सभासदांची लेखणी

लोकमान्य 

विझत चालल्या भारतदेशी ‘स्वराज्य’ वणवा चेतवला

हतबल हरल्या लाख जीवांना, अभिमानाचा श्वास दिला

जन्मसिद्ध हक्काची महती मनामनांतून जागवली

मायभूमीच्या स्वातंत्र्याची ,आस नव्याने अंकुरली

‘बाळ’ बलाच्या प्रखर दीप्तीने, फिरंगी ध्वज ही डळमळला

लोकमान्य जय लोकमान्य जयनाद हा जगी दुमदुमला ॥

चळवळीचे सामर्थ्य वाढले सज्ज अर्पिण्या रुधिरसडा

देव देश अन् धर्मापाठी उभा राहिला सह्यकडा 

परवशतेचे वस्त्र रेशमी होलिकामुखी वाहियले

स्वाधिनतेच्या समरपटावर ‘जहाल’ संचित लखलखले

अन्यायाच्या प्रतिकारास्तव सिंह ‘केसरी’ अवतरला

लोकमान्य जय लोकमान्य जय नाद हा जगी दुमदुमला॥

सिंहगर्जना दशोदिशांतून लोकसंग्रहा बोधविले

मंगलमूर्ती श्रीशिवनृपती उत्सव अवघे स्थापियले

बंदीगृहाचे तिमिरवलय ही आत्मचिंतनी विरघळले

कर्मयोग निष्काम सांगण्या ‘गीतारहस्य’ उलगडले

कळीकाळाला मात देऊनी विचार अक्षय मोहरला 

लोकमान्य जय लोकमान्य जय नाद हा जगी दुमदुमला॥

मानसी फडके.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *