सनविवि ललित,साहित्योन्मेष सुट्टीचे आत्मवृत्त 

सुट्टीचे आत्मवृत्त 

“ इसीका नाम है—जिंदगी ”

— माणिक नेरकर —

 “अशक  आँखोसे रवा

 और जिगर जलता है

क्या कयामत  है के

बरसात मे घर जलता है” 

 इतकं नवल वाटायला काय झालं? माझ्या तोंडून हे असलं काही धीर गंभीर ऐकून  विचारात पडला ना?” पण मंडळी, मी सगळ्याच प्रकारच्या ,सगळ्याच प्रवृत्तीच्या लोकांबरोबर रहात असते,हे विसरू नका कधी. मला विसरलात तर चालेल एक वेळ; पण माझं महत्व विसरू नका कदापि. हल्ली का कोण जाणे, मलाच असं जाणवायला लागलंय की मी, माझं कौतुक, माझ्यापासून मिळणारा आनंद ह्याचे सगळ्यांना  विस्मरण होत चाललंय. कुठेतरी काहीतरी बोचतंय मनाला, उलाघाल होते जिवाची—-का? आता मला मन, भावना असू शकतात ह्याविषयी देखील शंका आहे की काय तुमच्या मनात? 

 ते काहीही असलं तरी तुम्हीच माझे सखे–सोबती.–तुमच्याजवळ नाहीतर कुणाजवळ मन मोकळं करणार?

गेल्या दीड ते दोन वर्षातील काळात, विशेषतः टाळेबंदीच्या काळात हे तीव्रपणे जाणवले. वेगवेगळ्या वर्गाकडून  वेगवेगळ्या,तरी एकच भाव दर्शवणार्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 

” साला वैताग आहे नुसता! म्हणायला सुट्टी(वर्क फ्रॉम होम); पण दामदुपटीने कामे करून घेतात हे कंपनीवाले. पिळून काढतात नुसते. त्यात फावल्या वेळात घरची कामे करा, बायकोला मदत करा, पोरांचा गोंगाट सहन करा– ते वेगळंच.

कंटाळा आलाय आता ह्या घरी बसण्याचा.”

” अरे यार! कधी सुरू होईल शाळा आपली? आणि कधी संपेल ही बोअरिंग  लॉंग लॉंग सुट्टी? शाळेत काय धमाल करतो ना आपण?  मी खूप मिस करतोय यार सगळ्या दोस्त कंपनीला.”

 “कुठून हा मेला कोरोना आला आणि सगळं होत्याचं नव्हतं करून ठेवलं मेल्यानी. तो आला नी पाठोपाठ ही जीवघेणी टाळेबंदी. चोवीस तास नवराही घरी न पोरही. दिवसभर घाण्याच्या बैलागत काम करावं लागतं. एरवी कसं, नवरा ऑफिसला, मुलं शाळेत—कितीतरी मोकळा वेळ मिळायचा. मैत्रिणींसोबत गप्पा मारायला, मोबाईलवर चॅटींग करायला—कधी भिसी,तर कधी शॉपिंग. आता तर चहा, नाश्ता, जेवण आणि  धुणी भांडी–ह्यात दिवस कसा संपतो कळतच नाही.” 

 बहुतेक घरांमध्ये हे अन असले संवाद ऐकायला मिळाले आणि मन उदास झालं. वाटलं, हीच का ती माणसं? जी सतत आपली “वाट” पहात असायची? बच्चा कंपनी ला तर रोज संडे म्हणजे सुट्टी हवी असायची.  रोजंदारीवर कामे करणारी मजूर मंडळी असू दे किंवा मोठया कंपनीत मोठ्या पदावर काम करणारी ऑफिसर मंडळी असू दे—माझी ओढ प्रत्येकाला तितकीच तीव्रपणे जाणवायची.   पूर्वी  शाळकरी मुले किती आतुरतेने माझी वाट बघत असत. “मामाच्या गावी, आजोळी जाण्यासाठी त्यांना मी अगदी हक्काने हवी असे. पण त्यांच्या आणि माझ्याही दुर्दैवाने आता सुट्ट्या, मामाचे,मावशीचे गाव, आजोळची गम्मत,ती गोडी हे सगळंच काळाच्या ओघात खूप मागे पडलंय.  काळा नुरूप तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता, तसे मलाही जमले पाहिजे, नाही का ? त्यात भरीस भर म्हणून की काय पण हे दीर्घ काळासाठी लॉक डाउन काय लागलं आणि माझं महत्वच एकाएकी कमी झाल्यासारखं झालं.  बरोबर आहे, माणसाचा स्वभावच आहे तो. त्याला तोचतोचपणा आवडत नाही. कंटाळा येतो,त्याच त्याच गोष्टींचा. बदल हवा असतो त्याला सतत. 

