-प्रतिभा बिलगी
लेखन आणि लिखाण या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. लिखाण ही लिहण्याची क्रिया आहे तर लेखन त्याचा परिणाम ! कथा, काव्य, नाटक, निबंध, प्रवास वर्णन, पत्रलेखन, संशोधनात्मक लेख, वर्तमानपत्र, मासिक यातील लेख असे लेखनाचे विविध प्रकार आपल्याला पहावयास म्हणजे वाचावयास मिळतात. या विभिन्न साहित्य प्रकारांनी आपले मराठी साहित्य समृद्ध झालेले आढळून येते. लेखन हे कलेचे रूप आहे. या कलेला आत्मसात करणे प्रयत्न केल्यास प्रत्येकाला शक्य आहे. कारण लिखाणाची कला सर्वांनाच अवगत असते असं नाही. लिखाण करता करता व्यक्ती आपले विचार मांडायला शिकतो. कधी-कधी इच्छा असूनही आपण आपल्या मनातलं बोलू शकत नाही. अशा वेळी लिहिते होणे माझ्या मते हा सर्वात सोपा उपाय आहे असे मी मानते. लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. याशिवाय मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. लिखाणाने माणसाला वाचन करायचीही सवय लागते. वाचनामुळे आपल्याला अन्य लेखकांचे विचार, त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, त्यांची लेखन शैली या सर्व गोष्टींचा अभ्यास करावयास मिळतो.
सहित्योन्मेष स्पर्धेने सुद्धा अशाच प्रकारे बुद्धीला तीक्ष्ण करण्याचे काम केले आहे. १२ महिने १२ विविध विषय देऊन स्पर्धकांच्या बुद्धीला एक प्रकारे धार देण्याचे काम केले. आपण ज्या विषयावर लेखन करत असतो त्या विषयावर मनापासुन लेखन करता येणे फार आवश्यक असते. आपले लेखन वाचकांच्या मनात रूची निर्माण करणारे असायला हवे, तसेच आपल्या लेखनामध्ये एक रोचकता तसेच वेगळेपणा असणे देखील खुप गरजेचे असते. आपण ज्या भाषेत लेखन करतो आहे त्या भाषेवर आपले चांगले प्रभुत्व असणे देखील आवश्यक आहे. यासाठी सराव हा एकमेव उपाय आहे. आणि हा सराव सहित्योन्मेष स्पर्धेने घडवून आणला.
स्पर्धा सुरू झाली तेव्हा स्पर्धेचा तणाव जास्त काही जाणवला नव्हता कारण विषय लेखकांनी त्यांच्या मर्जीनुसार निवडायची पूर्णपणे मुभा होती. परंतु नंतर जेव्हा आयोजकांकडून नवनवे विषय मिळत गेले तसतशी स्पर्धा अजून रंगत गेली. लेख लिहिताना भाषेचा वापर, व्याकरण शुद्धता, योग्य जागी म्हणींचा प्रयोग, उद्गार, उच्चार अश्या एक ना अनेक गोष्टीची काळजी घेण्याची सवय आपसूकच जडली. जेव्हा लिखाणाचा सराव चांगला होतो तेव्हा आपल्या लिखाणात एक प्रकारची प्रगल्भता येते हे सर्व स्पर्धकांच्या लक्षात आले असेलच.
आपले लेखन वाचकांच्या मनात वाचणाची रूची निर्माण करणारे, त्यांची उत्सुकता वाढवणारे, त्यांना वाचणात गूंतवून ठेवणारे असावे लागते. लेखकाचे विचार, त्याची बुद्धिमत्ता, त्याची आकलनशक्ती हे सर्व त्याच्या लेखनात आढळून येते. म्हणूनच लेखकाने लेख लिहिताना सतर्क राहावे. ही सतर्कता सहित्योन्मेष स्पर्धेमुळे सगळ्या लेखकांमध्ये आपोआप आली असेल असे वाटते कारण आपले लेख वाचले जात आहेत आणि आपल्या कडून कमीतकमी चुका झाल्या पाहिजेत असेच सगळ्यांना वाटत असते. म्हणूनच सुरुवातीपासूनच आपले लेखन, व्याकरण आणि वाक्यरचना तपासणे हे गरजेचे आहे.
स्पर्धेतील वेगवेगळ्या विषयांवर लिहिताना सुरवातीला आपण या विषयावर लिहू शकू का हा प्रश्न उपस्थित व्हायचा. परंतु लिहिता लिहिता सगळ्यांच्या लेखन शैलीत बरीच सुधारणा नक्कीच झाली असणार. प्रत्येक वेळी विषय कोणता असेल याची उत्सुकता होती. आणि लेख लिहून पाठवल्यानंतर त्या महिन्यातील एक मोठं आव्हान पार पाडल्याचा एक वेगळा आनंद मिळत होता.
सहित्योन्मेष स्पर्धेने स्पर्धकांना १२ महिने अगदी उत्सुकतेत ठेवलं. एक लेख पूर्ण होतोय तोवर पुढचा विषय तयार असायचा. कामामुळे आणि कधी कधी विसरल्यामुळे लेख अगदी शेवटच्या क्षणी पाठवल्याचे सुद्धा प्रसंग माझ्या वाटेला आलेत. पण लेख लिहून पूर्ण करून वेळेत पाठवल्याचे समाधानही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
लेख, निबंध, पत्रलेखन, कथा, प्रवासवर्णन अशा विभिन्न लेखन शैलीतील लेखन आपण गेले वर्षभर करत आलो. यामुळे विचारांना धार मिळाली. कित्येक दिवस माझं लिखाण थोडंफार का होईना स्थिरावलं होतं, त्याला या स्पर्धेमुळे चालना मिळाली. लेखकाचे लेखन हे सरावाने अधिक विषयानुरूप, सुसंबद्ध आणि सजग बनत जातं. विजेतेपद नाही पटकावले तरीही योग्य सराव झाला आणि सर्व लेख मासिकात छापून आले, वाचकांना आवडले ही फक्त माझीच नाही तर सगळ्या स्पर्धकांची भावना असेल.
कित्येक जणांना खूपदा अनेक शंका, अडचणी आल्या. फक्त लेख लिहितानाच नाही तर तो मेलद्वारे पाठवताना सुद्धा ! परंतु वेळोवेळी त्या शंकांचं निरसन ही आयोजकांकडून केलं गेलं. एक स्पर्धा १२ महिने चालवणे आणि या काळात प्रत्येक महिन्याचा लेख लिहिताना लेखकांच्या मनात तेवढीच ऊर्जा निर्माण करण्याचे काम अत्यंत शिताफीने आयोजकांद्वारे केले गेले आहे. प्रत्येक महिन्याची २० ते २५ तारीख ही जणू सर्व स्पर्धकांनी सहित्योन्मेष स्पर्धेसाठी राखून ठेवली होती. ज्या प्रकारे लेख पाठवताना स्पर्धक चढाओढ करत ते पाहून खूप मजा येत होती. एकंदरीत खूप चांगला अनुभव आला.
वर्तमान युगात लेखनाची परिभाषा सुद्धा बदलली आहे. कित्येक लेखन कामासाठी पेपर व पेनची आवश्यकता आज भासत नाही. कारण या आधुनिक काळात जास्तीत जास्त लोक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. कॉम्प्युटर, टॅब, मोबाईल फोन यांचा वापर सर्रास केला जात आहे. आजकालच्या पिढीला पुस्तके वाचणे किंवा लिहिते करणे खूप कठीण काम बनले आहे. आजची पिढी किंडल, इंटरनेट, गूगल मार्फत सगळ्या प्रकारची माहिती आत्मसात करते. आजची पिढी ही पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे आपणही तंत्रज्ञान वापरून त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाशी आणि साहित्याशी जोडण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी लिहिते होणे आवश्यक आहे. स्पर्धांमुळे नवनवीन लेखकांचे विचार वाचावयास मिळतात. हाच यशस्वी प्रयत्न सहित्योन्मेष द्वारा पार पडला असे माझे मत आहे.
पुन्हा एकदा सहित्योन्मेषचे आभार, आम्हाला लिहीतं केल्याबद्दल ! लेखकांना एक उत्तम मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल ! कारण प्रत्येक लेखकाला योग्य मार्गदर्शनाची, प्रोत्साहनाची आणि प्रतिसादाची आवश्यकता असते आणि ती या स्पर्धेद्वारे सर्वाना मिळाली.
© प्रतिभा बिलगी “प्रीती”
हिंदी प्राध्यापक, बेंगलोर
