—सौ. ऋचिता बोधनकर दवंडे—
माणूस हा कुटुंबप्रिय आणि समाजप्रिय प्राणी आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या भावनेने जोडल्या गेलेला असतो. ह्याच दोन व्यक्तींना जोडणाऱ्या प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आदर ह्या भावनांच्या बंधनाला आपण “नाते” असे म्हणतो. कधी हे नाते रक्ताचे असते, कधी कौटुंबिक, कधी मैत्रीचे, कधी शेजारधर्माचे असते तर कधी केवळ माणुसकीचे. रक्ताचे नाते हे आई, वडील, मामा, काका, आजी, आजोबा, भावंडं ह्या रूपात आपल्याला जन्मतःच मिळते. दोन कुटुंबातील घरोब्यामुळे कौटुंबिक नाते तयार होते. समाजात वावरताना समान आवडी निवडी, विचारसरणीच्या दोन व्यक्तींमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होते. शेजाऱ्यांमध्ये शेजारधर्माचे नाते असते. तसेच एकमेकांशी कुठलाही संबंध नसताना देखील केवळ निस्वार्थ भावनेने जेंव्हा मदत केली जाते तेंव्हा माणुसकीचे नाते तयार होते.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. सगळी नाती एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदायची. त्यामुळे घरातील मुलांवर लहानपणापासूनच ही सगळी नाती जपायचे संस्कार आपसूकच व्हायचे. दोन कुटुंबे, शेजारी ह्यांच्यामध्ये मनमोकळेपणा, घरोबा राहायचा. माणूस माणसाला निस्वार्थपणे मदत करायचा. त्यामुळे घरातील नाती जपण्यासोबतच इतरही सगळी नाती जपण्याचे बाळकडू मिळत होते.
पण जसजसा काळ बदलला माणूस शिक्षण, व्यवसाय, नौकरीच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब दुसऱ्या गावी स्थलांतरित झाला. परिणामी हळूहळू एकत्रकुटुंबपद्धत जाऊन विभक्त कुटुंबपद्धती आली. आई,वडील, मुलगा किंवा मुलगी एवढेच कुटुंब. बाकी सर्व नातेवाईक दुसऱ्या दुसऱ्या गावाला. त्यामुळे मुलांना बाकी नाती भरभरून अनुभवताच येत नाहीत. विभक्त कुटुंबामुळे मुलांवर आजी, आजोबा किंवा इतर नात्यांमुळे होणारे उत्तम संस्कार होऊ शकत नाहीत. आई वडिलांना व्यस्त दिनचर्येमुळे वेळ नाही आणि मुलं घरी एकटेच असेच चित्र दिसून येते. मिळून मिसळून राहण्याची भावना मुलांमध्ये रुजत नाही. शिवाय नात्यांबद्दल आदर, प्रेम निर्माणच होत नाही. आजकाल यांत्रिकीकरण आणि प्रचंड व्यस्त दिनचर्येमुळे एकमेकांशी फोनवर बोलण्यासही वेळ नसतो आणि त्यातूनही जर वेळ मिळालाच तर तो स्वतःच्या करमणुकीसाठी दिला जातो. कित्येक महिने नातेवाईकांशी बोलले जात नाही. फक्त वॉट्स ऍप, फेसबुक च्या माध्यमातून तुटक शब्दांमध्ये एकमेकांची विचारपूस केली जाते. आजकाल तर वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस ह्यासंबंधातील शुभेच्छांचे, अभिनंदनाचे एव्हढेच नाही तर श्रद्धांजलीचे देखील फक्त संदेश पाठवले जातात. फार कमी लोक अशा प्रसंगी फोन करून आनंद, उत्साह, दुःख ह्या भावना व्यक्त करतात. म्हणूनच नात्यांमध्ये एकप्रकारचा कोरडेपणा येत चालला आहे.
आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या इतर कुटुंबांमधील, शेजाऱ्यांमधील घरोबा कमी झालेला आहे. “जेवढ्यास तेवढे” असे समीकरण झाले आहे. प्रत्येकाला आपला खाजगी वेळ जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे दोन कुटुंबांनी, शेजाऱ्यांनी एकत्र येणे, भेटणे कमी झालेले आहे. कित्येक वेळा आपल्या शेजारी कोण राहते हे देखील बऱ्याच लोकांना माहिती नसते. गरज पडल्यास शेजारी म्हणून हक्काने मदत मागण्यापेक्षा एकप्रकारचे अवघडलेपण येते.
उच्चशिक्षण आणि त्यानंतर येणारे भरगोस पैसे, बदललेली जीवनशैली, व्यस्त दिनचर्या, स्वार्थी मानसिकता ह्या सर्वांमुळे जीवन जगण्याची नीतीमूल्येच हरवत चालली आहेत. आजकाल एक माणूस चटकन दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मदतीची वेळ येते तेंव्हा हात अढखळतो. अपघातामुळे रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीस उचलून पटकन दवाखान्यात न नेता त्याचे चित्रीकरण चालले आहे हे चित्र तर सर्रास दिसून येते. हे तर माणुसकीचे नातेही हरवत चालल्याचेच उदाहरण म्हणायला हवे. आजकाल खरी मैत्री देखील फार कमी पाहायला मिळते. मैत्रीसारख्या सुंदर नात्यातही पैसे, स्वार्थ, श्रीमंती, गरिबी बघितली जाते. आपल्या “स्टेटस” प्रमाणे मैत्री करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे केवळ आवडी निवडी आणि विचारसरणीच्या जोरावर मने जुळून होणारी खरी मैत्री दुरापास्त झाली आहे. मुळातच माणसांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर ह्या भावनांची धार बोथट होते आहे. परिमाणी सर्वच नाती दुरावत चालली आहे. माणसांमधील संवाद हरवत चालला आहे.
हे जर असेच सुरु राहिले तर समाजात अराजगता वाढेल. माणूस अजून एकटा एकटा पडत जाईल. हे सर्व टाळायचे असल्यास प्रत्येकाने ह्याची सुरवात प्रथम आपल्या घरातून करायला हवी. आपल्या नातेवाईकांना वेळात वेळ काढून फोन करावा. आनंदाच्या प्रसंगी प्रत्यक्ष बोलून त्यांचा आनंद द्विगुणित करावा. दुःखद प्रसंग असल्यास आपल्या चार आपुलकीच्या शब्दांनी समोरच्याला धीर येतो. जरी सगळे नातेवाईक दूर राहत असतील तरी आपल्या मुलांना त्यांच्या काका, आत्या, मामा आणि इतर भावंडांविषयी सांगत राहावे. सणवार, सुट्ट्यांमध्ये एकमेकांना नक्की भेटावे. त्यामुळे आपसातील प्रेम वाढीस लागेल. आपल्या शेजाऱ्यांशी आपणहून बोलावे. कधीतरी दोन तीन कुटुंबे मिळून एकत्र जेवणे, सहलीला जाणे ह्यामुळे एकमेकांना समजून घेता येईल. आपुलकी वाढेल. साहजिकच कौटुंबिक आणि शेजारधर्माच्या नात्याला योग्य खतपाणी मिळेल. मैत्री करताना “स्टेटस” न पाहता केवळ ती व्यक्ती, तिचे विचार हे पाहून मैत्री केली तर मैत्रीचे नाते नक्कीच फुलेल. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ असे म्हणत स्वार्थ, लबाडी, अविश्वास बाजूला ठेऊन एकमेकांना मदत करायला हवी. माणुसकीचे नाते जपायला हवे.
प्रत्येक व्यक्तीने हे सर्व अगदी मनापासून करायचा प्रयत्न केला तर नात्यांमधील कोरडेपणा, शुष्कपणा नाहीसा होऊन प्रत्येक नाते प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदर ह्या भावनांनी बहरेल आणि एक प्रगतशील आणि नीतिमूल्ये असणारा समाज निर्माण व्हायला नक्कीच मदत होईल.