सनविवि अनुभव साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले…?

साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले…?

वैशाली चौधरी

परवा माझ्या मुंबईच्या मावसभावाचा मला फोन आला. तसे आम्ही एकमेकांशी नियमितपणे बोलत नसलो तरी वर्षातून एक दोनदा एकमेकांच्या वाढदिवसाला तरी फोन करतो. बोलता बोलता तो अचानक म्हणाला, “तुझा मराठी accent एकदम बदलला आहे.”

“काय? accent?? तेही मराठी ?? ” मी आश्चर्यचकित झाले.

“हो,” तो शांतपणे म्हणाला.

“अरे इंग्रजी accent एक वेळ समजू शकते. पण मराठी accent ?? हे तर मी पहिल्यांदाच ऐकते आहे,” मी.

“अगं खरंच. इतकी वर्षे बोलतो आहे मी तुझ्याशी, यावेळेस मला फरक जाणवला,” त्याने स्पष्टीकरण दिले.

“अच्छा, अरे पण तुला माहीतच आहे, कि मी तर रोज इतके मराठी बोलतही नाही. असो,”. 

त्याचे काय आहे, माझे पतीदेव हे मल्याळी, त्यामुळे आम्ही घरात हिंदी इंग्रजीच बोलतो. अगदी मुलांशी सुद्धा. त्यामुळे दिवस – रात्र रोज मराठी भाषा बोलली जात नाही. हा, आठवड्यातून दोन तीनदा आई, बाबा, बहीण, भाऊ यांना फोन होतो किंवा एखादी मराठी मैत्रिण भेटली कि मग तेव्हा तेवढ्यापुरतं मराठी बोललं जातं. पण मग अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. जरी मी दिवसभर इतरांशी मराठी बोलत नसले, तरी आजकाल मनातल्या मनात मराठी बोलणे माझे वाढले आहे ना…

आहे कि नाही गम्मत??

 

तर त्याचे काय आहे..मला असे वाटते, हि भेट मला “साहित्योन्मेष” या स्पर्धेमुळे मिळाली आहे. गोंधळून नका जाऊ, सांगते नीट, ऐका तर… सॉरी, म्हणजे वाचा तर..

 

मूळची सांगलीची असणारी मी, अर्थातच माझ्या भाषेवर, सांगलीच्या मराठीचे प्रभुत्व आहे. साधारण २-३ वर्षांपासून एखाद – दुसरा लेख किंवा कथा लिहायला मी चालू केले. मागच्यावर्षी, कुणीतरी मला “महाराष्ट्र मंडळ बंगलोर” या ग्रुपमध्ये ऍड केले. योगायोगाने तिथे सनविवि मासिकासाठी लेख पाठवू शकता असा संपादक स्मिताताईंचा मला मेसेज दिसला. मी माहिती घेऊन लगेच एक लेख पाठवला. दुसरा योगायोग म्हणजे, तो लेख सनविविच्या गणपति विशेषांकासाठी होता. अशा प्रकारे माझ्या मराठी लिखाणाचा तेव्हा “श्रीगणेशा” झाला, जणू गणपति बाप्पांचा आशीर्वाद मला मिळाला. त्यानंतर २ महिन्यांनी लगेच स्मिताताईंनी मला साहित्योन्मेष स्पर्धेबद्दल मेसेज पाठवला आणि माझे नाव ग्रुपमध्ये ऍड सुद्धा केले. आणि तिथूनच माझ्या लिखाणाला नवी दिशा मिळाली.

 

साहित्योन्मेष स्पर्धेची कल्पनाच मला खूप आवडली होती – १२ महिने १२ लेख !!!

