–पुरुदत्त रत्नाकर–
करि डळमळ भूमंडळ
…. पुढचा ११ मार्चचा दिवस नेहेमीसारखाच उगवला होता. दुपारच्या जेवणापर्यंत बहुधा २ मोठे धक्के जाणवले होते. दुपारी ३ ला मीटिंग्स असल्यामुळे आम्ही थोडसं आधीच ओचा (चहा), कोही (कॉफी) प्यायला जमलो.
थोड्या गप्पा झाल्या. आदल्या दिवशीच्या त्या वेगळ्या भूकंपाचा विषय अटळ होता. त्याबद्दल बोलत असतांना आमचा तेलुगू सहकारी म्हणाला की, ‘लेकीन ये मुझे उससे बडा लग रहा है’ आणि तो थोडा कासावीस वाटला. मी म्हणालो ‘इसी लिये तो बात कर रहे है ना हम.’ बाकी ५ ही सहकार्यांनी कॅन काढून घेतले होते. औटोमेट मध्ये नाणी टाकणारा मी शेवटचा होतो आणि कोणतं पेय निवडायचं ते ठरवत होतो. एवढ्यात औटोमेटपण हलू लागलं आणि तो तेलुगू सहकारी कालच्या नाही तर आजच्या, आत्ताच्या भूकंपाबद्दल बोलतोय हे मला कळलं. इतर ५ जणांचं पेय हातात असल्यामुळे ते सावध झालेले होते. त्यामुळे ते पळत सुटले. ते समोरच असलेल्या म्हणजे मजल्यावरच्या डावीकडल्या अॅक्सेस कंट्रोल सरकत्या दरवाज्यातून आत शिरले आणि ऑटोमेटने माझा कॅन बाहेर ओकेपर्यंत ते दार परत बंद होऊ लागलं होतं. हे सगळं खूपच वेगाने घडलं. यात कोणाचा काही दोष नव्हता. मला ज्या क्षणी भूकंप जाणवला त्या क्षणी मी पळू लागलो असतो तर मीही त्यांच्याबरोबर राहिलो असतो. पण आत्तापर्यंत ५ महिन्यांमधे अनेक धक्के येऊन गेलेले असल्याने मी घाबरलेलो नव्हतो. मी बेफिकीर होतो म्हंटलं तरी चालेल.
आता ‘करि डळमळ भू…’ हा प्रकार सुरू होऊन पाऊण मिनीट झालेलं असेल. हा प्रकार नेहेमीसारखा नाही हे आता मला लख्ख कळलं. मी ज्यातून कॅन काढला, त्याच्या बाजूचं औटोमेट आता पार आडवं झालं. दुसरंही माझ्याच पायावर पडणार होतं. मग मी समोर पडलेल्या पहिल्या औटोमेटवर पाय देऊन पलीकडे गेलो. आता रस्त्यावरची रहदारी दाखवणार्या खिडकीची ५-६ फूट लांब तावदानं, जी हलवायला बर्यापैकी ताकद लागायची ती आपलीआपण एका कडेकडून दुसर्या कडेपर्यंत धावा काढू लागली होती. माझा मेंदू जोरात काम करू लागला. समोरचा दरवाजा बंद होता, म्हणून आतलं दिसत नव्हतं पण औटोमेट प्रमाणेच आतल्या उंच अलमार्या, फोल्डर कॅबिनेट्सही आडवी झाली असणार, त्यातून वाट काढत माझ्या पार उजव्या टोकाला असणार्या खुर्चीकडे जाणं केवळ अशक्य होईल असा आडाखा बांधून मी बाहेरूनच उजव्या टोकाला जाऊन तिथल्या, माझ्या नेहेमीच्या अॅक्सेस कंट्रोल दारातून आत जाऊ असा विचार करून पळत त्या बाजूला जाऊ लागलो. दहा-बारा पावलांनंतर आता माझ्या उजव्या हाताला लगेच जिना होता आणि डावीकडे वळून केवळ पाच पावलांवर अॅक्सेसकंट्रोल दार. ती इमारत जवळपास हादरू लागली होती. इमारत माझ्या मागे झुकत असेल तर पाऊल उचललं तरी परत तिथेच पडत होतं आणि इमारतीचं आंदोलन पावलाच्या दिशेने असेल तर चंद्रावर पाऊल टाकल्यासारखं उडी मारून पुढे गेल्यासारखं होत होतं. म्हणून मी आता आत जायचा विचार सोडून दिला आणि खाली जमीनिवरच्या असेम्ब्ली पॉइंटकडे जावं म्हणून जिन्याकडे मोर्चा वळवला. तिथेही तोच प्रकार! कधी एकदम ३ पायर्या पुढे तर कधी जागेवरच असं करत मी साइडरेलला पकडत पकडत तिसर्या मजल्यापर्यंत आलो. ह्या वेळी तो कंप सर्वोच्च स्तरावर होता. त्या इमारतीचा प्रत्येक कण थरथरत होता. आता जिन्याचा वरचा भाग कोणत्याही क्षणी आपल्या डोक्यात पडू शकतो असं वाटू लागलं. लिफ्ट जवळच होती पण भूकंप चालू असतांना लिफ्ट वापरायची नसते हे मला पक्कं माहिती होतं आणि आता मला लक्षात आलं की जिन्यातही यायला नको होतं. आता मी अर्ध्यात होतो आणि उलट वर जाणं किंवा तसंच खालती जात रहाणं यात सारखाच धोका होता. खालती गेलो तर किमान पोहोचल्यावर तरी आपण मोकळ्या आकाशाखाली जाऊ, म्हणजे सुरक्षित असू असा विचार करून मी तोच निर्णय घेतला. सहाव्या ते तिसर्या मजल्यापर्यंत मला एकही सहकारी, माणूस मजल्यावर बाहेर किंवा जिन्यात दिसला नव्हता. तिसर्या मजल्यावर एक जपानी ताई भिंतीला चिकटून उभी होती. मी तिला पार करून दुसर्या मजल्याकडे निघालो तसं तिने घशातून आवाज काढून माझं लक्ष वेधून घेतलं आणि तिचे हात तिच्या डोक्यावर हॅंड्सअप सारखे करून डोकं, तळवे भिंतीला चिकटवले. ती मलाही पालीसारखं भिंतीला पकडून एका जागी चिकटायला सांगत होती. कानांनी तिची खरखर ऐकून मानेने मागे वळून डोळ्यांनी पाहून मेंदूला समजेपर्यंत पायांनी दुसरा मजला गाठला होता. मी त्याही परिस्थितीत तिला अरिगातोऊ म्हणालो, कारण मी आतून अतिशय शांत होतो. पण आता मी थांबणार नव्हतो. मी तसाच ढांगा टाकत तळमजल्यावर आलो.
अजूनही कंप चालूच होता पण आता तीव्रता ओसरते आहे असं जाणवलं. डाव्या बाजूला आपसूकच लक्ष गेलं कारण तिथे लिफ्टच्या आजूबाजूची पडझड होऊन सीमेंट वगैरेचा छोटा ढीग पडला होता आणि लिफ्ट अडकली आहे हे ही लक्षात येत होतं. मेंदूत नोंदी होत होत्या पण थांबायचं नव्हतं. मी लगेचच असेम्ब्ली पॉइंटला पोहोचलो आणि आता सुरक्षित असल्याची जाणीव झाली. आता इमारतीचा काही भाग कोसळून तिथपर्यंत आला तर ते केवळ माझं कमनशीब म्हणावं लागलं असतं कारण अशा प्रसंगात जिथे यायचं असतं तिथे पोहोचणं एवढच मी करू शकत होतो. त्यापेक्षा सुरक्षित जागा असणं शक्य नव्हतं. आता तो मुख्य धक्का पूर्ण ओसरला होता. अजून एकही जपानी माणूस खाली आलेला नव्हता. ते टेबलाखाली गेले असणार. थोड्या अंतरावर काही यूरोपियन सहकारी माझ्या आधीच पोहोचलेले मला दिसले. त्यांच्या शेजारी इमरजन्सी एक्जिट जिना होता. त्यावरून उतरून ते आलेले. पण येऊन ते तिथेच भिंतीलागत थांबले होते याची मला गम्मत वाटली. तिथे थांबणं म्हणजे फासात स्वतःहून मान अडकवून घेण्यासारखं होतं. यूरोप-अमेरिकेत जमीन स्थीर असल्याने त्यांच्यासाठी हे आक्रीत होतं आणि आपण भारतीय जसे आयुष्यात काहीही होऊ शकतं यावर विश्वास ठेवतो तसा या पाश्चिमात्य लोकांना ठेवायचं काही कारण नसतं, म्हणून ते आतूनही हललेले होते. मी हात जोरजोरात फिरवून त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि असेम्ब्ली पॉइंट पाटीकडे निर्देश केला. त्यांनी लगेच त्यांची चूक सुधारली आणि माझ्या आसपास येऊन परत आपसात मश्गुल झाले; कारण आमची काही ओळख नव्हती. एकंदर १२-१५ मिनिटं झाली होती. नव्याने छोटा भूकंप जाणवला.
आता आसपासच्या सर्व इमारतींमधून आपापल्या मजल्याचा क्रमांक असलेली पाटी धरून फ्लोअर लीडर्स आणि मागे त्या त्या मजल्यावरचे कर्मचारी रांगेत येत होते. काही जणांकडे ऑफिसबॅग्स, वैयक्तिक सामान होतं. माझं सगळं सामान ६ व्या मजल्यावरच होतं. आता बहुधा सगळं तिथेच सोडावं लागणार. मी मनातल्यामनात त्या सामानाची यादी करू लागलो. कारण पासपोर्ट, रेल्वेकार्ड वगैरे सामान जवळ बाळगणं आवश्यक होतं. अरे.. पण हे काय? मी असेम्ब्लीपॉइंटला होतो तरी ते सगळे लोक मला ओलांडून पुढे जाऊ लागले! माझ्या २ क्रमांकाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्याचा कर्णधार इशिकावाही माझ्याकडे बघत पुढे जाऊ लागला. माझ्या मनातली घालमेल ओळखून त्याने मानेनेच त्याच्यामागे रांगेत घुसखोरी करायला सांगितलं. मग आम्ही थोडं दूर, दोन इमारती सोडून असलेल्या मोठ्ठ्या मैदानातल्या असेम्ब्लीपॉइंटमध्ये जाऊन उभे राहिलो. सगळे कर्मचारी जमवायचे असल्याने मोठ्या, मोकळ्या मैदानात आणलं गेलं होतं.
क्रमशः….
