–स्मिता बर्वे–
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु गेली अनेक वर्ष शब्दवेध आणि अंताक्षरी अश्या दोन स्पर्धा गणेशोत्सवादरम्यान आयोजित करत आले आहे. मागच्या वर्षीपासून ही स्पर्धा शब्दाक्षरी म्हणून घेण्यात येत आहे. स्पर्धा खूपच रंजक आहे. २०२० मध्ये ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. ह्या वर्षी कोविड परिस्थिती आटोक्यात आल्याने शब्दाक्षरी प्रत्यक्ष, मंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. मी, रेवती कुलकर्णीच्या साथीने ह्या स्पर्धेत सहभागी झाले होते. आमच्या बरोबर अजून सहा जोड्या सहभागी झाल्या होत्या.
हल्ली दूरदर्शनवर रियालिटी शोचे पेवच फुटलेले आहे. त्याच्या तोडीस तोड किंवा काकणभर सरसच, असे स्पर्धेचे आयोजन केले होते. संघांना नाव देण्यापासून आयोजकांची कल्पकता दिसून आली. सहभागी संघांना ऋतुंची नावे देण्यात आली होती.
प्रत्येक फेरी अनोखी आणि बुध्दीला चालना देणारी होती.
उपांत्य फेरी पासून खेळाची सुरुवात झाली. ह्या फेरीत सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धकांमधील उत्साह जागृत करण्यासाठी दिलेल्या अक्षरावरून गाणे म्हणण्याची साधी सोपी फेरी झाली. त्या नंतर मात्र मुख्य स्पर्धा सुरू झाली.
शब्द आणि गाणी ह्याचा अनोखा संगम ह्या स्पर्धेत पहावयास मिळाला. संकट संधीत बदलता येते, ह्याचे ही स्पर्धा हे जिवंत उदाहरण होते. पहिल्या पाच फेऱ्यानंतर दोन संघांना निरोप देण्यात आला आणि एक वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. ती जोडी होती मागच्या वर्षीची विजेती! नव्या जुन्याचा मेळ खूपच भावला.
पुढील चार फेऱ्या पाच संघात खेळल्या गेल्या. त्यानंतर कमी गुण असलेल्या दोन संघांना निरोप देण्यात आला आणि अंतिम फेरी उरलेल्या तीन संघात घेण्यात आली. चुरशीची स्पर्धा होऊन शब्दाक्षरी २०२१ चा विजेता संघ ठरला हेमंत ऋतु. हा संघ होता दीपक कुलकर्णी आणि वर्षा सबनीस यांचा. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्वच फेऱ्या विचारपूर्वक, खूप परिश्रम घेऊन तयार करण्यात आल्या होत्या. आयोजकांची मेहनत प्रत्येक क्षणी जाणवत होती. स्पर्धकांसाठी बौद्धिक खुराकच होता. सर्व फेऱ्या नाविण्यपूर्ण होत्या आणि वैशिष्ट्य म्हणजे स्वनिर्मित होत्या. एक अतिशय भावलेली फेरी म्हणजे ‘स्वयंपाकघरात‘ केल्या जाणाऱ्या क्रियांची क्रियापदे लिहायची होती आणि अशी पन्नास क्रियापदे आयोजकांकडे लिहिलेली होती.
कोविडच्या भीतीमुळे प्रेक्षकांची उपस्थिती मोजकीच होती, पण जे हजर होते त्यांनी सुध्दा आपला सहभाग नोंदविला. आम्हाला तर ही स्पर्धा इतकी आवडली की आम्ही वर्षात दोनदा आयोजित करावी अशी विनंती केली आहे. बघू या मान्य होते का ते!
अभिप्राय : शब्दाक्षरी
Categories:
