–सौ. ऋचिता बोधनकर दवंडे.–
आपले आयुष्य चांगले, वाईट, विनोदी, गंभीर, आश्चर्यजनक अश्या विविध प्रसंगांनी भरलेले असते. ह्यातील काही प्रसंग त्या त्या वेळी घडलेल्या सुखदुःखाच्या घटनेमुळे, एखाद्या विनोदामुळे किंवा आलेल्या एखाद्या अनुभवामुळे नेहमीसाठी लक्षात राहतात आणि आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग बनून जातात. मी काही महिन्यांपूर्वी अनुभवलेला पुढील प्रसंग माझ्या नेहमीसाठी लक्षात राहील.
मी यंदा मार्च मध्ये माझ्या माहेरी नागपूरला गेली होती. तिथे आईकडे मोठ्या आवारात तीन वेगवेगळ्या इमारती मिळून आमची “काशी कांची अवंती” अशी वसाहत आहे. आजूबाजूला तीन इमारती आणि मध्ये मोकळी जागा असे वसाहतीचे स्वरूप आहे. बरीच कुटुंबे येथे राहतात. माझे लग्न झाल्यानंतर इतक्या वर्षांत ह्यावर्षी पहिल्यांदा योगायोगाने आम्ही बहुतेक सर्व बालमैत्रिणी एकाचवेळी आपल्याआपल्या माहेरी आलो होतो. रोज संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर प्रत्येकजण आपल्या मुलांना खाली मोकळ्या जागेत खेळायला घेऊन येत होती. मुले एकमेकांशी खेळायची आणि आम्ही मैत्रिणी गप्पा मारायचो. मुले त्यांच्या वयानुरूप चेंडू, बॅडमिंटन, पकडापकडी किंवा त्यांची खेळणी वगैरे खेळत. एके दिवशी गप्पा मारता मारता आमचा ओघ आम्ही लहानपणी कसे लपाछपी,डब्बागोल,लगोरी,साखळी,टिक्करबिल्ला,आंधळी कोशिंबीर हे खेळ खेळायचो आणि धम्माल करायचो याकडे वळला. सहजच आम्हा मैत्रिणींच्या मनात विचार आला कि आपण लहानपणी खेळलेले खेळ जर आज आपल्या मुलांना खेळून दाखवले तर? एकतर मुलांनाही ह्या खेळांची माहिती होईल आणि आपल्यालाही पुन्हा बालपण अनुभवता येईल. रोज मुलांशी एक एक खेळ खेळायचा असे ठरले. विचार पक्का होताच आम्ही सगळया मुलांना एकत्र केले.
पाहिल्यादिवशी आम्ही मुलांशी लपाछपी खेळलो. प्रथम काही मुलांनी थोडीफार कुरकुर केली पण आम्हाला खेळताना पाहून नंतर सगळेच मुले आली. लपून बसलेल्या प्रत्येकाला शोधताना त्यांची दमछाक होत होती पण त्यांना ते आवडत देखील होते. दुसऱ्यादिवशी आम्ही साखळी हा खेळ खेळायचा ठरवले. एकमेकांचा हात धरून साखळी बनवत दुसऱ्याला पकडायचे असा खेळ खेळताना मुलांना मज्जा येत होती. त्यानंतरच्या दिवशी आम्ही डब्बागोल खेळलो. मैदानाच्या मध्यभागी गोल काढून त्यात एक प्लास्टिकचा डब्बा ठेवला. आमच्यापैकी एकीने राज्य द्यायचे असे ठरवून बाकी सगळ्याजणी मुलांना घेऊन लपलो. जिच्यावर राज्य होते ती एकेकाला शोधत होती. जो दिसायचा त्याचे नाव घेत डब्ब्यावर पाय ठेऊन ‘डब्बागोल पुढे नाव’ असे म्हणत होती. एकदा तिचे लक्ष नसताना मी जाऊन पायाने डब्बा पाडला आणि आम्ही सगळे ‘डब्बागोल’ असे जोरात ओरडलो. सर्वच मुले हळूहळू ह्या खेळामध्ये रमत आहेत हे लक्षात येत होते. मग आम्ही टिक्करबिल्ला खेळायचे ठरवले. दगडाने टिक्करबिल्लाचे घर आखून आम्ही मुलांना पहिल्यांदा खेळून दाखवले. टिक्करबिल्लामध्ये पहिले एक एक मग दोन मग मग पुन्हा एक आणि मग पुन्हा दोन असे घरे आखली होती. चपटा दगड (टिक्कर) घेऊन ती पहिल्या घरात टाकायची. मग लंगडी घालत पुढील घरे पार करायची आणि परत तशीच घरे करत करत टिक्कर घेऊन यायचे या पद्धतीने त्यांना प्रात्यक्षिक दिले. मोठ्यामुलांना तर लगेच जमले. लहान मुले मात्र त्यांच्यानुसार प्रयत्न करत होती. पण थोडेसे पडत धडपडत, चुकत त्यांनी देखील ह्या खेळाचा आनंद घेतला. दुसऱ्यादिवशी आम्ही लगोरी खेळायचे निश्चित केले. लगोरी कशी तयार करायची हा प्रश्न होता. दगडाची बनवली असती पण मुलांना दगड लागू शकतात त्यामुळे ती कल्पना रद्द केली. आमच्या लहानपणी आम्ही सगळ्यांनी पाच पाच रुपये गोळा करून लाकडी लगोरी विकत घेतली होती त्याची आठवण झाली. पण दुसऱ्याच क्षणी आमची इतके वर्ष जुनी लगोरी आमच्या समोर हजर होती. एकीच्या आईने ती लगोरी जपून ठेऊन तिला रंग देऊन नवीन स्वरूप दिले होते. आमची तीच लगोरी पाहून तर आम्हा मैत्रिणींच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि लगोरी खेळायचा जोर अजूनच वाढला. एकावर एक असे सात लाकडी तुकडे रचून लगोरी तयार झाली. सर्वांचे मुलांसहित दोन गट केले. एका गटातील खेळाडूने चेंडूने लगोरी फोडून दुसऱ्या गटातील खेळाडूंचा चेंडूचा मारा चुकवत फुटलेली लगोरी पुन्हा रचताना मुले आम्हाला पाहत होती आणि हळू हळू शिकतही होती. थोड्याच वेळात मुलांना लगोरी खेळणे समजले आणि ते देखील हा खेळ मनापासून खेळले. मग नंबर आला तो आंधळी कोशिंबीर ह्या खेळाचा.जिच्यावर राज्य होते त्या मैत्रिणीचे डोळे आम्ही रुमालाने बांधले. तिच्या बांधलेल्या डोळ्यासमोर चार पाच बोटे नाचवून तिला दिसते आहे कि नाही हे तपासून पाहिल्यावर खेळायला सुरवात झाली. ती आम्हाला पकडायचा प्रयत्न करत होती आणि आम्ही तिला चुकवत होतो. मुले तर आंधळी कोशिंबीर खेळताना फारच खुश होती.
खेळांसोबतच आम्ही मुलांना घेऊन बर्फाचा गोळा, लहानपणी खूप खाल्लेली पेप्सी, कुल्फीच्या गाडीवरील कुल्फी ह्यांचा देखील मनसोक्त आस्वाद घेतला.
सर्वच मुलांना हे जुने पण त्यांच्यासाठी नवीन असलेले खेळ खूपच आवडले होते. त्यानंतर दररोज खाली जमल्यावर वयोगटानुसार कोणी साखळी खेळत तर कोणी लपाछपी तर कोणी लगोरी. त्यांच्या खेळांचा तर त्यांना जणू विसरच पडला होता. आम्हा प्रत्येकीचे आई बाबा आपल्या मुलांनी लहानपणी खेळलेले खेळ आता नातवंडे खेळत आहेत हे पाहण्यासाठी दररोज आपल्या आपल्या गॅलरीत बसत होते. आजही जेव्हा मुले आपल्या मित्र मैत्रिणींना नागपूरला खेळलेले खेळ आणि केलेली धम्माल ह्याविषयी सांगतात तेव्हा खूप छान वाटते.असे म्हणतात बालपण हे जीवनातील सगळ्यात मोठे सुख असते. हेच सुख मी पुन्हा एकदा भरभरून अनुभवले. माझ्या लहानपणी मी खेळलेले खेळ आणि केलेली धम्माल मला माझ्या मुलासोबत करता आली. माझ्या त्याच बालमैत्रिणींच्या सहवासात माझ्या मुलासोबत माझे बालपण मला पुन्हा अनुभवता आले म्हणून वरील प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे आणि तो मी माझ्या मनात नेहमीच जपून ठेवीन.

