— अजिता पणशीकर —
“ए दादा, माझा डबा दे नं लवकर. कॉलेजला जायला उशीर होतोय रे. त्यात आज बारावीचा शेवटचा पेपर आहे!”, रिया अस्वस्थपणे फेऱ्या घालत रोहितला हाका मारत होती. तिच्यापेक्षा वयाने चांगला आठ वर्षांनी मोठा असलेला रोहित अगदी मनापासून काळजी घ्यायचा तिची. त्याने बनवलेलं सँडविच पट्कन पॅक केलं आणि हसत “बेस्ट ऑफ लक” म्हणत तिला डबा दिला. तिचे निरागस काळेभोर डोळे, पिंगट लांब केस, आणि नाजूक बांधा पाहून त्याच्या हृदयात एक हलकीशी कळ उठली. किती आईसारखी दिसायला लागली आहे रिया!
रियाची पाठ शाळेकडे वळली आणि त्याचं मन भूतकाळाकडे. पाच वर्षांपूर्वी तो भयानक अपघात झालाच नसता तर?? ….आई-बाबा-रिया आणि तो चार दिवस ‘जीवाची मुंबई’ करून घरी निघाले होते! तो गमती-जमती सांगण्यात दंग होता, आणि इतर तिघेही हसण्यात! कधी, कसा विरुद्ध दिशेने येणारा ट्रक कलंडला आणि त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली ते कळलेच नाही! त्यांची गाडी उलटी-सुलटी झाली आणि मग बहुदा त्यांची सगळ्यांचीच शुद्ध हरपली असावी. त्याला जाग आली ती भयंकर थंडीने…आजूबाजूला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली अनेक गाठोडी होती. नकळत त्याच्या तोंडून जोरात किंचाळी बाहेर पडली आणि तिथला चौकीदार धावत आला. पुढे सारी चक्र भराभर फिरत गेली….त्याला हॉस्पिटल वॉर्डमध्ये त्याच्या बहिणीजवळच्या, रियाजवळच्या, बेडवर आणून ठेवले गेले. ती तर बेशुद्धच होती. “आमचे आई-बाबा कुठे आहेत, कसे आहेत? भेटू शकतो का मी त्यांना?” रोहितने भीतभीतच विचारलं. “तू लवकर बरा हो, मग बोलू आपण”, म्हणत डॉक्टरने नजर मिळवणं टाळलं, पण त्यातच त्याला उत्तर मिळालं होतं. आता त्यालाच रियाचा दादा, आई, बाबा व्हावं लागणार हे घाबरवून टाकणारं सत्य ध्यानात आलं होतं. छोट्या रियाचा दादावर खूप जीव असल्याने त्याच्या आधाराची तिला खूप गरज पडणार होती.
रिया ‘बाय’ म्हणून गेली आणि रोहित आत खोली आवरायला वळला. घाईघाईत अंथरून-पांघरुणही आज तशीच ठेऊन गेली ही मुलगी! दोघंच रहात होती त्या तीन खोल्यांत, पण घर अगदी टापटीप, व्यवस्थित होतं, अगदी त्यांची आई ठेवायची तसंच! “पेपर चांगला जाऊ देत हिचा म्हणजे बाईसाहेब आल्यावर खूष असतील”, स्वतःशीच तो पुटपुटला. लोणावळ्यामध्ये रहात असल्याने हवा छान थंड होतीच. संध्याकाळी मस्तपैकी तिच्या आवडीची कॉफी आणि भजी करायची ठरवूनही टाकलं त्याने!
उंचपुरा बांध्याचा आणि थोडेसे लांब केस असलेल्या रोहितचं व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. फारसा शिकू शकला नव्हता तो, पण त्याच्या हातात काहीतरी अद्भुत जादू होती. मग ती स्वयंपाकात असो की बाइक्स दुरुस्त करण्यात! घराजवळच्या स्वतःच्याच रिपेअर शॉप मध्ये येणारे अनेक जण त्याच्या किमयेचं कौतुक करत. मोटरसायकल असो अथवा स्कूटर, दुरुस्तीच्या पलीकडे गेलीली गाडी देखील तो पूर्ववत चालू करतच असे! कामाचे आणि वर खुशीने दिलेले पैसे असे दोन्ही मिळत असल्याने त्याची कमाई चांगली होती आणि दोन माणसेही हाताशी होती. त्यामुळे त्याला स्वतःसाठी आणि रियासाठी वेळ देता येत होता.
रिया आणि तो अनेकदा जवळच्या टेकडीवर फिरायला जात. कैवल्य विद्या निकेतन, तिची बालपणापासूनची शाळा, ही वळवण जवळच्या हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी होती. त्यामुळे तिला त्या टेकडीचे खूप प्रेम होतं आणि “तिथे आपलं एक छानसं घर असावं” असं ती नेहेमी म्हणे. आजूबाजूला सुंदर टुमदार बंगले होते. तो परिसर, त्यातली रंगीबिरंगी फुलं, त्यांचा सुवास, तिला फार आवडायचा. रिया त्याने भारावून जायची. ती हट्टाने टेकडीच्या पायथ्याशीअसलेल्या एका विशिष्ट कौलारू बंगल्यापाशी जायचा आग्रह करायची. तिथली फुले काही वेगळीच होती, गर्द जांभळ्या रंगाची आणि धुक्याचा गंध असलेली. का एवढा ओढा होता तिला त्या घराबद्दल कुणास ठाऊक! पण रोहितला ते नको वाटे….. “नको गं, ते नेमके कुणा रागीट माणसाचे घर असेल. त्यांना आवडणार नाही” असं म्हणून तो ते टाळत असे. “रिकामंच तर दिसतं आहे की ते!”, रिया हट्टाने म्हणायची. तिचे सर्व लाड पुरवणारा रोहित तिचं हे मात्र अजिबात ऐकायचा नाही. मग काहीतरी इतर गप्पा- गोष्टी करून तिला तो रिझवत असे, आणि त्यात ती त्या बंगल्याबद्दल विसरुनही जात असे!
रियाची एक खास मैत्रीण पूर्वा आणि ती ह्या टेनिस खेळायला जायच्या. परीक्षा आटोपल्या आणि आता रोज खेळता येईल म्हणून ह्या खुशीत खेळायला स्पोर्ट्स क्लब मध्ये गेल्या. आज डबल्सचा गेम खूपच रंगात आला होता. रियाची नजर मधूनच दादाला शोधात होती. “येतो लवकरच, तुझी मॅच आहे नं”, असं तिला सोडतांना तो सांगून गेला होता. ती ह्या मॅचमध्ये मस्त तर खेळत होतीच पण जिंकतही होती, आणि कौतुक पाहायला दादा नव्हता. गेम संपत आला आणि तिला तो अचानक टाळ्या वाजवतांना दिसला. ती आनंदली! आता दुसऱ्या जोडीबरोबर खेळायच्या आधी भेटून येऊ म्हणून वळली तर तिला तो गर्दीत कुठेच सापडेना. “दादा असाच करतो नेहेमी…..आत्ता इथे आहे म्हणेपर्यंत दिसेनासा होतो. सारखा-सारखा कुठे जातो हा?”, ती रागाने स्वतःशीच पुटपुटली आणि पुन्हा खेळाकडे वळली. तो गेम मात्र त्या दोघी मैत्रिणी हरल्या. खट्टू होऊन ती दादाची वाट बघत बसली. “आपण परीक्षेला गेलो होतो नं तेव्हाही असाच दिसला म्हणेपर्यंत परत हरवला पालकांच्या गोतावळ्यात. तू शोधत नव्हतीस का तेव्हाही त्याला?”, पूर्वाला एकदम आठवलं. “जाऊ दे गं, माझं घर तर इथेच आहे. मी थांबते नं तुझ्याबरोबर तो येईपर्यंत”, ती पुढे म्हणाली.
जवळ-जवळ अर्ध्या तासाने एकदाचा रोहित आला. “किती वाट पाहायला लावतोस रे? कुठे निघून जातोस मध्येच? आज तर दुकान पण बंद होतं तुझं”. “अगं, अगं किती बोलतेस?” हसत त्याने तिला टपली मारली आणि, “बस आता बाईकवर” म्हणत गाडीला किक मारली. मागे त्याच्या जॅकेटला ‘त्या’ कौलारू बंगल्यासमोरच्या ओल्या जांभळ्या फुलांच्या पाकळ्या चिकटलेल्या तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत. मागेही त्याच्या शर्टाला त्या फुलांचा धूसरसा वास येत होता, आणि एकदा बूट साफ करतांना ही फुले खाली फटींमध्ये अडकलेली होती….. हल्ली हे बऱ्याचदा होतं, आणि विचारलं तर धड काही सांगत नाही .… तिच्या अचानक लक्षात आलं. परत जातांना तिला जाणवलं की तो कसल्या तरी काळजीत आहे. “आपल्यापासून हा काहीतरी लपवतोय असं का वाटतं नेहेमी मला?” ती गोंधळून गेली होती. “कोणी गर्लफ्रेंड वगैरे.?…..छे, छे, तसं असतं तर सांगितलं असतं त्याने नक्की मला. आणि जरी असतं, तर खुशीत दिसला असता, खोल विचारात नाही”…. तिचेच प्रश्न आणि तिचीच उत्तरं मनात घोळत होती.
घरी गेल्यावर रिया शांत-शांतच होती. ती जॅकेटवर चिकटलेली जांभळी फुले तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. का कुणास ठाऊक पण खूप अस्वस्थ वाटत होतं. थोडंसं खाऊन ती आडवी पडली. डोळाही लागला असावा. तिला जाग आली तेव्हा रोहित हळूच बाहेर पडतांना दिसला. हा कुठे जातो, काय करतो ह्याची उत्सुकता आता ताणली गेली. ही चांगली संधी आहे…. जरा अंतर ठेऊन, ती त्याच्या मागे चालायला लागली. तिन्हीसांजेची वेळ. लोणावळ्याचा गारवा हवेत मुक्त संचार करू लागला होता. रिया शहारली, “पट्कन एखादा स्वेटर घेऊन निघायला हवं होतं”, तिच्या मनात येऊन गेलं. जसं चालत राहिली तसं पावला-पावला गणिक तिला आश्चर्य वाटू लागलं. “हा इथे कुठे चाललंय? आणि ह्या फिरायच्या टेकडीपाशी का आलाय?….. आणि हे काय??….. मला हजारदा ‘इथे नको जाऊ’ सांगितलं त्याच कौलारू बंगल्यात शिरतोय??” तो आत गेला, दार बंद झालं आणि ती अधिकच चक्रावून गेली!
”आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा”….तिने ठरवले. भराभरा चालत जाऊन ती ही तिथे पोहोचली. दारावरची कडी हलकेच वाजवली. दार उघडेच होते. तिने ते किलकिले केले. आत डोकावताच तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही…. आतमध्ये सोफ्यावर तिघे बसले होते. तिचा दादा, आणि…..आणि तिचे आई-बाबा….. हो, हो, तेच होते नक्की!! फक्त ते दोघे आत्ता जरा विचित्रच दिसत होते. तो भयानक अपघात झाला तेव्हा ती लहान असली तरी ते दोघे चांगलेच आठवत होते तिला. पळत जाऊन आई-बाबांना मिठी मारावी असं मनात आलं, तेवढ्यात आई म्हणाली, ” रोहित, तू आहेस म्हणूनच आम्हाला रियाची काळजी नाही. आम्ही दोघे तर मेलो म्हणून घोषितच केलं होतं. तू ओरडल्याने निदान तुला शवागारातून बाहेर काढलं आणि लगेचच तुझापण जीव गेला तरीही ते शरीर तुला वापरता आलं. नशीब आपलं चांगलं म्हणून रियाचा तू तरी सांभाळ करू शकलास”…. बाबांनीही मानेने दुजोरा दिला. रोहित काकुळतीला आल्यासारखा वाटला, “मलातर मधून-मधून अदृश्य व्हावंच लागत…..मानवी शरीर फार जड होत चाललंय मला…. जगापासून सत्य लपवण्यासाठी मला जे जे करावं लागतं, त्याने अगदी थकून जातो. त्यातून रियालाही हल्ली शंका यायला लागली आहे. ती मला भलतेच प्रश्न विचारेल ही सतत भीती वाटते….”
रियाचे डोळे विस्फारले…. हे काय पहात, काय ऐकत होती ती?….काही कोडी सुटत होती आणि काही नवीन पडत होती ….
शुद्ध हरपून ती खाली कोसळली!!