पहिले ३ महिने आपल्या आवडीच्या कुठल्याही विषयावर लिखाण करा, पण बाकी नऊ महिन्याला वेगवेगळे विषय दिले जाणार होते. जॉब, मुले, घर सांभाळता सांभाळता नाकी नऊ येते, १२ महिने कशी लिहू शकेन? तेही दिलेल्या विषयावर?? १२ महिने नाही जमले, तरी ४-५ महिने तरी जमेल. नेहमीच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळे करता येईल. आणि दर महिन्याला वेगवेगळे विषय म्हणजे काय? “निसर्ग, पाने, फुले, प्रेम, वगैरे ” असे विषय मिळतील. प्रयत्न करायला काय हरकत आहे? अशा उद्देशाने मी या स्पर्धेत भाग घेतला. पहिले ३ महिने ठीकठाक गेले. पण चौथ्या महिन्यात बॉम्ब फुटला. मिळालेला विषय पाहून स्पर्धकांची पळताभुई झाली. ग्रुपमध्ये काहींनी कौतुक तर काही जणांनी आश्चर्य व्यक्त केले. काही परिच्छेद दिले होते. त्यापैकी कोणताही परिच्छेद कथेमध्ये जसाचा तसा यायला पाहिजे, असे सांगितले होते. विषय खरंच आव्हानात्मक होता. एकूण काय तर “या महिन्याचा पेपर खूप कठीण आहे,” असे मत स्पर्धकांनी व्यक्त केले. पण जसजसे प्रत्येकाने लिहायला सुरुवात केली तसे सर्वांनाच या विषयावर लिहायला मजा आली. मी लिहिलेल्या, “दुरावा” या रेवती आणि रामच्या कथेचा जन्म या महिन्यातच झाला. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रिणींना हि कथा खूप आवडली. माझ्या एका काकांनी तर ती कथा त्यांच्या बऱ्याच मित्र परिवारांमध्ये, व्हाट्स अप ग्रुपवर शेअर केली. मला खूप आनंद झाला. आपण लिहिलेले कुणीतरी वाचतंय आणि त्यांना ते आवडतंय हि भावनाच खूप सुखद होती. 

त्यानंतर आम्हाला कविता, पत्रलेखन, अविस्मरणीय प्रसंग, विनोदी कथा, आत्मकथन, ललितलेख अशा बऱ्याच विषयांवर लिहायला संधी मिळाली. मला स्वप्नातही वाटले नव्हते, कि मी अशा वेगवेगळ्या विषयांवर लिहू शकेन. ऑफिस काम इतके वाढले होते कि मी शेवटच्या ३-४ महिन्यात तर या महिन्याचा लेख राहू दे असा कितीदा तरी विचार केला. काही लेख तर मी अक्षरशः रात्री ११:३० ला बसून अर्ध्या तासात लिहून ११:५५, १२ वाजता असे पाठवले. इतका उत्साह, सातत्य आणि जिद्द हे सर्व काही मला या साहित्योन्मेषमुळेच दाखवता आले.

 

हि एक स्पर्धा आहे असे कधी वाटलेच नाही मला. कारण इथे येण्याचा हेतूच हा काहीतरी वेगळे करू, नवीन शिकू असा होता. १२ महिने १२ लेख लिहिताना, मला स्पर्धक आणि आयोजकांच्या रूपाने नवे मित्र मैत्रिणी मिळाल्या. एक नवा समूह मिळाला, प्रत्येक लेखकाच्या लेखनशैलीतून बरेच काही शिकायला मिळाले. आधी फक्त सत्य घटनांवर लिहिणारी मी आता काल्पनिक कथाही लिहू लागले. शब्दसंग्रह वाढला, व्याकरण सुधारले, वेगवेगळे साहित्य प्रकार समजले, कल्पनाशक्ती वाढली, वाचन वाढले , बाकी लेखकांच्या कथा, लेखांवर अभिप्राय देता येऊ लागले. 

 

आणि या सर्व गोष्टीपेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे … “आत्मविश्वास..” मला साहित्योन्मेषने आत्मविश्वास दिला कि मी लिहू शकते आणि मी लिहिलेले लोक वाचू शकतात, त्यांना ते आवडू शकते. 

 

आता पुढचा महिना म्हणजे जानेवारी, नवे वर्षे.. या नव्या वर्षातील नव्या महिन्याला आता आम्हाला लिहायला नवा विषय मिळणार नाही याचे दुःख असले तरी, गेल्या वर्षभरात इतकी शिकवण मिळाली आहे कि, नवा विषय मिळो ना मिळो, मी आता नक्कीच लिहीत राहणार आहे. 

अशा प्रकारे माझ्यामध्ये दडलेल्या लेखिकेची माझ्याशी भेट घालून दिल्याबद्दल साहित्योन्मेषचे खूप खूप आभार…. !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *