–माणिक नेरकर–
भरलेलं आभाळ अन अस्वस्थ भवताल
तुही सोडलास ताल—तर कसं रे पावसा?
शरीरात दाह अन मनात वणव्याचा कहर
झालाच नाही निचरा तर,होईल स्थिती दुष्कर
दुर्विचारांची घाण, अविवेकाची वाण
साचलेली डबकी अन विध्वंसाचा ताण
कधी तू अविरत, कोसळणारा कडा,तर
कधी तू रिमझिम बरसणाऱ्या धारा
रंगहीन आयुष्याचा भरायला घडा
भेटशील का तू ,कधीतरी “ खरा?”
कुठे वाट,बरसणाऱ्या पावसाची तर कुठे चिंता, माथ्यावर छप्पर नसण्याची
कुठे रिकामे वलय,तर कुठे महाप्रलय
कुठे चिंब भिजलेले,क्षण हळुवार
तर कुठे शुष्क,विझलेल्या आकांक्षांचा हा:हाकार
कुठे आठवणीतील मधुर रिमझिम गुंजन
तर कुठे फाटलेल्या छपराचे मूक रुदन
कधीतरी फेडायचेय,तुझेही ऋण
वाजवशील का कधी, मनाजोगी धून?
“हवा तेव्हाच”, “हवा तेवढाच” बरसणारा—असशील तू जेव्हा
“मनातला पाऊस” बनून—अवतरशील तू तेव्हा—
