सौ. ऋचिता बोधनकर दवंडे
डिसेंबर महिन्यासाठी मिळालेला ” साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले! ” हा विषय वाचला आणि मला २०२१ चा सप्टेंबर ऑक्टोबर महिना आठवला. ह्याच दरम्यान महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या स.न.वि.वि. ह्या इ–मासिकातर्फे ‘ साहित्योन्मेष ‘ ही स्पर्धा जाहीर केल्या गेली. बारा महिने बारा लेख ही संकल्पनाच खूप वेगळी वाटली आणि मी लगेच माझे नाव ह्या स्पर्धेसाठी नोंदवले. मुळातच लेखनाची आवड असल्याने आता आपल्याला वेगळे काहीतरी लिहायला मिळणार म्हणून मी उत्साहित होती. पहिले तीन महिने आपल्या आवडत्या विषयांवर लिहायचे होते. त्यामुळे लिहिणे सोपे वाटत होते. त्यानंतर मात्र परीक्षकांकडून विषय द्यायला सुरवात झाली आणि विषय बघितल्यावर आपल्या लिखाणाचा कस लागणार ह्याची कल्पना आली.
देण्यात आलेल्या परिच्छेदावरून कथा लिहिणे असो, पत्रलेखन असो, कविता असो, आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असो, वैचारिक लेख असो किंवा एखादा विनोदी प्रसंग असो साहित्योन्मेष स्पर्धेमुळे मला वेगवेगळ्या विषयांवर लिहिता आले. कथा, कविता, पत्रलेखन, ललितलेख अशा सर्वच साहित्यप्रकारात लिहायची संधी ह्या स्पर्धेमुळे मिळाली. कधी ही स्पर्धा मला सुट्ट्या, प्रवास ह्या विषयांच्या माध्यमातून बालपणात घेऊन गेली. तर कधी आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग लिहिताना मन हळवे करून गेली. तर कधी ह्या स्पर्धेने चक्क निसर्ग, समुद्र, डोंगर, जंगले ह्यांना पत्र लिहिण्याची संधी दिली आणि नकळतच त्यांच्या अधिक जवळ नेले. पत्रलेखन करताना निसर्ग आणि त्याच्या ह्या घटकांचे आपण किती देणे लागतो ह्याची नव्याने जाणीव झाली. आजची परिस्थिती – चिंतन, पालक पाल्य संबंध, वर्क फ्रॉम होम कि होम वर्क, पन्नाशीनंतरचे वेळापत्रक ह्या सारख्या विषयांमुळे विचार करण्याच्या कक्षा रुंदावल्या. भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे, परकीय भाषेच्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी, भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते कि कमी होते? अशा विषयांमुळे होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही बाजूने लिहिता आले. ह्यामुळे एकाच विषयावर दोन्ही बाजूने विचार करायची नवी दृष्टी मला मिळाली.
पहिले काही लेख सोडल्यास बाकी सर्वच लेख लिहिताना शब्दमर्यादा होती. कधी लिहिता लिहिता शब्द कमी जास्त व्हायचे आणि मग तो लेख दिलेल्या शब्द संख्येत बसवताना तारांबळ उडायची. पण ह्याने एक फायदा मात्र झाला की मला कुठलाही विषय देण्यात आलेल्या शब्दमर्यादेत लिहिण्याची सवय लागली.
स्पर्धा म्हटली की व्याकरणाला महत्व हे राहणारच. त्यामुळे लिखाण करताना र्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, स्वल्पविराम ह्या आणि अशा व्याकरणातील सर्वच बाबींची काळजी घेतली जात होती. कारण व्याकरणात चुका झाल्या तर गुण कमी होणार होते. म्हणूनच मी प्रत्येक लेख, कथा लिहून झाल्यावर तो पुन्हा पुन्हा तपासून पाहायची. साहित्योन्मेष स्पर्धेमुळे लिखाण तपासून पाहण्याची ही खूप चांगली सवय अंगवळणी पडली.
स्पर्धेमध्ये साहित्य पाठवण्यासाठी दर महिन्याची २५ तारीख दिली जायची. त्यामुळे विषय दिल्यापासून २५ तारखेपर्यंत लिखाण करायला वेळ मिळायचा. घरातील जबाबदाऱ्या, लहान मुलगा हे सर्व सांभाळून लिखाण करताना थोडी कसरत होत होती. पण विषय इतके छान आणि वेगळे होते कि लिहिताना उत्साह यायचा, डोक्याला चालना मिळायची आणि मग २४ तारखेला रात्री साहित्य परीक्षकांकडे पाठवल्यावर गड सर केल्यासारखा आनंद मिळायचा. ह्यामुळे कोणत्याही स्पर्धेसाठी लिखाण करताना दिलेला कालावधी पाळणे किती महत्वाचे आहे हे मला पटले.
ह्या स्पर्धेमध्ये माझ्यासोबत इतर अनेक सह्स्पर्धक होते. दर महिन्यात आपल्यासोबतच इतर स्पर्धकांनी कोणत्या विषयावर लिहिले आहे आणि कसे लिहिले आहे हे वाचण्याची उत्सुकता राहायची. आमचे साहित्य दर महिन्याच्या स.न.वि.वि. ह्या इ मासिकामध्ये छापून यायचे. म्हणून मासिकाची अगदी चातकासारखी वाट पाहिली जायची. दिला गेलेला विषय किती वेगवेगळ्या बाजुंनी मांडता येतो हे त्यातील सह्स्पर्धकांच्या साहित्यावरून समजायचे. इतर साहित्य वाचताना कधी नवीन शब्दांची भर पडायची. ‘ अरे हा विषय अशाही रीतीने लिहिता येऊ शकतो ‘ हे लक्षात यायचे. थोडक्यात साहित्योन्मेष स्पर्धेमुळे मला अमुक एखाद्या विषयावर लिहिताना चौफेर विचार करायची सवय जडली. स्पर्धेच्या निमित्ताने नवीन लोकांची ओळख झाली. प्रत्यक्ष भेट नाही झाली तरी दर महिन्यात लिखाणातून भेट होत होती. काही आधीपासूनच्याच मैत्रिणी सह्स्पर्धक म्हणून स्पर्धेत होत्या. सर्व सह्स्पर्धकांचे लिखाण वाचून आपण पुढील लेख ह्यांच्यापेक्षाही चांगला लिहावा ही चुरस निर्माण होत होती. परिणामी नंतरचे लेख अधिक चांगले लिहिण्याची ऊर्जा मिळत होती. ही स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची होत होती पण एक मात्र नक्की कि स्पर्धा निकोप होती.
मी काही खूप मोठी लेखिका वगैरे नाही पण ह्या स्पर्धेमुळे दिलेल्या शब्दसंख्येत, दिलेल्या कालावधीत आणि दिलेल्या विषयावर लिहिताना माझ्या लेखनात प्रचंड सुधारणा होत गेली. मी लिहिलेला पहिला लेख आणि मी आज लिहीत असलेला लेख ह्यातील फरक माझा मलाच जाणवतो. स्पर्धेदरम्यान माझा आत्मविश्वास वाढत गेला. स्पर्धेत कधी दोन तर कधी चार पाच विषयांपैकी एका विषयावर लिहायचे होते. एकाची निवड करताना आधी मी सगळ्याच विषयांवर विचार करायची आणि मग त्यातून एक विषय निश्चित करत होती. त्यामुळे मी वेगवेगळया विषयांवर लिहू शकते हे मला नव्याने उमगले. खरंच या स्पर्धेने मला लेखिका म्हणून घडवले आणि माझीच मला एक नवीन ओळख करून दिली.
साहित्योन्मेष स्पर्धा आता संपेल. दर महिन्यातील ती विषयांची प्रतीक्षा, लेखन कसे होईल ह्याबद्दलची ती उत्सुकता, स्पर्धेतील ती चुरस ह्या सगळ्याची उणीव नक्कीच जाणवेल. स्पर्धेचा निकाल काहीही लागो. मला बक्षीस मिळो अथवा ना मिळो पण ह्या स्पर्धेने मला जे वैचारिक दृष्ट्या समृद्ध केले आहे आणि उत्तमोत्तम लिहिण्याचा जो आत्मविश्वास दिला आहे तो मात्र मला माझ्या पुढील लेखन प्रवासात नेहमीच उपयोगी राहील ह्यात दुमत नाही.
सौ. ऋचिता बोधनकर दवंडे
