सनविवि साहित्योन्मेष प्रवास एक गम्मत

प्रवास एक गम्मत

चित्ती असू द्यावे समाधान….

— पुरुदत्त रत्नाकर —

धकाधकीचा प्रवास संपल्यामुळे हलकं वाटत होतं. ते दार उघडायची वाट पहाणार्‍या गर्दीत आम्ही दोघे होतो. 

“हरीहरी. कुठे गेला होतास तू फिरायला?” त्याने आत्मियतेने विचारलं.

“मला भारताचं तिकीट दिलं होतं…. खूप कठीण प्रवास होता.” मी कोरडेपणाने म्हणालो.

“अस्सं? मला वर्णन ऐकायला आवडेल.” सराईत श्रोता असल्यासारखा तो म्हणाला.

“सांगतो.” तो चंचलपणे ऐकू लागला.

“भारताच्या तिकीटावर मी चिपळूणला गेलो. सुरूवातीला अर्थातच आई-बाबांकडे. अन्य नातेवाईक, शेजारी, मित्रं, गुरुजी वगैरे नंतर भेटले. मोठी सुट्टी होती, छान चालली होती.” पुसट स्मृतींना उजाळा.

“अच्छा, मोठ्ठी होती का? छान! हरी हरी.” त्याचा स्वर मिश्किल होता.

“हो ना.” मिश्किलपणाला गुंगारा देत मी पुढे सांगता झालो, 

“खूप खेळलो, मजा केली. प्रवासाचा पुढचा पडाव आई-बाबांबरोबर पुण्यात पडला. तिथे डहाणूकर कॉलनी, गल्ली क्रमांक ४ मध्ये आम्हाला रहायला एक सदनिका मिळाली. आई-बाबाही प्रवासात असले तरी पुणे हे त्यांचं सो कॉल्ड कामाचं ठिकाण होतं. त्यामुळे ते कामावर निघून जात. मला तिथेही मित्र मिळाले. मी आधी शाळेत, नंतर महाविद्यालयातही जाऊन आलो. पण माझं कोणाशीच फार जमेना. मला कायम एकटं वाटत होतं.”

“हो, सहाजिकच आहे.”

“तेच ना. रात्री शतपावली करतांना मी आणि आई माझा एकटेपणा घालवण्यासंबंधी चर्चा करत असू. एक दिवस फेर्‍या मारत असतांना आम्हाला डहाणूकरच्या  मध्यवर्ती गोल बागेतली मूर्ति दिसली. आई म्हणाली, ‘एकटं वाटलं की तू या देवाकडे मन मोकळं करत जा.’ त्या देवाला मग मी माझं सगळं दुःख सांगू लागलो. अगदी चिपळूणपासून ते काही क्षणांपूर्वीपर्यन्त माझ्या मनात काय चालू होतं ते ही मी त्या देवाला सांगत असे.” 

“अगदी सगळं? का फक्त दुःखाचं, सोयीचं?” तो मला निरखून पहातोय असं वाटलं.

“अं..हं! सहसा दुःखच सांगतो ना माणूस देवाला?” मला आठवणींचा वीट आला होता.

“खरंय. आणि मग तुम्ही सगळे चिपळूणला निघून गेलात.” 

“बरोबर. पुण्यापेक्षा चिपळूणच बरं म्हणून बाबा सगळ्यांना घेऊन चिपळूणला परत…. अर्रे! पण हे तुला कसं माहिती?” आश्चर्यतिरेकाने एखाद्या खडकावर आपटून मला खरचटल्याचा भास झाला.

“… मला थोडं माहिती आहे. पण आधी तू पूर्ण कर. मग मी सांगतो.” तो बोलायसाठी आसुसलेला वाटला पण बोलायची सवय नसावी. 

मी नंतरचं सगळं खडानखडा सांगितलं. “… अशा रीतीने चिपळूणला परतल्यावर मी निसर्गात रमलो आणि आता हे दार उघडण्याची वाट पहातो आहे.” 

त्याने दीर्घ उसासा टाकला. कोंडलेल्या भावना ओसंडून वहात असाव्यात.

“माझ्या प्रवासासाठी मलाही भारताचंच तिकीट मिळालं होतं.” काहीतरी जुळवाजुळव करून आता तो सांगता झाला.

“वाटलंच मला.” 

“संगतवार सांगतो. नरकयातनांना कंटाळलेल्या तुला फिरायसाठी मानवाचा जन्म देऊन पृथ्वीवर पाठवण्यात आलं, ऐशी वर्षांपूर्वी. ऐशी वर्षांचा प्रवास तुला खूप मोठा वाटतो, कारण तू अजून मानवजन्मातून पुरता बाहेर आलेला नाहीस. सो कॉल्ड सजिवांच्या जन्मात कुठून आलो, कुठे जाणार, काहीच आठवत नाही.”

“ठीक आहे. मुद्दयाचं बोल.” स-देही असतांना मला ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र…’ या श्रेणीतले असे अनेकजण भेटले होते.

“ऐक तर. पृथ्वीवरच्या प्रवासासाठी म्हणून मला पाषाणाचा जन्म मिळाला.”

“काssय? दगडाचा जन्म!” माझ्या जाणिवांच्या ठिकर्‍या उडाल्या!

“हो. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी मी जन्मलो.” ऐशी वर्षांची सुट्टी मोठी म्हंटल्यावर तो का हसला ते मला लक्षात आलं. 

“एवढा मोठा प्रवास, तोही बांधल्यासारखा. यावर उःशाप म्हणून अशा ‘निर्जीवांच्या’ जन्मात पृथ्वीवरचे सगळे प्रवास, स्वर्ग-नरकातला वावर स्मृतीत रहातो आणि हरिभजनाने काळ सुसह्य होतो.”

“अच्छा..” 

“माझी उत्पत्ति अरबी समुद्राच्या लाटा वालुकामय तटाला आपटून, त्यात सागरी जिवाष्म गाडले जाऊन, दबून झाली. मी चुनखडी कुलावतंस.” 

दगडाला पाझर फुटला होता आणि माझी वाचा बसली होती.

“भुगर्भीय हालचालींनी सरकत सरकत आमचं कुळ संह्याद्रीच्या जवळ सरकलं. मग कोंढाणा बांधला जात असतांना माझी स्थापना कल्याण दरवाज्याच्या तटबंदीत झाली.”

“बापरे! म्हणजे तू शिवाजी-तानाजींना…!” शरीर पृथ्वीवरच सुटलं तरी महाद्वार उघडेपर्यंत वासना, भावना शाबूत असल्याने मी त्या शिळेलाही मनोमन मुजरा केला.

“…नुसतं पाहिलं नाही, ते आणि त्यांच्या मावळ्यांनी माझ्यावर हात ठेवून चर्चा केल्या आहेत, माझ्यावर चढून उभे राहिले आहेत!”

“खोटं… मी कल्याण दरवाजाकडे कधी फिरकलोही नाही. मग तुला माझ्याबद्दल माहिती कशी?” मी गोट्याच्या कपाळी खोटा मारला!

“अरे किती ही अधीरता.. राजाराम महाराजांच्या काळात तटबंदीची डागडुजी करतांना मला मुक्त करण्यात आलं. मी भटकत, भरकटत, हस्ते-परहस्ते सातार्‍यात पोहोचलो. तिथे एका मूर्तिकाराला मी मूर्ति करण्यालायक वाटलो. मग त्याने छिन्नी-हातोडा घेऊन देवाची मूर्ति करायला घेतली.”

“स्संss! खूप त्रास झाला असेल नाही. मला तर कल्पनाही करवत नाही.” जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मी हळहळलो. 

“तसं काही नाही. मूर्तिकार जो भाग उडवतो त्यातून नवे दगड जन्माला येतात. म्हणजे आईला प्रसववेदना होतात तोच त्रास होतो.” तो हळवा झाला. मी मात्र थिजलो होतो.

“सातार्‍यातल्या एका मंदिरात माझी स्थापना करण्यात आली. खूप लाड होत होते. नैवेद्य, वस्त्र अर्पण होत होती. अभिषेक, आंघोळी सगळं होतं. नंतरची सुमारे दोनशे वर्ष मंदिराच्या वास्तूची पडझड होत राहिली. म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धार करतांना, तशीच पण संगमरवरी मूर्ति बसवायचं ठरवण्यात आलं. मग माझं काय हा प्रश्न आला.” त्याला प्रत्येक क्षण आठवत होता.

“मग? काय तुझं?” त्याने मला गुंतवून ठेवलं होतं.

“आता कसं.. नमनाला घडाभर तेल आणि मग मुद्द्यावर आलो आपण. मंदिराच्या विश्वस्त समितीतले एक सदस्य डहाणूकर कॉलनी, पुणे येथे कायमचे रहायला गेले होते. त्यांची माझ्यावर फार श्रद्धा होती. त्यांनी डहाणूकरमधल्या बागेचा सुशोभीकरणाचा भाग म्हणून मला कायमचं तिथे नेऊन ठेवलं! ते काही मंदिर नव्हतं. त्यामुळे काही ठराविक लोकच तिथे माझ्याकडे यायचे. त्यात तू ही होतास!”

“काय? काय म्हणालास? म्हणजे? … म्हणजे… त्या देवातला दगड तू होतास?!” माझी बोबडी वळली.

“हो. बरोबर! खरं सांगू का? अंतरीचा ज्ञानदिवा उजळला तर दगडातला प्राणही दिसेल.” तो एखाद्या तत्ववेत्त्यासारखा बोलला. 

मी भानावर आलो, “मग तुझा प्रवास संपला म्हणजे नक्की काय झालं?” 

माझी तृष्णा शमवायला धोंडा सरसावला,

“मला निरोप देऊन तू सातार्‍याला निघून गेलास.. दहा-बारा वर्षांनी ते विश्वस्तही नाहीसे झाले. आणखी काही वर्षांनी बाजूचं रस्ता रुंदीकरण करत असतांना मी पडलो. भग्न मूर्ति ठेवू नये म्हणून मला तापत्या डांबरमिश्रणात टाकण्यात आलं आणि माझा प्रवास संपला. हे द्वार उघडलं की मी परमात्म्यात विलीन होणार! हालअपेष्टाप्रद प्रवास स्वीकारतांना तसा करारच केलाय.” त्याची ब्रह्मानंदी टाळी लागत होती..

“मला अजून स्वर्गसुख आणि नरकयातना भोगायच्या आहेत. प्रवासही शिल्लक आहेत.” आता मला मानवजन्माआधीचं आठवू लागलं होतं.

“मला सांग, मी तुला माझी दुःखं सांगायचो तेव्हा तू काय करायचास?” मी खडा टाकला.

“मी तुला सांगत असायचो, “… उगीच दुःखाचा चिखल कालवू नको रे. मी म्हणजे मूर्तीमंत एकाकीपणा. एक लक्षात घे. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान!” 

2 thoughts on “प्रवास एक गम्मत”

  1. मस्तच! छान लिहीता तुम्ही. लक्षवेधक संकल्पना कलाटणीपूर्ण पद्धतीने मांडायचं कसब आहे! तुमच्या आगामी लेखनाची वाट पाहीन.

Leave a Reply to Madhav Vidwans Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *