंडला होतो त्यामुळे युरोपला जाणं सहज शक्य होतं . फ्रान्स हा एन्ट्री पॉईंट ठेउयात कारण फ्रेंच एम्बसी जास्त विजा देते हे माहिती होतं.  सगळं ठरवलं, बुकिंग्स केले आणि वीजा काढायला लंडन गाठलं.  विजा अपॉइंटमेंट झाल्यावर भटकून, हादडून घरी आलो. ५ दिवसात विजा घरी आला आणि ठरलेल्या तारखेला आम्ही साऊथ फ्रान्स च्या देखण्या गावाला ज्याच नाव नीस ज्याला निस्सा असाही म्हणतात तिथे पोहोचलो. लंडनहून अक्षरशः पावणे दोन तासात पोहोचलो आणि विमान लॅण्ड होता-होता दिसला तो निळाशार सुंदर समुद्र, ह्याला म्हणतात वेलकम. 

निस हे इतक्या मोक्याच्या ठिकाणी वसलेले आहे की त्याच्या चहुबाजूंना त्याला अधिक सुंदर करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्या पायथ्याशी आल्प्स पर्वतरांगा, एका बाजूला १३ किलोमीटर वर मोनाको आणि ३० किमी वर फ्रेंच-इटालियन सीमा. निस हे शहर आशिया खंडात पर्यटना साठी प्रचलित नाही. हे शहर देखणं तर आहेच पण लोभसही आहे,काय ती प्रेमळ लोकं,सुंदर वास्तुशास्त्र. मी म्हणाले,”यार आपण इथेच राहुयात का? मला आवडेल इथे आयुष्य काढायला.” अर्थात पर्यटकांशिवाय फार काही बिजनेस नाही ये तिथे पण हे शहर अगदी पॅरिसच्या विरुद्ध .राणीच्या देशातून युरोपला जाणाऱ्यांना, पॅरिस सारखी शहरं जरा उर्मट, शिष्ट आणि आगाऊ वाटू शकतात.

आम्ही समुद्रकिनार्‍या पासून ७०० मीटर वर गजबजलेल्या भागात हॉटेल बुक केले होते, त्यामुळे आरामात उशिरा पर्यंत चालत भटकायचो आणि आरामात हवे तेव्हा परत यायचो. आम्ही दोघं शक्य तो एकटेच फिरतो, कारण ‘लोकल लाईफ’ बघण्यात, अनुभवण्यात जास्त मज्जा वाटते. आवरून हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता करून जेवढं  लवकर बाहेर पडता येईल तेवढं लवकर बाहेर पडतो, खास करून आशिया बाहेर गोष्टी लौकर बंद होतात त्यामुळे जर तुम्हाला सगळं बघायचे  असेल तर सकाळी लवकर निघणं हे महत्त्वाचं आहे. मी भटकण्याबाबत जरा हावरट असल्यामुळे मला सारखा वाटते की जे काही आहे ते मनसोक्त फिरून घेऊयात पुन्हा यायला नाही मिळाले तर? आणि सगळं बघून झालं कि एक जागा मुद्दाम बघायची सोडून देतो, मग ते गाव तुम्हाला पुन्हा बोलवत राहतं. 

Vieille Ville (ओल्ड टाउन)- इथले मार्केट फुलांसाठी प्रसिद्ध आहे, अरूंद रस्ते, रंगीबेरंगी आणि नयन रम्य असे हे ठिकाण अगदी Promenade des Anglais नावाच्या सुप्रसिद्ध बीचच्या अगदी समोर आहे. ह्या दोन्ही गोष्टीच्या मध्ये एक मोठा रस्ता आहे जिथे कॅसिनो,कॅफे,पब,रेस्टॉरंट् आहेत. बीच वर ठिकठिकाणी गायक गाणी म्हणत असतात, वाद्य वाजवत असतात. Parc de la Colline du Château (Castle Hill Park) हे उंच डोंगरावर आहे, खूप चढून जावे लागते, वरती गेल्यावर छोटसं कारंज आहे आणि पुढे चालत गेल्यावर खेळायला आणि बसायला जागा आहे, तिथेच एक व्ह्यू पॉईंट आहे, जिथून हार्बर दिसते. Promenade du Paillon हे एक पार्क आहे, जिथे एक भलं मोठं कारंजे आहे, तिथे संध्याकाळी वेगवेगळे स्ट्रीट परफॉर्मर्स परफॉर्म करतात. माणसांनी व्यापलेली जागा जिथे प्रतिभावंत कलाकार आपली कला निरपेक्षपणे सादर करून लोकांची दाद मिळवतात. 

इतका सुंदर पाण्याचा रंग खरा निसच्या समुद्राचाच पहिला आणि ह्याला फ्रेंच रिव्हेरियाचा भाग असल्याचा मान का मिळालाय ते कळलं. आम्ही ५ दिवसांपैकी एक दिवसाची टूर केली. त्यात आम्ही Eze, ST. Pauls de Vence, Cannes (तेच कान्स जिथे ऐश्वर्या रायला बोलावलं जातं नेहमी) आणि Monaco अश्या ४ ठिकाणी जाऊन आलो. धमाल ड्राइवर दादा होते, त्यांने आपल्या फ्रेंच ढंगात मस्त रंगवू- रंगवून माहिती सांगितली आणि मी पुन्हा नव नवीन गावांच्या प्रेमात पडत गेले. ह्या ट्रिप मध्ये आम्ही एका पर्फुम फॅक्टरी ‘फ्रॅगोनार्डला’ गेलो होतो. ह्यांची खासियत म्हणजे ते दरवर्षी ‘फ्लॉवर ऑफ द इअर’ जाहीर करतात आणि त्या हिशोबाने त्याला विकसित करतात. एका फुलाच्या जोरावर ते अनेक पर्फुम्स बनवतात. Eze आम्हाला खूप मनापासून भावलं, दोन्ही बाजूला मोठे डोंगर आणि त्यावर वसलेले हे गाव. एक मोठा रिसॉर्ट, पैंटिंग्सची दुकाने म्हणू नका, रेस्टॉरंट म्हणू नका, सगळंच होतं ह्या टेकडीवर. इतकंच नाही तर सुंदर बाग ‘The Exotic Garden of Eze’ ह्या टेकडीच्या टोकाला. कान्सला फेस्टिवलची तयारी सुरु होती त्यामुळे गर्दी होती. मोनाकोला पोचल्यावर श्रीमंती झळकत होती नुसती. राजाचा महाल,फॉर्मुला १ रेस ट्रॅक, कॅसिनो सगळं एवढ्याश्या छोट्याश्या देशात. St. Paul de Vence हे गावही खूप-खूप सुंदर, ते बघून आम्ही निसला परतलो. दमलो तर होतो पण निसला येऊन  ‘Patissiere LAC’ ला नाही गेलो तर मग निस काय पाहिलं? हे नावाजलेले चोकोलेटीयर आहेत, किमती ना बघता नाही काही छान गोष्टींचा आस्वाद नक्की घ्यावा, त्यातलं हे ठिकाण.  

आम्ही व्हेज खाणारे आहोत त्यामुळे जायच्या आधी खादाडी ची काय सोय होईल त्याचा साधारण रिसर्च करून जातो. तश्या आमच्या अवाजवी मागण्या नसतात, घासफूस पण चालते आम्हाला. अनंत उपकार वेगन लोकांनमुळे आमची चंगळ झाली. एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ ‘सोक्का’ अगदी मीठ मसाला नसलेलं बेसनाचं धिरडं. ऑर्डर आली पण खातात कसं हे कोणाला माहिती? टेबलावर फक्त ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूड. मग शेजारी बसलेल्या फ्रेंच जोडप्याने आमची दया येऊन आम्हला सांगितले, कसा खायचा सोक्का. Soupe au pistou -हे एक सूप आहे जे पाण्यापासून बनवतात भाज्यांच्या स्टॉक ना वापरता.

निसला रेस्टारंट मध्ये नवरा बायको किंवा मैत्रिणी अशी दोनच लोकं स्वयंपाक करतात, बिल घेतात, ऑर्डर घेतात, साफ सफाई करतात. सगळ्यात पहिले आम्ही एका वेगन कॅफेमध्ये जेवायला गेलो, कजू नाव होतं. एक तिशीतला माणूस वेलकम म्हणून टेबल दाखवून ऑर्डर घायला आला. छोटासा टुमदार कॅफे, तोच गप्पा मारायला लागला आणि माहोल रंगला, मग खाऊन झालं तरीही आम्ही तिथेच. तेव्हा कळलं  की त्याची पार्टनर जी आत जेवण बनवत होती ती खरी थायलंडची पण वाढली ऑस्ट्रेलियात,अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले आणि कुठे तरी ह्याला भेटली,मग फ्रान्सला त्याच्याच गावाला म्हणजे निसला येऊन वेगन कॅफे सुरु केला आणि तो एक नंबर म्हणून ओळखला जाऊ लागला. पण २०१९ मध्ये हे विकून लिस्बन किंवा बार्सीलोनाला जाणार होते आणि झीरो वेस्टेज Air B&B चालू करणार होते. कुणी असलेला डाव मोडून नवा डाव उभा करतो असा मला एक सेकंद वाटलं आणि दुसर्‍या सेकंदाला जाणवलं किती चाकोरी बद्ध आयुष्य जगतो आपण. एका व्हिएतनामीज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो, ते काका काकू इतके प्रेमळ की त्यांच्याकडे खूप शाकाहारी पदार्थ नसूनही,त्यांनी आम्हाला एक सूप,स्टार्टर आणि राईस बनवून दिला. त्यांचे नियमित कस्टमर होते आलेले,ते,आम्ही आणि काका काकू गप्पा मारता-मारता जेवलो. त्यांनी अश्या काही गोष्टी सांगितल्या की कळलं हे सोपं नाहीये.निघताना मी नवऱ्याला म्हणलं खूप उशीर झालाय,टॅक्सी करूयात? तर काकू म्हणतात कश्या,”हवीये कशाला टॅक्सी निवांत पायी जा आरामात पोहोचाल, भीती वाटत असेल तर आमच्या ह्यांना पाठवते तुमच्या सोबत”.मलाच इतका अवघडल्या सारखं झालं, म्हणलं चला जाऊयात आपण आपलं. 

निस ने मला खूप वेगवेगळे सुंदर अनुभव दिले.खरं सांगायचे तर मी प्रत्येक नवी जागा बघण्यात पैसे गुंतवते  कारण तिथला अनुभव मला आयुष्यभरासाठी व्याज म्हणून आठवणी देऊन जातो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *