सनविवि पत्रलेखन,साहित्योन्मेष पत्रलेखन – प्रिय सख्या

पत्रलेखन – प्रिय सख्या

–निवेदिता शिरवटकर–

 प्रिय सख्या , 

तूच एकमेव सुहृद अन् तूच काय तो जाणतोस माझ्या मनीचा भाव. 

तुझ्या श्यामल कांतीची आठवण करून देणारा घननीळा दाटून आला आहे चौफेर . आज ओसंडून वाहीन माझ्या शब्दांतून ! 

बागडणाऱ्या निळ्या पयोधरांची घाई ती किती !  सुरू झाले पवनराजाचे हे तांडव नृत्य . तितक्याच आवेगात  आहे  चतुर चपला . तिच्या  लखलखत्या कल्लोळाने डोळे पार दिपले रे माझे !

इतके दिवस हिरमुसलेली उभी वनराई त्या दोघांच्या  तांडव नृत्यात सामील होऊन अचानक डोलू लागली.  अशी काय तू किमया केलीस की जणू एक एक पान- फुल  जिवंत व्हावे ?  साक्षात् स्रष्टा तू ! अवघी सृष्टी अशी चैतन्यमय केवळ तूच करू शकतोस  ! 

सरसरत आवेशात धरित्रिकडे झेपावणाऱ्या  थंड  तुषारसिंचनाने माझं  होरपळलेल तनमन शहारून  गेलं.…. जसं मोरपिसाने सर्वांग मोहरुन टाकणारा स्पर्श करावा तसं  ! 

त्याक्षणी चिंब मातीतून  येणारा मदमस्त  गंध  तुझ्या चरणी लेपलेल्या चंदनाची आठवण देऊन गेला.

हा मृदा गंध पुन्हा एकदा साक्ष देतो आहे आकाशातून बरसणाऱ्या प्रेमधारेसाठी आतुर धरिणीच्या मनाची.

आम्ही बापुडे मात्र सदैव आसुसलेले तुझ्या निरपेक्ष मायेसाठी . आज पुन्हा एकदा तुझ्या ह्या प्रेममय अमृत वर्षावात न्हाऊन निघू दे. 

बहरलेली, नटलेली वृक्षराजी , रंगफुलांची उधळण  मला पुन्हा एकदा जाणीव करून देतील की मी कधीही एकटी नाही . तू आहेस सदैव माझ्यासोबत……. चराचरात . तुझे अस्तित्व आहे अखंड , पर्ण- कुसुमांनी नटलेल्या हिरव्या नवलाईत. 

कधीचं हे खुळं मन तुला आर्त साद घालत होतं ; त्या भांबावलेल्या चातकासारखं .बरसू दे तुझ्या  अमृतधारा . तृप्त होऊ दे माझ्यातील चैतन्य . वाहून जातील सर्व पीडा त्यात. होऊन जाऊ दे दर्शन आज तुझ्या किमयेचे, सृष्टीच्या बहराचे,  नवनिर्मितीचे. 

पाहा पाहा !  ते सानुले, कोवळे, इटूकले इटूकलेअंकुर  हलकेच डोकावून पाहत आहेत  सुखावलेल्या मायेच्या कुशीतून. तुझ्या पावन सरींनी असं नवजीवन  मिळो त्यांना की , पार उंच झेपावून आकाशाला गवसणी घालावी त्यांनी !  इतके दिवस अबोल असलेल्या धरिणीने सुद्धा लिहावे  एक सुंदर, हिरवे  काव्य आकाशाच्या पटलावर . व्यक्त व्हावीत तिची  हिरवी स्पंदने ..… आज बहरू दे, नटू  दे  तिला. रंगून जाऊ दे बेदुंध होऊन !

तिला अशी नटलेली पाहताना मलाही होईल अनुभूती . तिला नभाशी एकरूप होताना पाहून मीही नव्याने बहरेन, फुलेन. झुगारून  देईन अंतरंगी धुमसणारे सारे  दुःख.  मग उरेल फक्त एक सुकुमार ‘ षोडशा ‘ , की जिचा प्रत्येक अंश, कणनकण होईल एकरूप ह्या खुलत्या निसर्गाशी .

मी सुद्धा उमलेन पुन्हा एकदा. अगदी त्या गोड, नाजूक   गुलाबी कळीसरखी . माझे तुझ्यावरचे निरलस प्रेम   

मनमोहक अत्तर बनून स्वार होईल अवखळ पवन पंखांवर. सर्वदूर पोहोचेल माझा प्रेमसंदेश आणि पुन्हा एकदा  मी उभ्या आसमंती दरवळेन. 

गगनी सजलेल्या ह्या अनोख्या मंडपात संगीत मैफिल रंगली आहे खरी ; पण मी त्यात केवळ एक प्रेक्षक नाही.  गरजणाऱ्या मेघांच्या आणि लकाकणाऱ्या बिजलीच्या तालावर माझी पावले देखील थिरकु पाहत आहेत.  तुझ्यासमोर बेभान होणारी ती ‘ मीरा ‘ ! ….अगदी तिच्यासारखं . 

तनामनावरून ओघळणाऱ्या  शीतल वर्षाधारा मला पुन्हा एकदा नवतारुण्य बहाल करतील. जाणीव करून देतील मला पुन्हा एकदा त्या अतूट नात्याची जे माझं आणि निसर्गाचं आहे .  

हा निसर्ग म्हणजे तुझीच किमया. तो  माझा गुरू आहे , की जो माझ्याकडून  कोणतीही अपेक्षा न ठेवता  फक्त भरभरून देत राहतो . असा एक गुरू की जो काहीही न बोलताच संपूर्ण जीवनाचे सार मला शिकवू पाहतो .

त्याच्याशी संवाद करणे ज्याला जमले त्याला  विश्वाचे सार उमगले. जर हे हिरवे चैतन्य गायब झाले तर आमचे जगणेच किती असह्य होऊन जाईल ? ह्या वृक्षांच्या छायेच्या  सान्निध्यात  मिळणारा जिवंत श्वास , फळाफुलांचा मोहक सुगंध , रंगांची उधळण , पक्ष्यांचा किलबिलाट , पानांची सळसळ , सुसाट वाऱ्यावर नृत्य करणाऱ्या त्यांच्या फांद्या … हे सर्व गायब झाले तर मानवी आयुष्य किती निरस होऊन जाईल. नको ! …. अशी कल्पनाच नको ! 

आज तर मुळीच नको .…आज  हा धुंद क्षण मला जगू दे . हे पृथ्वीचे सौंदर्य नजरेत साठवून दडवून ठेवू दे.

केवळ सौंदर्य नाही तर जगातली सर्व  सोने चांदी , हिरे माणके फिक्की पडतील असा खजिना आहे हा . 

त्यात आता भर पडली आहे अजून एका मधुर तालाची.  कलकल करीत जवळच एक उत्शृंखल झरा बागडू लागला आहे . दगडधोंड्यातून , काट्याकुट्यातून उड्या मारीत , मजेत नवी वाट शोधु पाहतो आहे. थांबण्याची उसंत नाही त्याला . कधी नवे  सवंगडी गोळा करी तर कधी गाळाचे गाठोडे मागे टाकीत पुढे धावत आहे. ना कशाची खंत , ना  दुःख ! मागे सरलेला भूतकाळ त्याचे पाय ओढीत नाही की पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला धास्ती नाही. प्रत्येक क्षणी फक्त बागडायचे एवढेच माहीत आहे त्याला……. तुझे प्रेम अंतरी कवटाळून मलाही असंच बागडू दे.

हा चंचल  निर्झर एक दिवस प्रकट होईल एका शांत , स्थिर नदीच्या रुपात . तीही अशीच वाहत राहील, पण तू तिच्यावर सोपवलेले  दायित्व किती बरं महान !  तिला सतत निर्मिती करायची आहे आपलं सर्वस्व देऊन. सौंदर्याच्या  नवनिर्मितीचा आणि ह्या भूमीच्या पावित्र्याचा  वसा घेतला आहे तिने आजन्म. जणू तुझंच प्रेम तिच्या थेंबाथेंबातून ओतप्रोत वाहत आहे.

शेवटी मात्र उरेल ते फक्त तिचं समर्पण  ! एक दिवस तिचं संपूर्ण अस्तित्व होईल विलीन अथांग, सागरात. अगदी असंच विलीन व्हावं माझ्यातील चैतन्य तुझ्या चरणी . जे सरितेचे नाते सागराशी तेच माझे नाते तुझ्याशी ! एकमेव नाते  जे चिरंतन आहे . 

प्रतीक्षा आहे मला त्या दिवसाची . 

फक्त तुझीच ,

प्रेमवेडी

1 thought on “पत्रलेखन – प्रिय सख्या”

Leave a Reply to Ms Surekha Gajanan Makode Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *