— पूजा सोनवणे —
रीया कसा झाला ग तुझा पेपर? राजस आला का घरी? जेवलात का तुम्ही? माँ,तू किती प्रश्न विचारणार आहेस? जरा श्वास घेशील की नाही? सॉरी ग, सोना! पण मी कधीच तुम्हाला एवढा वेळ एकटं सोडला नाहीना, म्हणून असेल कदाचित. अजून एकदा सॉरी ग पिल्लू, मला आज तुझ्या आवडीचा पुलाव बनवायचा होता खरं, पण ह्या मिटींगच्या घाईत जमलंच नाही. आजीला सांग, मी ८ पर्यंत येतेच आणि मग जाऊयात आपण आपल्या घरी. तिकडे रिया नुसती हम्म, हम्म करत होती. शेवटी ओके माँ बाय-बाय लौकर ये असं म्हणत फोन ठेवला.
प्रिया, रीया आणि राजस हे त्रिकूट अमरच्या अचानक झालेल्या निधना नंतर पुण्यात राहायला लागलं. प्रियाला अचानक सगळं सांभाळायला लागले खरे पण ती तिच्या दोन्ही मुलांकडे बघून उभी राहिली. तिला चांगली नोकरी होती खरी पण अमरची साथ तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती. इतके दिवस प्रचंड कष्ट करून आता कुठे दोघं थोडे स्थिरावले होते,ती नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायच्या बेतात होती आणि जी घडी नुक्तीच बसत होती, ती पूर्णपणे विस्कटली. तस दोघांनी मुलांच्या शिक्षणाचं आणि पुढचं नीट नियोजन करून ठेवलं होतं पण आता तिला स्वत:च्या स्वप्नांना थोडंसं मागे सारून मुलांकडे अधिक लक्ष द्यायचे होते. रीया १९ वर्षांची आणि राजास १७ वर्षांचा होता, सगळी परिस्थिती कळण्या इतपत मोठे ते होतेच पण तितकेच समजूतदारही होते. अमरला जाऊन ४ वर्ष झाली होती आणि प्रियाची तारे वरची कसरत चालूच होती, तशी तिची आई होती मदतीला पण प्रियाला मुलांच्या सगळ्या जबाबदार्या स्वत:च लक्ष घालून करायला आवडायच्या. ह्यामुळे तिने ४ वर्षात अनेक संधी, प्रमोशन्स नाकारले होते, कारण मुलांना सोडून परदेश वाऱ्या करण्यात तिला अजिबात रस नव्हता. तिची मुलं आणि अमरच्या आठवणी हेच काय ते तिचं जग.
मुलं मोठी होत होती आणि त्यांचे जगही वेगळे होत होते. रीया तिच्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाण्याची तयारी करत होती, तिला तिच्या अभ्यासातून, प्रोजेक्ट्स मधून आणि त्यात वेगवेगळ्या परीक्षा मधून तितकासा वेळ मिळत नव्हता. राजसही आपल्या कॉलेजला जाण्याच्या तयारीला लागला होता. त्याला ह्या नवीन जगाबद्दल कुतुहल तर होतच पण ताई सारखा भरपूर अभ्यास करून आईला खुषही करायचे होते. दोघंही मुलं, आईला त्रास नको व्हायला हाच प्रयत्न करत होती. पण ह्यात कुठे तरी त्यांचा संवाद हरवत चालला होता. प्रियाला मधेच सगळं छान वाटायचे आणि मधेच एकटेपणा दाटून यायचा. रीयाला हे जाणवत होतं पण आईशी बोलायला हिम्मत होत नव्हती. प्रियाच्या आईला मात्र ह्या सगळ्या गोष्टी खात होत्या, वेळोवेळी ती प्रियाला समजावत, “दुसरं लग्न कर, मिळेल तुला समजून घेणारा कोणी तरी. तुझ्या मुलांना आपलं म्हणणारा” पण हे सगळं तिच्या समजण्या पलीकडे होतं.
एक दिवशी न राहून आजीने रीया आणि राजसशी बोलायचे ठरविले. एका मीटिंग मुळे प्रिया उशिरा येणार होती त्यामुळे मुलं नेहमीप्रमाणे आजी कडेच होती. आजीने रीया आणि राजसला समजावण्याच्या सुरात सांगायला सुरवात केली, “रीया आणि राजस बाळा, मला काय वाटतंय – तुमच्या आईने दुसर्या लग्नाचा विचार करावा. मला माहितीय ही तुमच्या आकलन शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे, पण तुम्ही आता आपापल्या मार्गावर जाणार, व्यस्त होणार. तुम्हाला तुमचे नवीन जग आहे, मित्र आहेत, तुम्हीही पुढे- पुढे जात राहणार, मात्र तुमची आई तिथेच राहणार. वय जसे जसे वाढतं तस तसं जोडीदाराची गरज भासू लागते. घरी आपली वाट बघणारं आहे ह्याने मन सुखावतं. एकट्याने आयुष्य जगणं सोपं नाही ये बाळांनो.” रीयाने आजीला पूर्ण बोलू दिले, राजसला कळत होतं पण वळत नव्हते. पण रीया आजीच्या बोलण्याला सहमत होती आणि ती उड्या मारत म्हणाली, “आजी ग काय भारी आयडिया आहे. किती दिवस मला माँ ला वेळ द्यायचा असूनही मी तो देऊ शकत नाही ये. कितीतरी वेळा वाटतंय, बाबा असता तर माँ वर अशी वेळ अली नसती. कोणी तरी तिच्या हक्काचं, तिला तिच्या मनातलं ऐकून घेणारं, तिच्या वयाचं हवं ना. आम्ही दोघे आहोत पण तिला आमच्याशी बऱ्याच गोष्टी बोलता येत नसतील ना? राजस आणि मी आमच्या विश्वात असतो. किंवा आम्ही जेव्हा तिघेच असतो तेव्हा ती फक्त ऐकत असते. हे ऐकून राजस पण म्हणाला, “माला चालेल दुसरा बाबा, कसली मजा येईल ना? आपल्या माँचे लग्न बघता येईल. पण आपल्या बाबा सारखा कसा मिळेल? आपल्याला त्याने माँ ला भेटू नाही दिलं तर? आपल्याला तो आवडला नाही तर?” हे ऐकून आजी आणि रीया थोडे घाबरले खरे पण त्यांनी राजसला समजावले आणि आधी माँला पटवूयात मग पुढचं पुढे.
अनेक दिवस मुलांची आणि आजीचे कुटणे चालूच होते, माँ ला ह्यातलं काहीही माहिती नव्हतं. आजी नेहमी प्रमाणे प्रियाला समजवायचा प्रयत्न करायची आणि प्रिया तिच्या आईशी भांडण करून एकतर फोन ठेवून द्यायची किंवा आईवर तणतणत घरातून मुलांना घेऊन आपल्या घरी यायची. इकडे मुलं आणि आजी, माँ कधी होकार देईल ह्याची वाट बघून -बघून कंटाळले होते, पण प्रिया काही निर्णय बदलेल असं वाटत नव्हते. दोन्ही मुलेही आईला समजावण्यात अपयशी ठरत होते, पण ह्या तिघांचाही निर्णय अटळ होता.
गेले काही दिवस लग्न ह्या विषयाला प्रिया खूप वैतागली होती, मुलांमध्ये आणि तिच्या मध्ये अंतर पडले होते असा तिचा समज होऊ लागला होता. ह्या सगळ्याला आई कारणीभूत आहे असाही तिला वाटायला लागले होते. ह्या सगळ्यात त्या तिघांची मात्र मस्त खिचडी शिजत होती. मुलं माँ शी मुद्दामच अशी वागत होती, जेणे करून ती ऐकेल पण हे सगळं तिला असह्य होत होते.
सुटीच्या दिवशीही मुलं घरात नाही, फक्त एक नोट लिहून घरातून गायब. आम्ही आजी कडे आहोत. हे वाचून प्रियाला खूप राग आला, जोर जोरात पाय आपटत ती स्वत:शीच बडबडत,आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा, तिने ठरवले. मनात एकवार सगळ्याची उजळणी केली. मुलांचं असे वागणे तिला अजिबात पटत नव्हते. आज मी अजिबात ऐकणार नाही ये ह्यांची कारणे. हे काय वागणे झाले, आई म्हणजे काय फ्लॅटमेट वाटली की काय? भराभर चालत जाऊन तिने पुढच्या नाक्यावरून टॅक्सी पकडली. पुढच्या दहा मिनिटात ती तेथे पोहचली. दाराची बेल वाजवली. काहीच प्रतिसाद नाही म्हणल्यावर कडी वाजवली, आणि दार उघडले ते तिच्या मोजक्या जवळच्या लोकांनी. त्या मागे तिची मुलं जोरात, दवंडी पिटावी इतक्या वरच्या पट्टीत,” आमच्या येथे श्री कृपेने, आमच्या लाडक्या एकुलत्या एक आईचे आम्ही लग्न योजले आहे, तर कृपया येता ना आमच्या आईला आवडेल आणि मनाला भावेल, त्याच बरोबर आम्हाला आपलंसं करेल, असा मुलगा घेऊन येणे.” मुलांचा उत्साह बघून तिला हसू का रडू कळत नव्हतं आणि आपली मुलं खरंच किती मोठी आणि जबाबदार आहेत हे तिला अचानक मनाला सुखा वून गेली. ज्या मुलांसाठी ती लग्न नको असे म्हणत होती, त्याच मुलांनी तिला अखेर जोडीदार शोधण्यास भार पडले.
अखेर मुलांच्या हट्टा पायी प्रिया आनंदाने तयार झाली आणि जोमाने वराच्या शोध मोहिमेला सुरवात झाली.
