सनविवि कविता कलासक्त महाराष्ट्र देश

कलासक्त महाराष्ट्र देश

— रेवती कुलकर्णी —

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

माझ्या नजरेतून आपला देश!!

वर्णावा किती, असे महाराष्ट्र माझा सप्तरंगी

कळेना रसिका रंगू त्याच्या कोणत्या रंगी…

सप्तस्वरांचे चढवून सर्गावरी सर्ग

स्वररंग उधळती माझ्या देशीचे गंधर्व…

नृत्यरंग डौलात येतो पायी पैंजण बांधून

तालावर ढोलकीच्या नाचे बेभान होऊन…

देशी माझ्या रंगती मैफिली काव्यरंगात

मुग्ध होतात रसिक श्रोते त्या काव्यानंदात….

देशात माझ्या नाट्यपंढरी अवतरे साक्षात

सारे नगरजन जाती रंगून ह्या नाट्यरंगात…

चित्रकारांची कला असे किती आगळीवेगळी

त्यांच्या चित्ररंगानी सजलीत दालने निरनिराळी …

अजंठा, वेरूळ प्रदर्शन अनोख्या शिल्पकलेचे

दगडांच्या लेण्यांतून घडे दर्शन सुबक चित्रकृतींचे …

डोलतो महाराष्ट्र सारा भक्तीरंगात

बेभान वारकरी नाचती विठुच्या गजरात….

किती किती वर्णू  कलारंग माझ्या देशाचे

महाराष्ट्र घर असे हो कलाकार अन् रसिक जनांचे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *