सनविवि अनुभव,साहित्योन्मेष माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग…..

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग…..

–सौ. उज्वला तायडे–

माझे जीवन अनेक घटनांनी/प्रसंगांनी भरलेले आहे, परंतु माझ्या आयुष्यात असाही एक प्रसंग आहे ज्याला मी कधीही विसरू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय प्रसंग दररोज येत असतात. या प्रसंगात मी एका नवरी व विधवेला समोरासमोर पाहिले होते.  एकीकडे   मैत्रिणीला नवरीच्या रुपात पाहून मन आनंदात होते आणि दुसरीकडे तिलाच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी विधवेच्या रुपात पहाताना असंख्य प्रश्नांचे थैमान डोक्यात घालत होते. ज्या पद्धतीने दोन लहान मुले चेंडूला किंवा त्या बॅडमिंटन च्या शटल कॉर्क ला  इकडून तिकडं फेकतात ना त्याच पद्धतीने आयुष्याने एका रात्रीत नवरीची तिला विधवा बनवले होते. परंतु आजही त्या प्रसंगाची आठवण करून माझ्या शरीरावर शहारे येतात. ती माझी लहानपणीची जिवाभावाची मैत्रीण जास्त होती.

अभ्यासात हुशार होती ती लहानपणापासून, पहिला नंबर  तिने कधी सोडला नव्हता. परिस्थिती मात्र जेमतेमच होती तिची, म्हणजे सुटीच्या दिवशी शेतात काम करावे लागायचे तिला. माझ्यापेक्षा एक वर्ग मागे असल्याने  माझे  पुस्तके तिलाच मिळत होते.

आमची मैत्री स्वच्छ पाण्याइतकी  निर्मळ होती.

मैत्री अशी होती की, आपले दुःख सांगताना तिथे संकोच नव्हता तसेच तेथे आनंद सांगताना खूप खूप आनंद व्हायचा.

तेव्हा पत्र संस्कृती अस्तित्वात असल्याने आमचा पत्रव्यवहार सुरूच होता.

एक दिवस ती बारावी झाल्यावर तिचे लग्न ठरल्याचे तिने पत्रातून सांगितले आम्ही सर्वच तिच्या लग्नाला गेलो.तेव्हा प्रश्न पडला होता का लवकरच बारावीची परीक्षा होता बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला असावा तिच्या आईवडिलांनी? स्वतःच्या बहिणीच्या घरी सुखात राहील या आशेने की तिचा रंग खूप खूप सावळा असल्याने कुणी लवकर लग्नाला तयार होणार नाही म्हणून?की आणखी काही?असो आम्ही मात्र तिच्या लग्नाला आनंदाने उपस्थित होतो. मैत्रिणीला नवरी च्या रुपात सजवताना खूप खूप आनंद होत होता त्याचबरोबर तिला पुढे शिकता येणार नाही याचेही दुःख होत होते. तिच्या सौन्दर्य आणि गुणाने तिच्या रंगावर केव्हाच मात केली होती.

तिला सजवताना मी बालपणीच्या आठवणीत शिरले……

मला आठवते आम्ही ज्या ठिकाणी रहायचो तिथे आठवडी बाजार भरायचा, तसा दररोज भाजीपाला मिळायचा सातीत, त्याला सात म्हणायचे.पण आठवडी बाजारात सर्वच मिळायचे म्हणून त्याला विशेष महत्त्व होते.आम्ही सर्व भावंड आजीच्या जवळ शिकायला होतो.आईवडील यायचे शनिवारी रविवारी,खूप वाट बघत बसायचो मी आणि माझा लहान भाऊ तिच्या अंगणातील  खांडावर (छोट्या भिंतीवर) बसून आई येण्याची.

बाबा आले म्हणजे बाजारातून खाऊ आणायचे आमच्यासाठी, आम्ही सर्व भावंड वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये घेवून खायचो.

तिच्याकडे मात्र घरातील सर्व सदस्य एकत्रच एकाच ताटात खायचे. मला तो खाऊ म्हणजे चिवडा व फुटाणे एकत्र केलेला त्यांचा खाऊ  खूप आवडायचा.

तेव्हा मी माझ्या प्रत्येक फ्रॉकला खिसा शिवून घेतला होता.  आमचेकडे खाऊ आणला की माझ्या वाट्याचा खाऊ खिशात घालून तिच्याकडे जाऊन तिला द्यायचा आणि त्यांच्याकडचा एकत्र केलेला चिवडा गोष्टी करत खायचा.

आमची मैत्री अशी होती की ‘माझ्या आवडीचा अमुक पदार्थ करून ठेव’आणि ‘आणलंय तुझ्यासाठी काही, ते गुमान ठेव’असे सांगत धम्माल करायची अशी होती.विशेषकरून त्यांचेकडे उरलेल्या पोळ्या/भाकरीचे तुकडे भाजून त्यात थोडं तेल मीठ घालून खात असत,ते मला खूप आवडायचे.

आईवडील आपल्या जवळ 7,8 दिवस नसतात हा मनातला ताण सांगून  मैत्रीत हलके वाटायचे ,तर तिचे आईवडील दररोज शेतात जातात व सुटीच्या दिवशी तिला सुद्धा नेतात याचे दुःख सांगायची ती माझेकडे.

काही वर्षांनी माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगल्या शिक्षणासाठी त्यांच्यासोबत तालुक्याच्या ठिकाणी शाळेत प्रवेश दिला.अचानक फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि मी आठवणीतून बाहेर पडले, अर्थातच नवरदेवाचे आगमन झाले होते. लग्न व्यवस्थित पार पडले.

दुसऱ्या दिवशी  नवरीला   माहेरी आणण्यासाठी सर्वच मंडळी गेली. तिचा भाऊ आणि इतर मंडळी त्यात मीही तिला आणण्यासाठी गेलो असता विचित्र दृश्य पहायला मिळाले जे अजूनही डोळ्यांसमोर दिसते आहे.

तिचा भाऊ हातात टरबूज/कलिंगड, इतर सामान  बहिणीला घेवून गेला असता सर्वांसमोर नवरदेव लग्न मंडपात येऊन गर्रकन खाली पडला ,घरात नवरीची स्वागताची तयारी सुरू होती.

त्याच्या हातातील,पिशव्यांमधील   दोन कलिंगड  जोरात जाऊन समोरच्या भिंतीवर आपटली.क्षणार्धात वातावरण बदलले कुणाला काहीच समजण्याच्या आत नवरदेवाने स्वतःला विषारी द्रव्य घेऊन संपवले होते.

घरातून हळदीच्या अंगाने धावत येत तिने एक आर्त अशी किंकाळी  फोडली होती अजूनही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतोय.क्षणात नवरीचे रूपांतर विधवेमध्ये झाले होते.

का असं केलं असावं असे अनेक प्रश्न तिच्या त्याचबरोबर उपस्थित सर्वांच्या नजरेत दिसत होते.

तिच्या हातातील हिरवा चुडा/बांगडया फोडतानाचे दृश्य, तिच्या कपाळावरील कुंकू पुसताना चे दृश्य आणि तिच्या त्या आर्त किंकाळ्या अजूनही जसेच्या तसे आठवते.कदाचित त्यालाही स्वतःला संपवायचे नव्हते.

अर्थात तिला जीवघेण्या दुःखातून बाहेर पडायला वेळ लागला. तिने  स्वतः ला सावरत, तिचे अपूर्ण शिक्षण पूर्ण केले .चांगल्या गुणांनी एम ए झालीआणि आज तिचा गृहउद्योग आहे.आता मात्र तिच्या आईवडिलांनी तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे दुसरे लग्न केले, अगदीच महिनाभराच्या अंतराने आमच्या दोघींचे लग्न झाले.आज तिला  दोन अपत्य आहेत, दोघेही तिच्याचसारखी खूप गुणी आहेत अभ्यासात.

काळ बदलतो, वेळही बदलते, परिस्थिती बदलते प्रसंग मात्र कायमस्वरूपी लक्षात राहतात.

परिस्थिती बदलली पण एक गोष्ट अजूनही जशीच्या तशीच आहे ती म्हणजे आमची मैत्री.

म्हणतात ना मित्र/मैत्रीण म्हणजे आपल्याच सारखा असणारा परंतु दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला दुसरा जीव असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *