स्त्री सखी बेंगळूरु सुवर्ण महोत्सव
दिनांक- ०८-०१-२०२३
स्थळ- महाराष्ट्र मंडळ मुख्य सभागृह, गांधीनगर, बेंगळूरु
बेंगळूरु येथील स्त्री सखी संस्थेने दिनांक ०८-०१-२०२३ या दिवशी महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सहयोगाने मंडळाच्या मुख्य सभागृहात आपला सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा केला. १९७३ साली स्व.श्रीमती शांताबाई बोरगांवकर यांनी रुजविलेले स्त्री सखीचे बीज, आज पन्नास वर्षानंतर अनेक शाखांसह एका प्रगल्भ, भव्य वृक्षामध्ये रूपांतरित झाल्याने सुवर्ण महोत्सवाचा आनंद सभागृहात चौफेर पसरला होता. या दिवसाची पहाट स्त्री सखीची सोनेरी पहाट होती. सगळंच अगदी विलोभनीय होत. स्त्री सखीच्या ऐतिहासिक क्षणांना मानवंदना म्हणूनच या सुवर्ण सोहळ्याच आयोजन केलं होतं. स्त्री सखीने कृतज्ञता पूर्वक व्यासपीठावर लावलेली शांताबाई बोरगांवकर, मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्कर व विद्या बाळ यांची छायाचित्रे मनोवेधक होती.
या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात पुण्यातील सुप्रसिद्ध मराठी लेखिका डॉ.अरुणाताई ढेरे व बेंगळूरु येथील नामांकित समाजसेविका आणि लेखिका श्रीमती विजयाताई डोंगरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. संस्थापिका स्व.शांताबाई बोरगांवकर यांचे सुपुत्र श्रीयुत शेखर बोरगांवकर हे ही या सोहळ्यात उपस्थित होते. सुप्रसिद्ध लेखक व प्राध्यापक श्रीयुत चंद्रकांत पोकळे व सुप्रसिद्ध लेखिका सानिया या ही सोहळ्यात उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना झाल्यानंतर स्वागतपद्य झाले. त्यानंतर प्रमुख पाहूणांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्त्री सखीच्या अध्यक्षा विभावरी मण्णूर यांनी प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर व सर्व उपस्थित प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत केले. स्त्री सखीची स्थापना, वाटचाल व उद्देश्य या बद्दल ज्येष्ठ सखी व सुवर्ण महोत्सव अध्यक्षा रेखा जोशी यांनी माहिती सांगितली.
श्रीमती उषा सबनीस यांनी मागील पन्नास वर्षातील स्त्री सखीचा अहवाल वाचून दाखविला. गेल्या पन्नास वर्षात, एकनिष्ठेने वेगवेगळ्या जवाबदाऱ्या घेवून स्त्री सखी साठी योगदान केले, त्या बद्दल स्त्री सखी तर्फे डॉ. अरुणाताईंच्या हस्ते ज्येष्ठ सभासद रेखा जोशी व स्मिता पोंक्षे यांना स्त्री सखी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्त्री सखी सभासद व महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती माणिक पटवर्धन यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. अरुणाताई ढेरे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
स्त्री सखीच्या ज्येष्ठ सभासद स्वर्गीय सरस्वती रिसबूड यांच्या स्मरणार्थ ” सरस्वती साहित्य पुरस्कार २०२२”, हा पुरस्कार माननीय डॉ. अरुणाताई ढेरे यांना श्रीमती माणिक पटवर्धन, डॉ.अजय पटवर्धन आणि पूर्व पुरस्कार विजेते श्रीयुत चंद्रकांत पोकळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यानंतर अरुणाताई “स्त्रियांची आत्मभानाची वाटचाल”, या विषयावर बोलल्या. स्त्री व तिच्या जीवनातील पैलूं विषयी ऐकताना स्त्री जन्माचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. अरुणाताईंची ओघवती वाणी आणि अतिशय सुंदर, सोपे शब्द ऐकताना त्यांचे बोलणे कधीच थांबू नये असे वाटत होते.
स्त्री सखीच्या अध्यक्षा विभावरी मण्णूर यांनी श्रीमती.विजयाताई डोंगरे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला. महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या विषयीचे खटले हाताळतांना त्यांना आलेले अनेक अनुभव या वर विजयाताई बोलत होत्या. कन्नडा भाषेतील विजयाताईंच्या भाषणाने, त्यांचे कन्नडा भाषेवरील असलेले प्रभुत्व दाखवून दिले.
स्त्री सखीच्या संस्थापिका शांताबाई बोरगांवकर यांचे सुपुत्र श्रीयुत शेखर बोरगांवकर यांना विभावरी मण्णूर यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले. श्रीयुत शेखर बोरगांवकर यांनी आपल्या मातोश्री शांताबाई यांनी स्त्री सखी साठी केलेले कार्य, योगदान व त्यांच्या काही प्रेरणा देणाऱ्या आठवणी सांगितल्या.
दुसऱ्या सत्रात, ” दुर्गा चरितम ” गंधर्व कलाकेंद्र बेंगळूरु द्वारे नृत्य अभिनयाचा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम झाला. सखी तारा गोपीनाथ व उषा सबनीस यांनी प्रेक्षकांचा समावेश असलेला चिठ्ठयांच्या खेळाचे आयोजन केले होते. या खेळात बेंगळूरु मधील अनेक मराठी भाषिकांनी सहभाग घेतला होता. अनेक बौद्धिक विषयांवर वेगवेगळी मते यात मांडली गेली. हा खेळ एक विलक्षण अनुभव देत होता.
स्त्री सख्यांनी भारतातील विविध साड्यांचे मनोहारी दर्शन, अतिशय सुंदर रीतीने प्रस्तुत केले. शेवटच्या सत्रात श्रीमती मेघना भट यांनी “कोलाज ” स्पर्धेची बक्षिसे दिली. त्यानंतर मेघना भट यांनी अतिशय सुंदर शब्दात प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थित मान्यवरांचे , प्रेक्षकांचे आणि इतर सर्वांचे आभार प्रदर्शन केले.
स्त्री सखीच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे सोनेरी क्षण मनात साठवत, शेवटी राष्ट्र गीताने सोहळ्याची सांगता झाली.
विभावरी मण्णूर
अध्यक्षा
स्त्री सखी बेंगळुरू