हरकत नाही.   उन्हाच्या झळा आहेत म्हणून सावलीच्या शितलतेची किंमत आहे. दुःख आहे म्हणूनच सुखाचे महत्व अधिक आहे. तसेच हे देखील. शाळा, ऑफिसेस, कामाची ठिकाणे आहेत म्हणून सुट्ट्यांची पण गरज आहेच ना?कामाचा ताण म्हटला की ब्रेक ही हवाच. काही आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. तुमच्या तोंडूनच ऐकली आहेत अशी वाक्ये, अधून मधून पडतच असतात कानावर.  पण तुम्हा लोकांना मानावे लागेल बरं का. तुम्ही माणसं फार आशावादी असता बुवा. कितीही संकटे येऊ देत, हिम्मत हरू देत नाहीत. आता हा जो कुणी “कोरोना” नामक राक्षस तुमच्या भेटीला नुकताच येऊन गेला आणि   तुम्हाला बऱ्याच चांगल्या वाईट भेटी देऊन गेला—त्यामुळे तुम्ही खचून गेला नाहीत,तर अजूनच धीराने उभे ठाकलात,त्याच्यापेक्षाही मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी. मी देखील खचून, निराश होऊन कसं चालेल?  मलाही “आशेवर” टिकून रहाता यायला हवं ना? आणि दिवस  पालटायला  कितीसा वेळ लागतो? सगळे दिवस सारखेच नसतात, हे पण तुम्हा माणसांनीच शिकवलंय. आता सगळं सुरळीत सुरू होतंय, पूर्वीसारखं म्हटल्यावर “माझेही दिवस येतीलच की पूर्वीसारखे–” ते पहा ना–  -निरागस बाल्य मला आताच खुणावते आहे.   “पिकनिक” साठी उत्सुक असणारी मंडळी मस्त प्लॅंनिंग करण्यात गुंतलेली दिसताहेत मला.   माझी ओढ असणारी मने जिवंत आहेत, अजूनही—मग चिंता कसली? नाही का? आणि जमा-खर्चाचा आढावा घ्यायचाच म्हटला तर माझी जमा बाजू जास्तीच ठरेल. माझ्यामुळे सहसा कुणी दुःखी झालेलं मला आठवत नाही. “टाळेबंदीचा काळ” ही तुमच्याच भाषेत सांगायचे झाले तर माझ्याही मार्गातली एक “फेज” होती; पण तीही मला बरच काही शिकवून गेली. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख झाली. सुट्टी म्हणजे फक्त गोंधळ, गोंगाट आणि एन्जॉयमेंट नव्हे तर सुट्टी म्हणजे शांतता, आत्ममग्नता आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी–अशी व्याख्या तयार होऊ लागली. 

आणि खरं सांगू,  माझ्यामुळे कुणाकुणाला किती आनंद झाला हे बघण्यात मला जास्त आनंद वाटतो. विशेषतः बालगोपाल मंडळी—सुट्टी म्हटली की त्या निष्पाप चेहऱ्यांवर जो गोड भाव दिसतो तो बघण्यात खरी मजा. सुट्टी म्हटली की ते सकाळी उशिरापर्यंत मजेत, बिनदिक्कत  झोपून रहाणं किंवा नुसतच अंथरूणावर  लोळत पडणं, कुठलंही दडपण मनावर न घेता  दिवसभर हुंदडणं —  भारी वाटतं एकदम.  एकमेकांच्या प्रेमात पुरेपूर बुडालेले प्रियकर-प्रेयसी, नवीनच लग्न झालेली जोडपी—सुट्टीच्या निमित्ताने लॉंग ड्राईव्ह ची मजा घेतात, एकमेकांसोबत सगळ्या जगाचं भान विसरून  वेळ घालवतात ते बघून भरून पावायला होतं.  मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, धावपळीच्या आयुष्यात जिथे व्यक्ती पहाटे 4 वाजता घरातून निघून रात्रीच्या 11 वाजताच घरी परतते, त्यांच्या साठी सुट्टी काय चीज असते हे त्यांच्याशिवाय कुणालाही कळणार नाही.तुम्ही दोन ते अडीच तासांचा चित्रपट बघता आणि बाहेर आल्यावर लगेचच चांगला किंवा वाईट शेरा मारून मोकळे होता; पण त्या दोन तासांच्या तुमच्या करमणुकीसाठी रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करून सतत 14 ते 16 तासांचे चित्रीकरण करणारी मंडळी—त्यांच्या दृष्टीने माझं अनन्यसाधारण असं महत्व आहे बरं.

 हां, आता पूर्वीसारखं वातावरण नाही राहिलेलं. म्हणजे सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन च बदललाय. गणितं च बदलली हो आयुष्याची. लहान लहान मुलांच्या पाठीवर दप्तराचे आणि मनावर आई बापाच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे असते हल्ली. त्यात ते “सुट्ट्यांमध्ये बोकाळलेले अतिरिक्त छंद वर्ग—अमुक चा क्लास, तमुक ची ट्यूशन— बिचारे–ठरवूनही माझा उपभोग घेऊ शकत नाहीत. बऱ्याच बायका नोकरी करतात. सुट्टीच्या दिवशी त्यांची “जास्तीची कामे” निघतात, त्याला त्यांचाही नाईलाज असतो.  आज माणसाची लाइफस्टाइल इतकी बदलली आहे आणि अर्थात, माणूसही—-; पण मी मात्र ह्या “डार्क बाजू” कडे सपशेल कानाडोळा करते बरं.  माझ्यामुळे   इतरांच्या चेहऱ्यावर जमा होणारा आनंद, हीच माझी जमेची बाजू.ब्रेक तर प्रत्येकाला हवाच असतो. हक्कच आहे तो प्रत्येकाचा. आणि मी म्हणजे ब्रेक, मी म्हणजे रिलॅक्ससेशन , मी म्हणजे घडीभरचा का होईना विसावा—शरीराचा आणि मनाचा देखील.

 बाकी काय, थोडं कमी, थोडं अधिक तर चलता है ना दोस्तो— इसीका  नाम तो जिंदगी है—- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *