सनविवि अनुभव,साहित्योन्मेष करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी

करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी

— पुरुदत्त रत्नाकर–

भाग १ 

दुमदुमल्या दिवसाचा रात्री प्रतिशब्द

माझ्या स्टुडिओ अपार्टमेंट मधलं कॉलिंगमशीन बंद पडलं होतं. पण वायफाय चालू होतं. रात्री नऊ वाजता सुखरूप असल्याचा संदेश बायकोला फेसबूकवरून पाठवून, तसंच, परिस्थिती निवळली की सविस्तर बोलू असं सांगून मी गादीवर आडवा झालो. भिंतीवर घोरपडीसारखं कायम चिकटून असणारं वातानुकूलन यंत्र तीन आधार निखळल्यामुळे उरलेल्या एका बाजूच्या वरच्या आधारावर लोंबकळत होतं. बाहेर प्रचंड पाऊस, विजा. घड्याळातली वेळ आता झोपलंच पाहिजे अशी नव्हती. पण आत्ता दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं. झोप अशी लागणार नव्हती आणि बिथरलेल्या छताकडे डोळे लावून बसण्यातही हशील नव्हता. तरीही सलग तीन-चार तास पाठीला पाय लावून चालल्याचे श्रम कामी आले आणि डोळा लागला असं म्हणता येणार नाही, पण आजूबाजूची फिकीर राहिली नाही.

साधारण रात्री १ वाजेच्या आसपास एक मोठ्ठाआवाज आला. हा काही सामान्य आवाज नव्हता. ‘ख s sर्र र्र s र्र.. खस्स’ हा आवाज काही मिनिटांनी परत आला. परतून तिसर्‍यांदा आला तेव्हा मी जागा होतो. आवाज अवजड वस्तू सरकवल्याचा होता आणि खूप जवळून येत होता. वातानुकूलनयंत्र.. ते रात्रभर जसं लोंबकळत होतं तसंच हेलकावे खात होतं. टेबल उभंच होतं, त्यावरचं घड्याळ संध्याकाळपासून आडवं झालेलं होतं ते ही तसंच होतं. पडल्यापडल्या त्याची दिशा बदलली होती. ती सारखी बदलतच होती. मी स्वयपाकघरात जाऊन मायक्रो, फ्रीज वगैरे तपासून आलो. फ्रीज उघडला होता, उघडझाप चालूच होती. पण ‘ख s sर्र र्र s र्र.. खस्स’ असा आवाज असेल अशा पद्धतीने काहीही हललेलं नव्हतं. मला बिलकूल भीती वाटत नव्हती पण आवाज कसला आणि कुठून ते समजत नाही याबद्दल अगतिकता होती.  मी परत येऊन शय्येवर पहुडलो. या वेळेला भिंतीकडे उजव्या कुशीवर न वळता खोलीकडे डाव्या कुशीवर. थोड्याच वेळात ‘ख s sर्र र्र s र्र.. खस्स’! डोळे फाडून बघितलं. आवाज खूपच जवळून आला होता पण परत निराशा…काहीही सुगावा लागला नाही. तेवढ्यात, परत. माझ्या पलंगाखालची दोन्हीही स्टोरेज ड्रावर्स खर्र करत बाहेर आली.. पूर्ण बाहेर. मग त्यांची लांबी संपली आणि तरीही कोणीतरी ढकलत असल्यासारखी काही क्षण कचकचत थांबली आणि एकदम घाईघाईत खस्स करत परत आत गेली.. पूर्ण बंद! बरं, ती काही रिकामी नव्हती. एकात हॉटेल मधे असते तसली, माझ्या अंगावरच्या गुबगुबीत दुलईची सवत घडी करून ठेवलेली. तर दुसर्‍यामधे माझी ३० किलो क्षमतेची पण किमान १० किलो भरलेली अमेरिकन टुरिस्टर. मला एकंदर परिस्थितीचं हसू आलं. अवाक होऊन मी बघतच राहिलो. ड्रॉवर बाहेर आल्यावर ओव्हरहॅंग असतांना वजनाने तुटू नये म्हणून मी आतल्या वस्तू आधी नुसत्याच बाहेर काढून ठेवल्या आणि मग रिकाम्या ड्रॉवरला तर ते जबर धक्के सहन होणारच नाहीत म्हणून, त्याच काढलेल्या वस्तू ड्रॉवरला बाहेरून टेकून ठेवल्या. तसंच अपार्टमेंटमधल्या सगळ्या उच्चपदस्थ वस्तू जमिनीवर मांडून एकमेकांना टेकून ठेवल्या. पदापेक्षा अस्तित्व महत्वाचं!

सत्राणे उड्डाणेची रंगित तालीम आणि तिसरी घंटा 

महाराजा, निसर्गाने त्याआधीच्या दिवसभरत ‘डळमळ भूमंडळ’ करायचं आणि ‘सिंधूजळ गगनी’ पाठवायचं महत्कार्य आटोपून नंतर रात्री ही वाजंत्रि वाजवली ती रात्र होती ११ मार्च २०११, म्हणजे फाल्गुन शुद्ध सप्तमि, शके १९३२. आधीच खराखुरा फाल्गुन मास त्यात हा उल्हास. स्थळ होतं….. योकोहामा, जपान! मी त्या दिवसांमध्ये तिथे होतो हे माझं भाग्यच आहे. कारण यापेक्षा थरारक अनुभव मला माझ्या आयुष्यात येईल असं वाटत नाही आणि या थरारासाठी जपानसारखी योग्य, सुरक्षित जागा नाही. 

मी हनुमंताच्या आदेशाने २०१० साली जपान्यांबरोबर काम करू लागल्यावर त्यांच्याकडून लगेचच प्रत्यक्ष भेटायचं बोलावणं आलं. ऑक्टोबरच्या सुरूवातीला मी जपानला पोहोचलो. डिसेंबरपासून भूकंपाच्या धक्क्यांची वारंवारिता वाढू लागली होती आणि तीव्रताही. सुरूवातीला सुट्टीच्या दिवशी निवांत असतांना ‘आत्ता हलतय का सगळं?’ इतपतच धक्के बसत होते. लगेच इंटरनेटवर खात्री करायची सोय होती. नंतर हे धक्के दुर्लक्ष करता येणार नाही इतके मोठे म्हणजे साधारण ३ रिश्टर ते ५ रिश्टर मधले बसू लागले. तसंच कार्यालयात असतांना सुद्धा जाणवू लागले. कधीकधी मला वाटायचं की भूकंप होतोय पण नक्की समजायचं नाही. तसं छोटे छोटे धक्के समजावे अशी जपानमधे काही आवश्यकता नसते. पण ते कोणाला.. तर तिथल्या सराईतांना. मला मात्र माझ्या या जाणिवांबद्दल कुतूहल असतं, त्याची उकल झाली नाही तर अस्वस्थता येते. मग मला एक उपाय सापडला. आमच्या कार्यालयाचे मजले उंच होते. त्यात छतापासून लोंबकळणारे दिवे होते. अगदि पिटुकला धक्का बसला तरी हे दिवे दोलायमान होतात हे मला एका मोठ्ठ्या धक्क्यावेळी कळलं आणि कुतुहलाच्या हिंदोळ्यामधून माझं मन सावरलं. जसजसा फेब्रूवारी आला तसतसं धक्यांची वारंवारिता फारच वाढली. रहिवास, कार्यालय, दुकानं एवढंच नाही तर रस्त्यावरून चालत असतांना, ट्रेनमध्ये असतांनाही धक्का जाणवू लागला.

कार्यालयात माझी जागा सहाव्या मजल्यावर. इमारतीत तळमजल्यात शिरलं की दोन बाजूंना दोन लिफ्ट. दोन्ही लिफ्ट्सच्या पलीकडे जिने. म्हणजे मजल्यांच्या दोन टोकांना दोन जिने. ते जिने जिथे उघडतात तिथेच समोर मजल्याची प्रवेशद्वारं. माझं बस्तान उजवीकडल्या जिन्याच्या समोरच्या प्रवेशद्वारातून आत सरळ समोर जात ६-७ रांगा पार करून मग होतं. डाव्या बाजूच्या जिन्याच्याही आणखी डाव्या बाजूला एक चिंचोळा कोपरा होता. तिथे दोन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन ठेवलेली होती. यातून थंड-गरम पेयांचे कॅन्स घेता यायचे. जपानी माणसं सहसा हे कॅन घेऊन परत जागेवर येऊन बसत किंवा क्वचित त्या मशीन जवळच खिडकीतून बाहेर पहात एखादा घोट घेत आणि मग जागेवर येऊन उरलेला कॅन रिता करत. ते कधीही टोळकं बनवून जात नसत. दुपारी एकदा त्या मजल्यावरचे सगळे हिंदुस्तानी सहकारी एकत्र पेयपान करत. चार घटका गप्पाटप्पा होत. कुटुंबांपासून विरहात असलेल्या आम्हाला ही परवानगी आमच्या एका वरिष्ठांनी मिळवून दिली होती.

मग मार्च महिना आला. कार्यालयात असतांना एकदा माझ्या शेजारचा जपानी सहकारी, इशिकावा-सान टेबलखाली गेला. मला वाटलं काहीतरी पडलं म्हणून उचलायला गेला. पण बाहेर आल्यावर इशिकावा-सान ने खुलासा केला की भूकंपाचा धक्का जास्त काळ टिकलाय असं लक्षात आलं की प्रत्येकाने टेबलखाली किंवा अन्य एखाद्या मजबूत वस्तूखाली आसरा घ्यायचा हा तिथल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरचा भाग आहे. तो ज्या धक्क्याच्या वेळी टेबलखाली गेला तेव्हा अन्य कोणीही तसं केलं नव्हतं. म्हणजे तो फक्त मला प्रात्यक्षिक दाखवायला ते करत होता! ‘फ्लोअर लीडर’ असलेला तो, माझ्या शेजारी बसायचा. धक्यांची वारंवारिता वाढलेली असल्यामुळे नजीकच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कुणकुण बहुधा त्यांना लागलेली होती. 

म्हणता म्हणता १० मार्च उगवला. दुपारचे २ किंवा ३ वाजले असतील. एक विलक्षण अनुभव आला. आमच्या कार्यालयाची संपूर्ण इमारत एखाद्या झुल्यासारखी झुलू लागली. अगदि संथ पण बर्‍यापैकी लांब झोके होते. अक्षरशः आपण झोपाळ्यामधे संथपणे झुलतोय असं वाटत होतं. काही क्षण डावीकडे डावीकडे डावीकडे जात होतो तर पुढचे काही क्षण उजवीकडे उजवीकडे. काही सेकंदांनी तर, पाऊण-एक मिनीट असेल, अन्य टेबलांपाशी बसलेले व्यवस्थापक वेगळ्या गतीने जाताहेत आणि माझ्या टेबलवरचे सगळे वेगळ्या गतीने असं अजब वाटलं. म्हणजे धक्का आता ओसरत होता. हा बर्‍यापैकी तीव्रतेचा आणि दीर्घ धक्का होता. पुढचा, ११ मार्चचा दिवस नेहेमीसारखाच उगवला होता….

क्रमशः…..

2 thoughts on “करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी”

  1. उत्कंठावर्धक रोमांचक वर्णन! साहित्योन्मेष स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा

Leave a Reply to शशिशेखर चौगुले Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *