–मानसी तांबेकर–
परवा जुन्या गोष्टी आवरता -आवरता एक फ्रेम मला सापडली.
‘साच आणि मवाळ
मितुले आणि रसाळ
शब्द जैसे कल्लोळ
अमृताचे ||’
‘महाराष्ट्र टाइम्स’ वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या वीरांगनेच्या भाषणाचं वरील ओळीत वर्तमानपत्रांनी केलेलं कौतुक आणि त्या वर्तमानपत्राचे कात्रण काढून त्याची फ्रेम बनवून आजोबांनी मला दिलेली भेट मी डोळ्यांनी टिपत होते. माझं मन बालपणाच्या आठवणीत हरवलं आणि आठवला तो दिवस-
त्यादिवशी वर्गात पहिल्या तासाला बर्वे बाईंनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेचा प्रतिनिधि म्हणून माझी निवड झाल्याचे जाहीर केले. वक्तृत्व किंवा भाषण ही कला मला फारशी अवगत नव्हती पण माझ्याकडे ‘सभाधीटपणा’ होता हे मात्र नक्की. कारण वर्गात होणाऱ्या चर्चासत्रात मी नेहमी हिरिरीने भाग घ्यायचे. नेमकी माझी हीच खुबी आमच्या बाईंनी अचूक ओळखली. चार लोकांसमोर भाषण देणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव ठरणार होता; तरीही आमच्या बाईंचा आत्मविश्वास दांडगा होता. त्यांच्या विश्वासाला माझा होकाराचा साथी मिळाला आणि माझी जय्यत तयारी सुरू झाली. या स्पर्धेसाठी शाळेतल्या बाईंबरोबर माझ्या आईचे कंबर कसून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. माझ्या भाषणाचा विषय होता – ‘एकविसावं शतक आणि आम्ही’. तेव्हा मदतीची हाक ऐकण्यासाठी गूगल किंवा अलेक्सा सारखे कोणीच नसल्याने या विषयावर माहिती मिळवण्यासाठी आई आणि बाईं या माझ्या दोन शुक्राचार्यांनी निरनिराळ्या पुस्तकांचा आधार घेतला. घरी विविध मुद्द्यांवर चर्चा रंगू लागल्या. आजी-आजोबा ही मधून-मधून २१व्या शतकात डोकावत होते. त्यातूनच माझ्या विचारांना फुलवण्याची संजीवनी मिळाली. मुद्देसूद लिखाण, सुस्पष्ट विचारमांडणी, ओघवती भाषा, उल्लेखनीय दाखले अशा अनेक साज-शृंगारांनी आई व बाईंनी मिळून माझे भाषण तयार केले. तर बाबांनी कामावरून थकून आल्यावरही माझ्या भाषणाच्या तालमीचा विडा उचलला होता. शब्दफेक, उच्चारण, आवाजातील चढ-उतार, हावभाव या आणि अशा अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी या तालमीत शिकून मी परिपूर्ण झाले. जसजसा स्पर्धेचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा माझा भीतीयुक्त उत्साह वाढू लागला. ८वीत तर होते मी! शाळेचे प्रतिनिधित्व करायचे एक वेगळेच दडपणही मनात होते. कधी पहिल्या पारितोषिकाने तर कधी भाषणाची फजिती झाल्याच्या स्वप्नांनी माझी झोप उडवली होती आणि अखेर तो दिवस उजाडला.
सकाळी दहा वाजता मी माझ्या पालक आणि शिक्षकांसोबत ‘ज्ञानराज’ सभागृहात पाऊल टाकलं. माझं स्वागत झालं-निरनिराळ्या चेहऱ्यांनी, रंगी बेरंगी कपड्यांनी, झुलणाऱ्या साड्यांच्या पदरांनी,इस्त्री केलेल्या पँटींनी, आधाराच्या काठ्यांनी, काही भित्र्या तर काही उत्सुक डोळ्यांनी !
ठराविक वेळेला नियोजित परीक्षक आल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली.माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्यात पहिलं नाव पुकारलं ते माझंच! म्हणजे आगीतून फुफाट्यातच! मी व्यासपीठावर गेले अन समोर प्रचंड गर्दीने भरलेले सभागृह मला ‘खाऊ की गिळू’ असं म्हणू लागलं. सगळीकडे स्तब्ध शांतता. कानावर पडत होती- ती घड्याळाची टिकटिक आणि माझ्या धडधणाऱ्या छातीचे ठोके. सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या. हात पाय थरथर कापू लागले. अंगाला दरदरून घाम फुटला. ओठ सुकले, जीभ तोंडातील तोंडातच फिरू लागली आणि डोळ्यात भित्र्या सशाचे प्रतिबिंब उमटले. एकदा तालीम करतांना आजीने सांगितलेले शब्द आठवले -“व्यासपीठावर भीती वाटलीच तर समोर बसलेले सगळे निर्जीव दगड आहेत असे समजून भाषण कर”पण आता प्रत्यक्षात जेव्हा हे ‘निर्जीव दगड’हालचाल करु लागले; तेव्हा मात्र तोंडातून शब्द फुटेना. अगदी ‘सीदन्ति मम् गात्राणि,मुखं च परिशुष्यति’ असं म्हणणाऱ्या अर्जुनासारखी अवस्था झाली माझी! पण मग मला आठवली ती गणपती बाप्पाची मूर्ती, माझे आई-बाबा आणि बाई यांचे अथक परिश्रम. ‘प्रयत्नांचा नंदादीप सतत तेवत ठेवला असेल तर यशाचं चांदणं प्राप्त करू शकशील’ हा बाबांचा अनमोल संदेश. मग Try, Try, but never cry असं म्हणत (मनात हं!) मी भाषणाला सुरूवात केली.
‘अथ मनुस जगन ह’ – ही मंगळावरची भाषा. नुकतीच मंगळावर राहिले ना, मी. असं म्हणताच हजारो आश्चर्य दीपज्योती माझ्याकडे तेवताना पाहिल्या, अन् एक वेगळाच आत्मविश्वास अंगात संचारला. मग मावळ्यांना लाजवील अशा उत्साहाने मी ‘हर-हर महादेव’ करीत श्रोत्यांवर तुटून पडले. कधी आश्चर्य, कधी खेद,कधी हास्य तर सतत उत्कंठा या भावना मी लोकांच्या डोळ्यात प्रत्येक वाक्यागणिक खुलताना पाहत होते. आवाजातील चढ-उतार, हावभाव,उच्चारण ह्या गोष्टी सांभाळत; कुठेही न अडखळता माझी गाडी ‘बुलेट ट्रेन’ लाही लाजवेल अशा वेगाने धावत होती आणि माझं भाषण संपलं ते या शब्दांनी- ‘एकविसाव्या शतकात जाऊनही आम्ही अजून देवाला खूप मानतो.’ असं म्हणताच टाळ्यांनी सारं सभागृह दणाणून सोडलं. अपार प्रशंसेच्या सागरात मी पूर्ण बुडाले. त्यानंतर इतर स्पर्धकांनीही त्यांचे विषय उत्तमरित्या मांडून भाषण केले. शेवटी निकाल घटिका येऊन ठेपली.
निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षक व्यासपीठावर गेले.स्पर्धकांनी मांडलेल्या चांगल्या मुद्द्यांचा परीक्षकांनी उल्लेख केला आणि त्याचबरोबर भाषण करताना झालेल्या चुका कशा सुधारता येतील यावर आपले विचार मांडले. सरतेशेवटी निकाल जाहीर करण्याची वेळ आली. पुन्हा एकदा छातीची धडधड वाढू लागली. भाषण उत्कृष्ट पार पडल्यामुळे बक्षिसाची आशा वाटत होती. तेवढ्यात ‘महाराष्ट्र टाइम्स’ वक्तृत्व स्पर्धेच्या या वर्षीची ‘प्रथम क्रमांकाची मानकरी’ म्हणून माझे नाव घोषित झाले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. परीक्षकांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी माझी पाठ थोपटली. अनेक वर्तमानपत्रांनी माझी नोंद घेतली. आज मी शाळेचे नाव सार्थ केले म्हणून माझा उर अभिमानाने भरून आला होता. प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचा मानाचा तुरा आपल्याच मुकुटात खोवून मी धावत आई-बाबा व बर्वे बाईंपाशी आले आणि पहातच राहिले -काय नव्हतं त्यांच्या डोळ्यात?
समाधान, तृप्ती, कौतुक, आनंद, अभिमान… त्यांचा हात पाठीवर पडला आणि तेच माझ्या यशाचं खरोखर बक्षीस ठरलं.
या स्पर्धेच्या अविस्मरणीय प्रसंगातून त्यांनी मला घडवलं. सभाधारिष्ट्य दिलं. माझ्यातल्या सुप्त वक्तृत्वगुणाला वाव देऊन जागृत केलं. ती माझी पहिली पायरी त्यांनी त्यावेळी मजबूत केली; ज्यातून माझ्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली. म्हणूनच आज ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हणत अनेक कार्यशाळा,परिसंवाद यांचे नियोजन आणि नियंत्रकाचे काम मी यशस्वीपणे पार पाडते.

छान वर्णन! खरोखरच अविस्मरणीय प्रसंग.
सुंदर अनुभव आणि अनुभव कथनही हृदयस्पर्शी. खरंच, आपल्याला घडविण्यात किती जणांचा वेळोवेळी हातभार असतो. आज तू इतकं छान लिहितेस/बोलतेस ती फक्त तू नसून त्या शाळेतल्या बाई, तुझे आई-बाबा-आजी-आजोबा सगळेच त्या यशाचे मानकरी आहेत.