सनविवि अनुभव,साहित्योन्मेष मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…

मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…

  

 –देवश्री अंभईकर धरणगांवकर–

एकदा काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त विदर्भातील आमच्या गावाला गेलो असताना एका माकडामुळे चांगलीच धमाल झाली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तसे जास्तीची भांडी, आसने वगैरे आणण्यासाठी मी व ह्यांच्या काकू गच्चीवरच्या खोलीत गेलो. आम्ही खाली येणार इतक्यात एक भले मोठे माकड नेमके जिन्यावर येऊन बसले. गावाकडे माकडांच्या टोळ्या अधूनमधून येतात त्यातलेच भरकटलेले माकड असावे. काकूंनी पटकन दार लावून घेतले. माकड जाण्याची वाट पाहत आम्ही खिडकीतून पाहू लागलो पण माकड निवांत असावे. 

गच्चीवरच्या खोलीत माकडामुळे अडकल्याने आम्ही बऱ्याच हाका मारल्या पण आमचे दोघींचे ‘मंजुळ आवाज’ काही खाली पोहोचले नसावेत कारण ना माकड हलले ना कोणी अंगणात डोकावले. एवढ्यात भांडी घासणाऱ्या बाई आल्या.  

ओss मनकरणा बाईss!’’(ज्यांचे कागदोपत्री नाव मणिकर्णिका होते) काकूंनी हाक मारली. आधी त्यांना कोणी व कुठून आवाज दिला तेच कळलं नाही. 

“ओss इकडे वरती गच्चीवर बघा!”

मनकरणाबाईंनी एकदाचे आमच्याकडे बघितले व त्यांना माकड दिसले.

“कोणाला तरी माकड हाकलायला सांगा. आम्हाला खाली यायचं आहे.”

“व्हय!” म्हणत त्या आत गेल्या.

“जिन्यात बंदर बसेल हाये. सुनबाई बोलावून राह्यल्या.”- मनकरणा बाई

विदर्भात हिंदीची मिसळ बोलीभाषेत असते.

ह्यांनी बाहेर येऊन माकडाला हातवारे केले पण माकड ढिम्म बसलेले! काकूंच्या बंटीने मोठ्या धाडसाने ‘प्लॅस्टिकची बॅट’ उगारली तसे माकड जिन्यावरून गच्चीवर आले. पाठोपाठ बंटीही आला म्हणून काकूंनी दार उघडले पण माकड पळाले नव्हतेच. ते तिथेच कोपऱ्यात होते. माकड एकदम बंटीच्या अंगावर आले तसे भिऊन खोलीत घुसून त्याने दार लावले. आता आमच्यासोबत तोही खोलीत अडकला. 

माकड पुन्हा जिन्यावर स्थानापन्न झाले. आता अंगणात हे, घरातले व शेजारचे काही लोक जमले. आप्पासुद्धा (सासरे) आले.  

काय कल्ला करून राह्यले रे? माकडच हाय ना, वाघ हाय का?” 

“तू रे, तुझं लग्न करून दिलं तरी तुला माकड हाकलता येत नाही? काय फायदा?”- आप्पा

आप्पांची बोलणी ऐकून इकडची स्वारी विचारात पडली की लग्नाचा व ह्याचा काय संबंध?!! 

“आता मी काय रोज बंदर हाकलतो का आप्पा. प्रयत्न करून राह्यलो ना. ते जाऊन नाही राह्यलं.” हे म्हणाले. कधी कधी हे अगदी ‘शुद्ध’ वऱ्हाडी बोलतात!!

“लवकर हाकला त्याला. गुरुजी जेवायचे थांबले आहेत.”

त्यानंतर माकड हाकलण्याचे विविध पर्याय सुचतील तसे समोर येऊ लागले…

“त्येला भूक लागली असंल. केळी देऊन पाह्यजा!” 

माकडाकडे भिरकावलेली केळी त्याने आनंदाने खाल्ली आणि आणखी मिळतील या आशेने बसून राह्यले.

“ओरडले की जाईन ते!”

“हाss हाsss हुई, हुई…” माकडाने साफ दुर्लक्ष केले. 

“गाय हाकून राह्यला का बे, असं तं गाई-बैलाले म्हणतात!”- एकजण

“मंग माकडाले कोंची भाषा कळते सांगा.” वैतागून दुसरा बोलला.

शुक शुक करा!”

“शुक शुक कराले त्यो माणुस हाय का? काई पन” 

कोणी काठी उगारली तर माकडाने इतक्या रागाने दात विचकले की तो काठी उगारणारा घरात पार आतल्या खोलीत जाऊन बसला.

जिन्याजवळ कोणीतरी धीराने धूप लावला पण हवा भलतीकडेच वाहत होती म्हणून धूपाचा धूर दूर गेला. पाच मिनिटांत धूप संपला. जो काही सुगंध माकडापर्यंत पोहोचला त्याची माकडाला फुकटात ‘अरोमा थेरपी’ मिळाली. 

त्यावर कोणीतरी म्हणाले “अबे, मच्छर हाय का, बंदर होय ना. धुपाने काई नाई होत!” “नानूभाऊला बोलवा. त्याला सुचतं का काही बघू!”- आप्पा

नानूकाका त्यांच्या पोरासोबत आले. त्यांनी माकडाला डॉक्टर जसे पेशंटला बघतो तसे पाहिले व काय घडले त्याचा आढावा घेतला. वर खोलीच्या खिडकीत आमचे केविलवाणे चेहरे पाहिले. डोकं खाजवून मिनिटभर त्यांनी विचार केला. 

“अन्या, जा रे सुतळी बॉम्ब नाहीतर लड घेऊन ये!”- नानूकाका   

“आता पावसाळ्यात कुठले फटाके?” ते खरे होते. ऑगस्ट महिना होता. 

अरे, त्या क्रिकेटवाल्या माटेंकडे असतील बघ!” 

तेवढ्यात कुणी नानूकाकांसाठी खुर्ची मांडली. गळ्यातला पंचा हाताला गुंडाळून माकडाकडे बघत ते रिंगमास्टरच्या आवेशात खुर्चीवर बसले. माकडाला फटाक्यांचे कारस्थान कळले नव्हते म्हणून ते आरामात बसले होते. 

अन्या फटाके आणायला गेल्यानंतर एखाद्या शस्त्रक्रियेप्रसंगी ऑपरेशन थिएटरबाहेर लोकांमध्ये जशी गंभीर शांतता पसरते तसे काही क्षण गेले. 

माटेंकडे गेलेला अन्या धावत जाऊन पळत आला. 

“घ्या!” धापा टाकत तो म्हणाला. 

दोनच सुतळी बॉम्ब, एकच छोटी लड?”- नानूकाका.  

त्यांना दिवाळीपर्यंत स्टॉक पुरवायचा आहे. माकड हाकलायला एव्हडे पुरे म्हणाले.” 

“हे फटाके सर्दाळलेले असतील तर? फुटलेच नाहीत तर?”- कोणीतरी तेवढ्यात शंका काढली. 

शुभ बोल नाऱ्या! कसले बी फटाके नानूकाका फोडतात बराबर!”- त्याला परस्पर उत्तर मिळाले.    

सुतळी बॉम्ब फोडायची सर्व तयारी झाली. समस्त स्त्रीवर्गाने कानांत बोटे घातली. 

युद्धापूर्वी जसा अखेरचा एक शांतीप्रस्ताव शत्रुपक्षाला देतात तसे टिनावर काठी जोरात आपटून नानूकाकांनी माकडाला निघून जाण्याची संधी दिली पण ते याहीवेळी गेले नाही. उलट दोन पायऱ्या वर सरकले. मग मात्र नानूकाकांनी सुतळी बॉम्ब टिनावर ठेऊन बत्ती पेटवली… 

 ‘धुडूम टन्’ असा मोठा आवाज झाला. ही मात्रा लागू पडली. त्या आवाजाने माकड दचकून गच्चीत पळाले. उरलेले फटाके फोडल्यावर माकडाने रस्त्यावर उडी मारून धूम ठोकली. अर्धा-पाऊण तास चाललेल्या मर्कट-नाट्यावर अखेर पडदा पडला.

बंटीभावजींनी खोलीचे दार हळूच उघडून माकड पळाल्याची खातरजमा केली व हाताने आम्हाला ‘चला या!’ म्हणून इशारा केला. तेव्हा एखाद्या रहस्यमालिकेत असल्यासारखे वाटले मला. माकड पुन्हा आलं तर…या विचाराने आम्ही पटकन जिना उतरलो.

आम्हाला पाहून सर्वांना इतका आनंद झाला की क्षणभर आमच्याही चेहऱ्यावर माकडांच्या अख्ख्या टोळीला झुंजून पळवून लावल्यासारखे पराक्रमी भाव झळकले. त्यानंतर सर्व गालातल्या गालात हसत जेवायला बसले.


2 thoughts on “मी अनुभवलेला विनोदी प्रसंग… माकडा माकडा हुप्प्…”

  1. हा हा हा हा! छान आहे. काही वाक्ये विशेष आवडली! ” लग्न करुन दिल्याचा काय फायदा!” चित्र पण मस्त आहे, कोणी काढलं?

  2. मस्त! मजा आली वाचायला!

Leave a Reply to शशिशेखर चौगुले Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *