–विशाखा पेंडसे-पंढरपुरे–
एका हिंदी चित्रपटातला प्रसंग.
नायकाला असाध्य आजार आहे आणि आता त्याच्याकडे फक्त तीन महिने उरले आहेत असं निदान होतं. नायक हादरून जातो. पण डॉक्टर धीर देत नायकाला सांगतात, की तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे, तुझ्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखे किती दिवस तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेत ते मोज बरं. तू सायकल चालवायला शिकलास तो दिवस, तुला पहिली नोकरी मिळाली तो दिवस, तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलास तो दिवस, असे एकूण किती दिवस आहेत? तीस वर्षांच्या आयुष्यात असे पंचवीस-तीस दिवस असतील. बाकीचे दिवस कुठे गेले? तुझं आयुष्य खरं तर या तीस दिवसांमध्येच सामावलेलं आहे. आता तुझ्याकडे तब्बल नव्वद दिवस उरले आहेत. या नव्वद दिवसांमध्ये तू ठरवलंस, तर अजून तीन आयुष्यं जगू शकतोस!
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात चित्रपटासारखे नाट्यमय प्रसंग घडण्याची शक्यता कमीच. पण मनात कायम जपून ठेवण्यासारखे काही प्रसंग मात्र आपल्याही आयुष्यात घडत असतात. इतरांना ते प्रसंग कदाचित तितके महत्त्वाचे वाटणारही नाहीत, पण आपल्यासाठी मात्र ते अविस्मरणीय असतात. माझ्यासाठी अविस्मरणीय असलेला असाच एक प्रसंग म्हणजे मी माझी स्वतःची दुर्बीण तयार केली, तो.
मी शाळेत असताना मला खगोलशास्त्रात रस निर्माण झाला. पुस्तकांमधून या विषयाची माहिती मिळवली, नक्षत्रांशी थोडीफार ओळख झाली, तरी लहान गावात रहात असल्यामुळे दुर्बिणीतून आकाश पाहण्याची संधी तेव्हा कधी मिळाली नाही. पुढे कॉलेजसाठी पुण्याला आल्यावर मला एका हौशी आकाशनिरीक्षकांच्या संस्थेबद्दल समजलं. मी या संस्थेचं सभासदत्व घेतलं आणि दर महिन्याला होणार्या आकाशनिरीक्षणाच्या कार्यक्रमांना त्यांच्याबरोबर जाऊ लागले. संस्थेच्या किंवा सभासदांच्या दुर्बिणी (टेलिस्कोप्स), द्विनेत्री (बायनॉक्युलर्स) घेऊन शहरापासून लांबच्या ठिकाणी हे कार्यक्रम रात्रभर चालत असत. उत्तम दर्जाच्या दुर्बिणींतून गुरू ग्रहाचे उपग्रह, शनीच्या भोवताली असलेली कडी, विविध तारकापुंज इत्यादी पाहणं म्हणजे निखळ आनंद असायचा. हळूहळू संस्थेत माझ्या ओळखी व्हायला लागल्या. तेव्हा मला कळलं, की यातल्या काही जणांनी स्वतःच्या दुर्बिणी स्वतः बनवलेल्या आहेत! आकाशदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात ज्या देशपांडे काकांचा उत्साही सहभाग असायचा, त्यांचीही स्वतः तयार केलेली अतिशय उत्कृष्ट दुर्बीण होती. या दुर्बिणी पाहून मला वाटायला लागलं की आपणही स्वतः दुर्बीण तयार करावी. देशपांडे काकांनी मला मार्गदर्शन करण्याची उत्साहाने तयारी दाखवली.
दुर्बीण तयार करण्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दुर्बिणीचा परावर्तक आरसा तयार करणे. हा आरसा जितका निर्दोष असेल, तितकी दुर्बिणीची गुणवत्ता चांगली होते. आरसा तयार करण्यासाठी काचसामानाच्या एका खास दुकानातून सहा इंच व्यासाची वर्तुळाकार, जाडजूड काच आणली. त्याबरोबरच तेवढ्याच व्यासाची, पण जाडीला थोडी कमी अशी अजून एक काचही आणली. ही दुसरी काच म्हणजे आरसा तयार करण्यासाठीचं एकमेव आणि अतिशय महत्त्वाचं उपकरण, म्हणजे ’टूल’. या दोन्ही काचा सुरुवातीला अर्थात सपाट होत्या. आरसा तयार करण्यासाठी काचेवर विशिष्ट प्रकारची पूड घालून, दुसर्या काचेने ती योग्य प्रकारे, योग्य तेवढा जोर देऊन, घासून ती काच योग्य प्रमाणात अंतर्वक्र करायची असते. हे महत्त्वाचं, कष्टाचं आणि त्याहीपेक्षा चिकाटीचं काम आता सुरू झालं.
माझं कॉलेज तर सुरू होतंच. संध्याकाळी कॉलेजातून परत आले की मी लगेचच काकांकडे जायचे. कधी बसने, कधी रिक्षाने. घासण्यासाठी लागणारी सिलिकॉन कार्बाईड नावाची पूड आम्ही पुण्यातल्या गणेश पेठ, घोरपडे पेठ अशा भागांमधल्या दुकानांतून आणायचो. वाळूसारखी दिसणारी ही पूड होती. कणांच्या आकारावरून तिची वर्गवारी केलेली असते. सुरुवातीला सर्वात जाड पूड पाण्यात मिसळून काचेवर पसरून आणि टूलने विशिष्ट प्रकारे घासून घासून अंतर्वक्र आकार आणायचा. काही दिवस रोज संध्याकाळी घासून झाल्यावर हवा तसा आकार आला. आता बारीक पूड वापरून काच गुळगुळीत करायची. अधिकाधिक बारीक आकाराची पूड वापरत वापरत आरसा एकदम गुळगुळीत करत जायचं. मला अगदी रोजच्या रोज काकांकडे जायला जमायचंच असं नाही. त्यामुळे हे काम खूप दिवस चाललं.
काम करताना भरपूर काळजी घ्यावी लागायची. उदा. नखं कापलेली पाहिजेत, कारण वाढलेल्या नखांमध्ये कार्बाईडची पूड अडकून बसते. मग जेव्हा आपण बारीक पूड घेऊन घासत असतो, तेव्हा जर आधीच्या जाड पुडीचे कण नखातून निघून काचेवर गेले, तर गुळगुळीत झालेल्या काचेवर या मोठ्या कणांनी चरे उमटतील. रोजचं काम संपलं, की दोन्ही काचा स्वच्छ धुवून, वाळवून सुरक्षित जागी ठेवून द्यायच्या. दुर्बीण वापरणारे लोक दुर्बिणीच्या आरशाला जिवापाड का जपतात हे मला आता कळायला लागलं.
एकीकडे दिवसभर कॉलेजही सुरू असल्यामुळे धावपळ बरीच व्हायची खरी, पण देशपांडे काका-काकूंनी मला अगदी घरच्यासारखं वागवलं. रात्री उशीर झाला तर त्यांच्या आग्रहामुळे कित्येक वेळा मी मेसला दांडी मारून त्यांच्याच घरी जेवायचे.
होता होता एक दिवस आरशाचं हाताने करण्यासारखं काम करून संपलं. आता त्याच्यावर ॲल्युमिनियमचा पातळ थर लावून घेतला, की आरसा पूर्ण तयार होणार होता. त्यानंतर दुर्बिणीच्या बाकी भागांपैकी काही विकत आणून, काही आवश्यकतेनुसार तयार करून घेऊन दुर्बीण जुळवायची होती.
पण त्याआधी मला उत्सुकता आणि धाकधूक होती, ती आरसा चांगला झालाय ना, याची. त्यासाठी आम्ही संस्थेतल्याच दुसर्या एका मुलाची दुर्बीण आणली, त्यातला त्याचा आरसा काढून त्यात माझा आरसा बसवला. दुर्बीण चंद्राकडे रोखली आणि दुर्बिणीला डोळा लावला. आहाहा..चंद्रावरची विवरं किती सुरेख दिसत होती! मी मेहनत घेऊन तयार केलेला आरसा निर्दोष, सुस्पष्ट चंद्रबिंब दाखवत होता.
यथावकाश दुर्बिणीचं उर्वरित काम झालं आणि मी माझ्या दुर्बिणीतून आकाशातली काही दुर्मिळ दृश्यं बघितली, इतरांना दाखवलीही. चंद्रदर्शन काही दुर्मिळ नव्हे, पण माझ्यासाठी मात्र पहिल्या दिवशी पाहिलेला चंद्र अविस्मरणीय ठरला.

अप्रतिम सुरेख!! लेख पुढे पुढे वाचत राहावा असं वाटतं इतकी सहज आणि सोपी भाषा पण तितकीच ओघवती ही!!
मस्त!
धन्यवाद श्री. चौगुले आणि मानसी 🙂