एक अनोखे नाते

वैशाली चौधरी

मृदुला रुग्णालयातल्या बेडवर पहुडली होती. पंखा गरगर फिरत होता, पण तिची त्यावरची नजर मात्र स्थिर होती. मनात असंख्य विचार चालू होते. “माझ्या बाबतीतच असे का झाले असावे?” या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिला त्याचे उत्तर मिळत नव्हते. तितक्यात दार वाजले, मिहीर हातात एक पिशवी घेऊन आत आला. मृदुलाला पुन्हा रडताना पाहून तो म्हणाला,

“मृदुला बस कर आता. किती ते रडशील? तब्येत अजून खराब होईल तुझी.” मृदुला काहीच बोलली नाही. उत्तर दिले ते फक्त तिच्या डोळ्यातील अश्रूंनी. तो शांतपणे तिच्या बाजूला येऊन बसला. तिचा हात स्वतःच्या हातात घेतला, “हे बघ जास्त विचार करू नकोस. कालपासून तू काहीच खाल्लेले नाहीयेस. मला माहित आहे तुला किती त्रास होत असेल ते. पण आता आपण काय करू शकतो यावर? आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय आपल्यासमोर काहीच पर्याय नाही. तुला काय वाटतं? मला काही दुःख झालं नसेल का?? स्वतःला सावर. आई, बाबा किती चिंतेत आहेत. निदान त्यांच्यासाठी तरी तू स्वतःकडे लक्ष दे. हे घे, नारळ पाणी, कालपासून काहीच खाल्लं नाहीस,” मृदुलाने शांतपणे शहाळे हातात घेतलं आणि दोन घोट प्यायलानंतर  पुन्हा तिने हुंदका दिला. मिहीरने तिच्या पाठीवर थोपटले. नारळ पाणी प्यायल्यावर मृदुलाला बरे वाटले. ” मी खाली जाऊन औषध गोळ्या घेऊन येतो,” असे म्हणून मिहीर पुन्हा बाहेर गेला. तो जाताच पुन्हा मृदुला त्याच विचारांमध्ये गुंफून गेली. काही केल्या तिच्या डोक्यातून तो प्रसंग जात नव्हता. तीन महिने पूर्ण झाल्या झाल्या, किती उत्साहाने त्या दिवशी तिने तिची आनंदाची बातमी आपल्या मैत्रिणींशी शेअर केली होती. ऑफिसमधल्या सर्वांनी तिचे मनापासून अभिनंदन केले होते. पुढच्या सहा महिन्याचे तिने मस्त प्लॅनिंग केले होते. तो दिवस खूपच उत्साहाने तिने साजरा केला होता. आनंद शेअर केल्याने द्विगुणित होतो याचीच तिला जणू प्रचिती आली होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिने नेहमीप्रमाणे तिची कॅब  बुक करून ती घरी निघाली होती. आपल्या येणाऱ्या बाळासाठी छान छान स्वप्न रंगवत तिचा ऑफिसमधून घराकडे प्रवास चालू होता. पण अचानक कसला तरी मोठा धडाम धुडूम असा असा आवाज आला, त्यानंतर जे तिला जाग आली ती डायरेक्ट हॉस्पिटलच्या बेडवरच. हो, मृदुलाला अपघात झाला होता. आणि या अपघातातच काही क्षणापूर्वी असलेले तिची आनंदाची बातमी, दुःखात बदलली होती. तिने तिचे बाळ या जगामध्ये येण्यापूर्वीच गमावले होते. इतकेच नाही तर, गर्भाशयाला झालेल्या अधिक दुखापतीमुळे तिला पुन्हा कधी आई होण्याचे सुख मिळणार नव्हते. मृदुलाला खूप मोठा धक्का बसला होता. आणि ह्या घटनेने तिचे आयुष्य पार बदलून गेले . होत्याचे नव्हते झाले. माझी काय चूक होती? कुणाची नजर लागली? हा प्रसंग मी कसा टाळू शकले असते? मी कॅबने नको जायला हवे होतं का? कि ऑफिसलाच जायला नको होतं?  तो प्रसंग कसा टाळू शकलो असतो ह्या विचारांनीच तिच्या मनात घर केले होते. काही दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. ती घरी आली. सासू-सासरे, आई-वडील नातेवाईक सगळ्यांनी तिचे खूप सांत्वन केले. मैत्रिणी भेटून गेल्या. अशा परिस्थितीत कोणी कोणाला काय समजावणार? पण तरी प्रत्येकाने आपापल्या परीने मृदुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर प्रेम करणारे, आपली काळजी घेणारे, इतके लोक आहेत हे बघून मृदुला स्वतःला नशीबवान समजत असली तरी दुसऱ्याच क्षणी आपण आई होऊ शकणार नाही, या विचाराने ती स्वतःला कमनशिबी समजे. मग पुन्हा तिला रडू कोसळे.  “मृदुला, अशी किती दिवस रडत बसणार आहेस? असं दुःखाला कवटाळून बसशील तर कसं चालेल? तुला यातून बाहेर पडावच लागेल. एक काम कर, पुन्हा ऑफिसला जॉईन हो. कामात मन रमेल, तेव्हा तुला यातून हळूहळू बाहेर पडायला मदत होईल”, मिहीरने तिला समजावले. सुरुवातीला नकार देणाऱ्या मृदुलाला मिहीरचे हे म्हणणे पटले. साधारण तीन महिन्यांनी, पुन्हा तिने ऑफिसला जॉईन करायचे ठरवले. नेहमीप्रमाणे सकाळी रेडिओवर उत्साही गाणी लावून ऑफिसला जाण्यासाठी तयार होणारी, मृदुला आज शांतपणे उठली आणि तयार झाली. ऑफिसमध्ये पोहोचताच, पुन्हा तिला तो प्रसंग आठवू लागला. परंतु तिने आता त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते. तो विचार येऊ द्यायचा नाही, असा तिने पूर्ण प्रयत्न केला. मैत्रिणींनी पण तिला खूप धीर दिला. तिची मनस्थिती पाहून तिला थोडेफार काम देण्यात आले. हळूहळू मृदुला पुन्हा ऑफिसच्या कामात रमू लागली. पण झालेला प्रसंग कायमचा विसरणे अशक्यच होते. 

एके दिवशी नेहमीप्रमाणे काम संपवून संध्याकाळी ती कॅब मधून घरी निघाली. तिची कॅब एका सिग्नलवर थांबली. मृदुला नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघत इकडे तिकडे निरीक्षण करू लागली. तेव्हाच एक छोटीशी मुलगी साधारण चार वर्षाची असावी, लाल रंगाचा फ्रॉक घातलेली, भुरभुऱे न विंचरलेले केस अशी ती हातामध्ये एक पेन घेऊन कॅबजवळ आली. आणि आपल्या हाताने खिडकीजवळ टकटक केले. मृदुलाने पटकन तिच्याकडे पाहिले. तिचे ते निरागस डोळे मृदुलाला जणू बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मृदुला त्या डोळ्यांमध्ये हरवून गेली. “ऑंटी पेन घ्या ना. फक्त १० रुपयांचे आहे. तुम्ही हे घेतले तर माझे काका मला खाऊ देतील,” त्या मुलीच्या गोड़ आवाजाने मृदुला भानावर आली. ती त्या मुलीला काही विचारणार तितक्यात सिग्नल हिरवा झाला आणि ड्रायव्हरने गाडी सुरू केली. मृदुलाला खूप वाईट वाटले. ती मुलगी तिच्याकडे अपेक्षेने बघतच होती आणि  मृदुलाही खिडकीतून तिच्याकडे मागे बघत राहिली, अगदी दिसेनाशी होईपर्यंत.

मृदुला घरी पोहोचली. बराच वेळ निघून गेला तरी काही केल्या तो प्रसंग मृद्दलाच्या डोक्यातून जाईना. त्या मुलीचा तो गोड चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. तिने मिहिराला या प्रसंगाबद्दल सांगितले. नावाप्रमाणेच मानाने मृदू असणाऱ्या,  हळव्या  मृदुलाला  नेहमीच प्रत्येकाबद्दल आपुलकी, प्रेम वाटते हे मिहिराला माहित होते. त्याने फक्त तिचे बोलणे ऐकून घेतले. त्यानंतर रोज मृदुला त्या सिग्नलजवळ त्या मुलीची वाट पाहू लागली, पुन्हा तिच्याशी भेट होईल तेव्हा तिच्याशी खूप गप्पा मारू असे तिने ठरविले होते. पण महिना होऊन गेला तरी त्या मुलीचा काहीच पत्ता नव्हता.  एक दिवस अचानक ती पुन्हा तिला दिसली. बरोबर पोलीस होते. एका जोडप्याला ओरडत होते. ती मुलगी घाबरून बाजूला उभी होती. मृदुलाने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितले आणि लगेचच त्या जागेवर गेली. तिला पाहताच ती मुलगी ,”आंटी,” अशी ओरडली आणि पटकन मृदुलाच्या गळ्यात पडून रडू लागली. मृदुलाने तिला थोपटून शांत केले.

   “मॅडम, तुम्ही या मुलीला ओळखता का??” पोलीस.

तिने पोलिसांना त्या मुलीला आपण कसे भेटलो हे सांगितले. पोलिसांनीही तिला अधिक माहिती दिली, त्या जोडप्याने, मुलीचे एका अनाथाश्रमातून अपहरण केले होते आणि भीक मागायला भाग पाडले होते.  एक महिन्यांपूर्वी काही क्षणासाठी झालेल्या भेटीत त्या इवल्याशा जीवाने मृदुलावर किती विश्वास दाखवला याचे सर्वांना आश्चर्य वाटले.  मृदुलाला काय समजून घ्यायचे होते ते समजले.

“सर, मला त्या अनाथाश्रमाचा पत्ता द्या,” हे ऐकताच त्या मुलीने मृदुलाकडे बघून एक गोड़ स्माईल दिली. जणू तिला आता काय घडणार आहे हे समजले होते. नंतर मृदुला मिहीरला घेऊन त्या अनाथाश्रमात पोहोचली. पुढच्या काही दिवसातच औपचारिकता पूर्ण करून कायदेशीररित्या तिने त्या मुलीला दत्तक घेतले…..मृदुला आणि मिहीराच्या आयुष्यात आता एक परी आली होती. त्या परीचे नाव होते.. “मिली”. मृदुलाच्या तर आनंदाला पारावर उरला नाही. मिलीच्या येण्याने तिचे आयुष्यच बदलले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *